Home महाराष्ट्र ‘मैलाच्या दगडां’मुळे एसटीला तोटा

‘मैलाच्या दगडां’मुळे एसटीला तोटा

0

अंतर मोजणीसाठी मैलांच्या दगडांचा आधार घेतला जातो. मात्र याआधारे मोजलेल्या अंतरापेक्षा प्रत्यक्षात कित्येक किलोमीटर जास्तीचा प्रवास एसटी बसगाड्यांना करावा लागतो. 

मुंबई- लांबचा प्रवास करणा-या प्रवाशांसाठी रस्त्यावरील मैलाचे दगड आधार ठरतात. नक्की किती प्रवास झाला आणि आणखी किती पल्ला गाठायचा आहे, याच्या अंदाजासाठी मैलांच्या दगडांची मदत होते. मात्र हेच मैलांचे दगड एसटीच्या उत्पन्नातील अडसर बनले आहेत. अंतर मोजणीसाठी मैलांच्या दगडांचा आधार घेतला जातो. मात्र याआधारे मोजलेल्या अंतरापेक्षा प्रत्यक्षात कित्येक किलोमीटर जास्तीचा प्रवास एसटी बसगाड्यांना करावा लागतो. परिणामी, या जास्तीच्या किलोमीटरसाठी डिझेलचा अधिक वापर तर होतो. त्यामुळे एसटीला नुकसान सोसावे लागत आहे.

एसटीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आगारातील गाड्या आखून दिलेल्या किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानंतर या विभागातील अधिका-यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, एसटीच्या दफ्तरी किलोमीटरच्या नोंदी चुकीच्या आढळल्या. अनेक वर्षापूर्वी मैलाच्या दगडांचा आधार घेत एसटीने आपल्या मार्गाचे किलोमीटर निश्चित केले होते. मात्र प्रत्यक्षात एसटी बस जास्त अंतर धावत असल्याचे लक्षात आले आहे. फसव्या अंतरामुळे एसटीचा इंधनखर्च जास्त होत आहे.

मात्र जास्तीच्या अंतराची नोंद होत नसल्याने तिकीट मात्र कमी अंतराचे घेतले जाते. परिणामी, वाढीव अंतराच्या प्रवासी भाड्याला मुकावे लागल्याने एसटीला दुहेरी फटका बसत आहे. गुहागर विभागातील काही गाड्या या नियोजित किलोमीटरपेक्षा जास्त धावतात. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अद्याप त्यावर कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नाही, असे महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण यांनी सांगितले.

एसटीच्या दफ्तरी असलेली नोंद आणि प्रत्यक्ष बस धावत असलेले अंतर यात तफावत असल्याची तक्रार आहे. ४०-४५ किलोमीटरची तफावत नक्कीच मोठी आहे. एवढय़ा किलोमीटरवरील उत्पन्नावर पाणी सोडणे एसटीला परवडणारे नाही. त्यामुळे याबाबत योग्य तो अभ्यास करून लवकरच निर्णय घेतला जाईल, असे एसटीचे जनसंपर्क अधिकारी मुकुंद धस यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version