Home टॉप स्टोरी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात,१७ ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात,१७ ठार

1
संग्रहीत छायाचित्र

मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर पनवेलजवळ शेडुंग गावाजवळ कारचे पंक्चर काढण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या स्वीफ्ट व इनोव्हाला खासगी बसने दिलेल्या जोरदार धडकेत १७ प्रवासी ठार तर ४५ जण जखमी झाले.

खोपोली- मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर पनवेलजवळ शेडुंग गावाजवळ कारचे पंक्चर काढण्यासाठी रस्त्यावर थांबलेल्या स्वीफ्ट व इनोव्हाला खासगी बसने दिलेल्या जोरदार धडकेत १७ प्रवासी ठार तर ४५ जण जखमी झाले. मृतांमध्ये १० महिला, ६ पुरूष व ६ महिन्याच्या एका बाळाचा मृत्यु झाला आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईला जात असलेल्या स्वीफ्ट कारचा (एम.एच.०२ सी.एल १४८०) टायर पंक्चर झाल्याने त्याचा चालक टायर बदलण्यासाठी रस्त्यावर मदत मागत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत वाहने वेगात निघून जात होती. त्याच वेळी मुंबईकडे जाणा-या इनोव्हा (एम.एच. ४३ ए.आर. ६३३३) कारच्या चालकाला मदत मागत असल्याचे दिसले. त्यामुळे इनोव्हाच्या चालकाने कार बाजूला घेवून स्वीफ्ट चालकाला मदत दिली.

याच दरम्यान निखिल ट्रॅव्हल्सची खासगी बस (एम.एच.११ टी. ९६९८) मुंबईकडे निघाली होती. वेगात असलेल्या बस चालकाला अचानक समोर उभी असलेली दोन वाहने दिसली. त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने इनोव्हा व स्वीफ्टला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस इनोव्हाला घेवून बाजूच्या खड्ड्यात जावून उलटली. यात इनोव्हा व स्वीफ्टमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

अपघातानंतर मदत पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस, आयआरबी, डेल्टा फोर्स, देवदूत, अग्निशमन दल व स्थानिकांनी बचावकार्यात मोठी मदत केली. जखमींना कामोठे येथील एम.जी.एम. रूग्णालयात दाखल केले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती वर्तवण्यात येत आहे. अपघातानंतर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, तहसीलदार दीपक आकडे यांनी घटनास्थळी भेट देवून अपघाताची माहिती घेतली.

अपघातामधील मृतांची नावे

विलास बाबूराव माने, (वय ६२) नेरूळ, काशिनाथ सखाराम निकम,(वय ४५) सातारा, अनन्या कल्याण कदम (वय ३ महिने) कांजूरमार्ग, चतुरा शिवाजी कदम, (वय ४३) ठाणे, संदीप यशवंत शिवरकर, (वय ३४) मेढा सातारा, प्रियांका कल्याण कदम, (वय २२), ठाणे, संदीप विठ्ठल चव्हाण, (वय २२) ठाणे, अविनाश हनुमंत कारंडे, (वय ३५) कामोठे, वैजयंती मनोहर गुजर, (वय ४०) मुंबई, वेदिका निलेश यादव, (वय २ वर्ष) सातारा, श्रद्धा दत्तात्रय काळे, (वय २०) कांदिवली, इक्बाल बाबमलाल शेख (वय ६६) सातारा अशी मृतांची नावे आहे. काही मृतांची नावे समजू शकली नाहीत.

अपघातामध्ये जखमी असलेल्यांची नावे :-

प्रदिप खोपडे, भांडुप, जगन्नाथ दळवी, अंधेरी. सुनीता डिगे, सातारा, ओम तानाजी डिगे, सातारा., हितेश चव्हाण जोगेश्वरी, निलेश नाळे, ठाणे. निशा यादव, सातारा, सागर पाटील, घणसोली., विपिन म्हात्रे, घणसोली., सिद्धेश कदम, ठाणे., राज अपनाथ, ठाणे. ओमकार मानगोळी, ठाणे., ओमकार साळुंखे, लोणंद. अनिता निकम, सातारा, मनोहर बुजाहर, सातारा, योगेश खराडे, डोंबिवली., अक्षय गुजर, सातारा., श्रुती शिवणकर,सातारा, सुनील गोडसे दिवा, सोनल गोडसे, दिवा, आर्या बहादपुरे, ठाणे, निर्मयी भोईटे, कल्याण, प्रकाश गायकवाड, कळवा, अश्विनी भोईटे, कल्याण, सुषमा शिवणकर, सातारा, संगीता गोडसे, दिवा., संदेश गोडसे, दिवा, लता काळे, कांदिवली, मनोहर गुजर, सातारा, तानाजी इंगोळे, निर्मयी भोईटे, रोहिणी मिसाळ, मिनल कारंडे भांडूप.

स्वीफ्टमधील जखमी

अमरदीप सिंग, कोमल अमरदीप सिंग, जिया अमरदीप सिंग, रणधीर अमरदीप सिंग

इनोव्हामधील जखमी

आशिष बेमट्या पाटील, रामनाथ म्हात्रे, सुशिल म्हात्रे, दिपेश म्हात्रे, बिपिन म्हात्रे, सागर पाटील,

या अपघातात ठार झालेल्यांमध्ये महिलांची संख्या अधिक आहे. अनन्या कल्याण कदम या तीन महिन्याच्या मुलीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.

महामार्गाच्या सुरक्षेसाठी कलावंतही उतरणार

मुंबई-पुणे महामार्गावर होत असलेल्या अपघातांमध्ये अनेकांचा बळी जात असतानाच आता या महामार्गाच्या सुरक्षेसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत यासाठी चित्रपट-नाटय़कलावंत मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. रविवारी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर अभिनेता शरद पोंक्षे यांनी मुख्यमंत्र्यांनाच दहा हजार पत्रे पाठवून तीव्र भावना कळविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ही पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहून आपल्या भावना त्यांना कळविल्यानंतरही जर त्यांच्याकडून या महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी काही कारवाई न झाल्यास सिने आणि नाटय़सृष्टी एक्स्प्रेस हायवेवर उभी करण्याचा इशारा पोंक्षे यांनी दिला आहे.

या महामार्गाच्या सुरक्षेसाठी कार्यवाही करणार नाही तोपर्यंत येथून एकही गाडी जाऊ द्यायची नाही यामुळे सरकारचा टोल बुडेल आणि तेव्हा त्यांना जाग येईल यासाठी पत्र, ईमेल या माध्यमातून दहा हजार पत्रे जमा करण्याचा मानसही पोंक्षे यांनी केला आहे. यासाठी त्यांनी ponkshesharad@gmail.com या इमेलवर या आंदोलनासाठी आपली पत्रे पाठविण्याचे आवाहन केले आहे.

1 COMMENT

  1. रस्त्यावर गाडी रिपेरिंग करण्या पूर्वी गाडी पासून दूर काही अंतरावर पुढे मागे दिसतील असे ” सावधान ” चे फलक
    चालकाने लावायला हवे होते .जेणे करून मागून येणाऱ्या वाहन चालकांना इशारा मिळाला असता .आणि आपत्ती
    टळली असती. ( भयंकर दुख्हद अशी घटना ! रिप).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version