Home प्रतिबिंब चर्चेतला चेहरा मुगल-ए-आझम आजही भावस्पर्शी

मुगल-ए-आझम आजही भावस्पर्शी

0

प्रेमकहाणी मग ती आर्ची-परश्याची असो वा सलीम- अनारकलीची.. प्रेक्षक अशा कथानकांना डोक्यावर घेतातच. अजरामर ठरलेल्या सलीम-अनारकलीच्या प्रेमकहाणीचे कथानक असणारा मुगल-ए-आझम जर त्याच ताकदीने नाटय़रूपात पाहायला मिळाला तर कोणाला आवडणार नाही. मुंबईकरांकरिता ही सुवर्णसंधी गेल्या वर्षभरात चार विविध ‘शो’मधून देऊ केली आहे प्रसिद्ध दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी. ऑल द बेस्ट, देख तमाशा देख, सालगिराह, तुम्हारी अमृता, गांधी विरुद्ध गांधी असे सरस कथानक चित्रपट, नाटकांद्वारे रसिक प्रेक्षकांसमोर मांडणा-या फिरोज अब्बास खान यांच्या संकल्पनेतून नाटय़रसिकांना ऐतिहासिक क्लासिक मुगल-ए-आझम हे कलरफूल नाटक पुन्हा एकदा त्याच ताकदीने अनुभवता आले आहे. मुंबईतल्या नरिमन पॉइंट येथील भाभा कला केंद्रात देशभरातल्या १२० कलाकारांच्या प्रतिभेतून मागच्या वर्षी या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग साकारला गेला. रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद या कथानकात आणि त्याच्या सादरीकरणात आजही आहे, हेच जणू फिरोज यांनी दाखवून दिले आहे. चार सीझन्समध्ये ५७ खेळ आणि तेही हाऊसफुल्ल! भारतीय रंगभूमीच्या बॉक्स ऑफिसवरच्या इतिहासातली ही अनाकलनीय घटना आहे. विशी-तिशीतले तरुण आपल्या आजी-आजोबांना आधार देत या नाटकाला आणतात आणि त्यांच्यासोबत त्याचा आनंद लुटतात, हे पाहणे म्हणजे एक पर्वणीच असते.  फिरोज अब्बास खान यांनी १९८३  पासून मुंबईतल्या नावाजलेल्या पृथ्वी थिएटरमधून कला दिग्दर्शक या नात्याने आपली कारकीर्द  सुरू केली. पृथ्वीच्या जेनिफर कपूर आणि आकाश खुराणा यांच्यासोबत फिरोज यांनी रसिकांसमोर उत्तम कलाकृती दिल्या आहेत. खान यांना फिल्मफेअर, नॅशनल अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष ज्यूरी अ‍ॅवॉर्ड आणि आयफा पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत. पृथ्वी थिएटरला उन्नतावस्था देण्यात त्यांचा मोलाचा  वाटा आहे. मुगल-ए-आझम या सिनेमानंतर तब्बल ५६ वर्षानंतर फिरोज यांनी आपल्या अद्भुत कलाकृतीतून या संगीत नाटकाचा अभिनव प्रयोग रसिकांसमोर सादर केला आहे. तसेही सलीम-अनारकलीची थेट मनाला भिडणारी प्रेमकहाणी न आवडणारा माणूस शोधून सापडणे कठीण.  फिरोज यांनी त्याला पुनरुज्जीवित केले म्हणून त्यांचे विशेष कौतुक.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version