Home महामुंबई मुंबई महापालिकेचा गोंधळात गोंधळ

मुंबई महापालिकेचा गोंधळात गोंधळ

0

माहीमचा मालमत्ता विभाग पालिका मुख्यालयात आणला जात असताना भायखळा येथील शहरी भागासाठी असलेल्या उपप्रमुख अभियंता इमारत प्रस्ताव विभाग अँटॉप हिल-वडाळा भागात हलवले जात आहे.

मुंबई – माहीमचा मालमत्ता विभाग पालिका मुख्यालयात आणला जात असताना भायखळा येथील शहरी भागासाठी असलेल्या उपप्रमुख अभियंता इमारत प्रस्ताव विभाग अँटॉप हिल-वडाळा भागात हलवले जात आहे. भायखळा येथील ‘ई’ विभाग कार्यालयाची इमारत योग्यप्रकारे असून केवळ इमारत प्रस्ताव विभागाचे कार्यालय अँटॉप हिल इमारतीत नेण्यात आले आहे. भायखळा कार्यालयात माहिती अधिकार कार्यकत्रे आणि तक्रारदारांची गर्दी होत असल्याने वडाळय़ातील विद्यालंकार मार्गावरील सॉल्टपेनच्या जागेवर अडगळीच्या जागी नेऊन ठेवले आहे. जेणेकरून तक्रारदारांचा त्रास कमी होईल, असे बोलले जात आहे. मात्र हे कार्यालय वडाळय़ात हलवल्याने विकासक आणि वास्तुविशारदांमध्ये नाराजी पसरली आहे.

भायखळय़ाच्या ‘ई’ विभागाच्या कार्यालय इमारतीत तिसऱ्या मजल्यावरील उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) कार्यालय वडाळा पूर्व येथील विद्यालंकार कॉलेजजवळ व दोस्ती इस्टेटसमोरील सॉल्टपेन रोडवरील पालिका इमारतीत हलवले जात आहे. सध्या या इमारत प्रस्ताव विभाग कार्यालयातील सामानांची आवराआवर सुरू असून फाइल्सचे गठ्ठे बांधून वडाळय़ातील कार्यालयात नेले जात आहेत. मुंबई शहरातील इमारत बांधकामासाठी विभागातर्फे परवानगी दिली जाते. त्यामुळे शहर भागातील बांधकामांना परवानगी घेण्यासाठी विकासक व वास्तुशाविशारदांची गर्दी तेथे होत असते. परंतु भायखळा येथील मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय असताना चक्क वडाळय़ात नेले जात असल्याने विकासक आणि वास्तुविशारदांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

एकीकडे मालमत्ता विभाग महापालिका मुख्यालयात आणले जात असताना इमारत प्रस्ताव विभाग वडाळ्यातील एका अडगळीच्या ठिकाणी नेऊन टाकले आहे. तेथे चालत जाणे शक्य नसून टॅक्सीने जाण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी या कार्यालयातील काही अभियंत्यांना १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली होते. याप्रकरणी तीन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version