Home टॉप स्टोरी मुंबई चिंब!

मुंबई चिंब!

1

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आषाढसरींच्या दमदार आगमनाने अवघी मुंबापुरी बुधवारी चिंब झाली. पहाटे तुरळक सरींनी सुरुवात झालेल्या पावसाने दहा वाजेनंतर चांगलाच जोर धरला. 

मुंबई- संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर आषाढसरींच्या दमदार आगमनाने अवघी मुंबापुरी बुधवारी चिंब झाली. पहाटे तुरळक सरींनी सुरुवात झालेल्या पावसाने दहा वाजेनंतर चांगलाच जोर धरला. पाहता पाहता मुंबई उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पाण्याची अवघा एक महिन्यापासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. या पावसामुळे बेसावध असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्याचा रेल्वेसेवा, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. मात्र इतक्या दिवसांनंतर आलेल्या पावसाने ही नाराजी औट घटकेची ठरली.

फोटो गॅलरी- भिजवले…

छत्रीविना प्रवास करणा-यांची संख्या जास्त असल्याने या पावसाने त्यांची चांगलीच धांदल उडवली. मात्र उत्कंठा ताणणा-या पावसाने अखेर हजेरी लावल्याचे समाधान मुंबईकरांच्या चेह-यावर दिसत होते. गैरसोईबद्दल नाराजी, काचकूच न करता छत्री नसल्याचा त्रागाही त्यांनी केला नाही. पावसामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होण्याचे तसेच रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. दुपापर्यंत सांताक्रूझ येथे १८०.८ मिमी पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाला अंदाजच नाही

चुकीचा अंदाज वर्तवण्याची परंपरा कायम ठेवणा-या मुंबई प्रादेशिक हवामान विभागाला बुधवारच्या मुसळधार पावसाचा अंदाज आला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास बंगालजवळ कमी दाबाचा पट्टा जास्त कार्यरत झाल्याने मुसळधार पाऊस होईल, हा अंदाजच आला नाही, अशी सारवासारव मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक व्ही. के. राजीव यांनी केली. सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ामुळे अजून दोन दिवस असाच पाऊस राहील, असा नवा अंदाज त्यांनी मुंबईसाठी वर्तवला.

नालेसफाईची पोलखोल

मुंबईतील नालेसफाईचे काम शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा करणा-या महापालिकेची पोलखोल झाली आहे. एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर आगमन करणा-या पावसाने महापालिकेच्या दाव्याला अक्षरश: धुऊन काढले. मुंबईत तब्बल १४० ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना मान खाली घालत वरुणराजाने त्यांना चूक मानायलाही भाग पाडले.

मुंबईतील तब्बल १४० ठिकाणी पाणी साचले. शहरातील कुलाबा, बुधवार पार्क, भायखळा, मुंबई सेंट्रल, दादर, धारावी, शीव आणि माटुंगा, पूर्व उपनगरातील चेंबूर, कुर्ला, घाटकोपर, मानखुर्द, विद्याविहार, मुलुंड आणि भांडुप तर पश्चिम उपनगरातील मालाड, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, कांदिवली, दहिसर, सातांक्रूझ आदी भागांमध्ये पाणी साचले होते. यात शहर भागातील १२, पूर्व उपनगरातील ६६ तर पश्चिम उपनगरातील ७३ ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे खुद्द महापालिका आयुक्तांनाही धक्का बसला.

पहिल्याच दिवशी मेट्रोला गळती

अत्याधुनिक, गारेगार मेट्रोमध्ये पहिल्याच पावसात गळती सुरू झाली. मेट्रोच्या डब्यात थिबकणारे पाणी अंगावर झेलत मुंबईकरांनी प्रवास के ला. ही आधुनिक मेट्रो गळकी कशी असा प्रश्न अनेकांना पडला. या गळक्या मेट्रोचे फोटो दिवसभर एकमेकांना शेअर केले जात होते. हा प्रकार लक्षात आल्यावर ही ट्रेन ताबडतोब कारशेडमध्ये पाठवली, असा खुलासा मुंबई मेट्रोवन प्रा. लिमिटेड (एमएमओपीएल) च्या प्रवक्त्यांनी केला.

लोकलसेवा विस्कळीत

पावसाच्या या दमदार ‘एन्ट्री’त मध्य, हार्बर, मध्य व पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांची दाणादाण झाली. ठाणे-कुर्लादरम्यानचा मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली होती. हार्बर मार्गावरील वेळापत्रक तीन ते चार तास कोलमडले होते. अनेक लोकल रद्द करण्यात आल्या. हार्बर मार्गावरील मानखुर्द स्थानकाजवळ लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पावसाबरोबरच मध्य रेल्वेच्या सावळागोंधळाचा फटका प्रवाशांना बसला. पहिल्याच पावसात रेल्वेचे तीन तेरा वाजल्याने प्रवाशांना तारेवरची कसरत करत पाण्याने भरलेल्या रुळांमधून मार्ग काढावा लागला.

रात्री नऊ वाजेपर्यंतची पावसाची नोंद

चंदनवाडी २४.० मि.मी.
प्रभादेवी, वरळी ५७.११ मि.मी.
वांद्रे, सांताक्रूझ (प.) ८८.११ मि.मी.
अंधेरी पूर्व १२५.७ मि.मी.
परळ ३८.०१ मि.मी.
मालाड पूव १०४ मि.मी.
अंधेरी (प.) १०८.६९ मि.मी.
चेंबूर ६३.२४ मि.मी.
घाटकोपर २००.६२ मि.मी.
भांडुप १७२.६८ मि.मी.
दादर ३५.७९ मि.मी.
कांदिवली १२.३७ मि.मी.
दहिसर १७६.७६ मि.मी.
मुलुंड १६४.३४ मि.मी.
विक्रोळी १८५.१५ मि.मी.
शीव, वडाळा ७१.०९ मि.मी.

 रात्री आठ वाजेपर्यंतच्या पावसाची नोंद

शहर ३२ मि.मी.
पूर्व उपनगर ११९ मि.मी.
पश्चिम उपनगर १०६ मि.मी.

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version