Home टॉप स्टोरी दहीहंडी उत्सव, २३४ गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सव, २३४ गोविंदा जखमी

0
संग्रहित छायाचित्र

दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना थरांवरुन कोसळून राज्यात २३४ गोविंदा जखमी झाले. यात मुंबईतील ९४ जणांचा समावेश आहे.

मुंबई – ‘बोल बजरंग बली की जय..अरे बोल बजरंग बली की जय’चा गल्लीबोळात घुमणारा नारा, सलामी दिल्यानंतर किंवा हंडी फोडल्यानंतर डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी थरावर थर रचणारा गोविंदा आणि रस्त्यावर थांबून दहीहंडीचा थरार अनुभवणारे सर्वसामान्य हा सारा माहौल आहे मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतला.

दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना थरांवरुन कोसळून राज्यात २३४ गोविंदा जखमी झाले. यात मुंबईतील ९४ जणांचा समावेश आहे.

रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील नानटे या गावी पाचव्या थरावरून पडल्याने एका गोविंदाचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यापैकी २६ गंभीर जखमी गोविदांना केईएम, सायन, नायर आणि कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. 

दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. गुरुपौर्णिमेपासून कसून सराव करणारी मंडळे लाखो रुपयांचे लोणी असलेल्या हंड्या फोडण्यासाठी बाहेर पडली आहेत. दहीहंडी उत्सवातील बालगोविदांचा सहभाग आणि लाखो रुपयांच्या बक्षीसांसाठी गोविंदा मंडळांमध्ये सुरु झालेली जीवघेणी स्पर्धा यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव वादाच्या भोव-यात सापडला होता.

कोपरी ठाणे पूर्व बाजारपेठेतील दहीहंडी महिला गोविंदा पथकाने फोडली..

मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणल्यानंतर काही प्रमुख आयोजकांनी आपल्या हंडया रद्द केल्याने यंदा दहीहंडी उत्सव होणार कि, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.

सराव करणारे गोविंदाही निराश झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्बंधाना वर्षभराची स्थगिती दिल्यानंतर उत्सवावरील अनिश्चिचतेचे सावट दूर झाले. मात्र बारावर्षाखालील मुलांना थरांवर चढवण्यास घातलेली बंदी कायम असून, डीजेच्या दणदणाटावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

प्रसारमाध्यमांनी गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरल्याने यंदा प्रमुख आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. काही आयोजक वरच्या थरावर जाणा-या गोविंदांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट देणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा जखमी गोविंदाचे प्रमाण कमी असेल अशी अपेक्षा आहे.

ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठान, वरळीमधील सचिनभाऊ अहिर यांची संकल्प प्रतिष्ठान आणि राम कदम यांची घाटकोपर येथील दहीहंडी या महत्वाच्या हंड्या समजल्या जातात. या हंड्यांमध्ये गोविदांना विक्रम रचण्याचे आव्हान देऊन लाखो रुपयांच्या बक्षीसांचे आमिष दाखवले जाते.

यंदाच्या दहीहंडी उत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर पोलिस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. याशिवाय गोविंदा पथकांचा उत्साह व मोठय़ा हंड्य़ा पाहण्यासाठी येणा-या नागरिकांची संख्या लक्षात घेता ३० हजार मुंबई पोलिसांसह १२०० होम गार्ड व राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्यांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (ऑपरेशन) संजय बारकुंड यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version