Home कोलाज मोदींच्या नावाने आंघोळ!

मोदींच्या नावाने आंघोळ!

0

दिल्ली, बंगाल, बिहार, तामिळनाडू, केरळ या पाच राज्यांच्या निवडणुकीत मोदींनी सपाटून मार खाल्ला. आता पाच राज्यांच्या निवडणुका पुन्हा समोर आहेत. पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि सर्वात महत्त्वाचे उत्तर प्रदेश या पाचही राज्यांतील मतदार ११ मार्च रोजी मोदींच्या नावाने आंघोळ (रेनकोट न घालता) करणार आहेत!

भारतीय राजकारण गलिच्छ होत चालले आहे. असभ्यही होत चालले आहे. देशाचे पंतप्रधानपद दर्जा राखून सांभाळणे, नरेंद्र मोदी यांना शक्य होत नाही. त्यांचे चालणे, बोलणे, वागणे हे सगळे उद्धटपणाचे वाटते आहे. त्यांच्या या ‘उद्धट’ वागण्याचा संसदेत जाहीरपणे निषेध झाला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १० वर्षाच्या पंतप्रधान काळात सिंग यांनी पंतप्रधानपदाची ‘‘गरिमा’’ अतिशय उच्च दर्जाने सांभाळली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे व सभ्यतेपुढे मोदींचे वागणे, बोलणे हे नुसतेच असभ्य नव्हे तर, गलिच्छ वाटते आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना १२ वर्षाचा त्यांचा सत्ता काळ कमालीचा वादग्रस्त होताच. मुख्यमंत्रीपदाची ‘गरिमा’ त्यांना टिकवता आली नव्हती. ‘‘गोध्रा’’ हत्याकांडामुळे मुख्यमंत्र्यांची एवढी बदनामी झाली की एका राज्याचे मुख्यमंत्री असूनही त्यांना अमेरिकेने पासपोर्ट नाकारला होता. पासपोर्ट नाकारण्याचे कारण देताना अमेरिकेने मोदींना सुनावले होते की पासपोर्ट मंजूर करण्यासाठी जी कारणे असतात, त्यातील एकही कारण तुम्ही ‘‘मुख्यमंत्री’’ पूर्ण करू शकत नाही आणि तुमची वृत्ती विध्वंसक आहे.’’ त्यावेळचे देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्याच पक्षाच्या मोदींना ‘‘राजधर्म’’ पाळण्याचा सल्ला दिला होता. प्रत्येक व्यक्तीचा एक ‘धर्म’ असतो. ‘धर्म’ हा ‘‘धार्मिक’’ अर्थाने वापरलेला शब्द नाही. राजधर्माचा अर्थ त्या त्या व्यक्तीचे कर्तव्य! सत्ताधारी कोणत्याही पक्षाचा असो सत्तेवर बसल्यानंतर त्याची पक्षीय कवचकुंडले गळून पडली पाहिजेत. मुख्यमंत्री असेल तो राज्याचा असावा. एका पक्षाचा, एका जातीचा, धर्माचा असता कामा नये. पंतप्रधान असेल तो देशाचा असावा. असा या ‘राजधर्म’ शब्दांचा अर्थ आहे. श्री. अटलबिहारी वाजपेयी होते भाजपाचे पण भाजपाच्या अति टोकाच्या विचारापासून त्यांनी स्वत:ला दूर ठेवले होते. म्हणून बाबरी मशीद पाडतानाचा लालकृष्ण अडवाणी यांचा आक्रमकपणा वाजपेयींमध्ये कधीही नव्हता.

नरेंद्र मोदी हे उद्धट आहेत, असा आक्षेप लोकसभेत विरोधी पक्षाने घेतला. भारतीय जनता पक्षाच्या अनेक खासदारांना लोकसभेतील मोदींची देहबोली अजिबात मान्य होत नाही. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना आपण संसदेमध्ये बोलतो आहोत की ‘रामलीला’ मैदानावर पक्षाच्या प्रचार सभेत बोलतो आहोत. याचे भान मोदींना राहिले नव्हते. देशाच्या पहिल्या पंतप्रधान नेहरूंपासून, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव व त्यामधील विश्वनाथ प्रतापसिंग, देवेगौडा, मदन चंद्रशेखर, इंदरकुमार गुजराल आणि अटलजी बिहारी वाजपेयी, यापैकी एकाही पंतप्रधानाला लंबेचौडे हातवारे करून भाषण केले नाही. विरोधी पक्ष आक्रमक झाला तरी संयमी, शब्दातच उत्तर द्यायचे याचे पूर्ण भान होते. नेहरू, इंदिराजी गांधी नंतर वाजपेयींनी पाळलेली सुसंस्कृतता याला तोडच नव्हती. कधी कधी वाटते की अटलबिहारी वाजपेयी यांचा पक्षच चुकला. ते काँग्रेसमध्येच हवे होते. १९५७ साली बलरामपूर मतदारसंघात त्यांच्याविरुद्ध उभे असलेले उमेदवार अॅड. शेख हे काँग्रेसचे मुस्लीम उमेदवार होते. प्रत्येक सभेत वाजपेयी त्यांच्या गौरवाने उल्लेख करीत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांच्यातील ‘‘मार्दव, आर्जव आणि मिठासपण’’ असे हवेहवेसे असे वाटायचे. इंदिराजी पंतप्रधान झाल्यानंतर म्हणजे १९६६ साली लोकसभेत त्यांची संभावना ‘‘गुंगी गुडिया’’ अशी करण्यात आली होती. अवघ्या पाच वर्षानी १९७१ सालच्या बांगलादेशच्या युद्धात नुकत्याच सुरू झालेल्या दूरदर्शनवर उपस्थित होऊन वाजपेयी यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांना ‘‘दुर्गा आणि रणचंडिका’’ म्हटले. लोकशाहीची सर्व पथ्य मानणारे ते वाजपेयी कुठे आणि हे मोदी कुठे! मनमोहन सिंग यांनी आंघोळ कशी करावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु दीर्घ सामाजिक जीवनात रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थसचिव, वाणिज्य सचिव, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा सर्व महत्त्वाच्या जागेवर काम करताना मनमोहन सिंग यांच्यावर एकही ओरखडा आलेला नसल्यावर मोदींना सुद्धा त्यांना मनमोहन सिंगांना रेनकोट घालावासाच वाटला. एका अर्थाने मोदींनी अनवधानांनी का होईना मनमोहन सिंगचा गौरवच केला आहे. त्यांना तो समजलाच नाही आणि हे करत असताना मोदींवर ‘‘सहारा’’ आणि ‘‘बिर्ला’’ उद्योग समूहाकडून ४२ कोटी रुपये घेतल्याचा आरोप थेट राहुल गांधींनी केलाय त्याचा इन्कार मोदी करू शकले नाहीत. त्याचे पुरावे राहुल गांधींच्या हाती आहेत. पुरावे नसलेले किती कोटी असतील ते अंबानी अदानी जाणे!!!

असे मोदी ते घसरगुंडीला लागलेले आहेत. चर्चेमध्ये मुद्दे नसले की माणूस मुद्दय़ावर येतो. मोदींचे तसे झालेले आहे. मनमोहन सिंगांची सभ्यता मोदींना झेपणारी नाही. रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर जेव्हा संसदेच्या लोकलेखा समिती समोर आले तेव्हा ऊर्जित पटेल नावाच्या वशिल्याने गव्हर्नर झालेल्या एका सामान्य सी.ए.ची फटफजिती झाली होती. विरोधी पक्षाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. सभ्य आणि सुसंस्कृत असलेले मनमोहन सिंग यांनी ऊर्जित पटेलला सांभाळून घेतले. व्यक्तीची फजिती होत असताना अव्वल दर्जाच्या रिझव्र्ह बँक संस्थेची बदनामी होऊ नये इतका उच्च दर्जाचा विचार मनमोहन सिंगच करू शकतात. त्यांच्या मंत्रिमंडळात जे मंत्री चुकीचे वागले त्यांना त्यांनी तुरुंगात घातले. मग तो ‘‘एक राजा’’ असो, करुणानिधींची मुलगी कळपुली वा काँग्रेसचे सुरेश कलमाडी असो. काँग्रेसने कोणालाही पाठी घातले नाही. मोदींनी स्वत:च्या अधिकारात नोटाबंदीचा जो खेळ केला तो या शतकातील सर्वात मोठा घोटाळा आहे. मोदी केव्हा तरी पायउतार होतीलच, त्यानंतर येणा-या सरकारने मोदींचा खरा चेहरा लोकांना दाखवण्यासाठी या नोटाबंदीची चौकशी केली तर जगातील सर्वात मोठय़ा घोटाळ्याचे बुरखे फाडले जातील तेव्हा मोदी कुठे असतील?

मोदीजी, तुम्ही मनमोहन सिंगांची माफी मागा न मागा, मनमोहन सिंगांना काही फरक पडत नाही, पण तुमचे कल्चर स्पष्ट झाले. तुमचे दिवस आता भरत आलेत. २०१४ च्या निवडणुकीत लोकांना फसवलंय. लोकांनी मते टाकली, तुम्हाला मोठी संधी जनतेने दिली होती. तुमचा अहंकार जागा झाला, तुमच्यातील घमेंड जागी झाली, हुकूमशहा जागा झाला. तुम्ही सर्वाना कस्पटासमान मानू लागला, वाजपेयी, अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यांच्या वळकटय़ा तुम्ही बांधल्यात. गुजरातमधून ‘फरार’ घोषित करण्यात आलेल्या ‘अमित शहा’ला तुम्ही कोणाच्या जागेवर बसवलेत? जिथे ‘दीनदयाळ उपाध्याय’ बसले होते. संसदेला तुम्ही कस्पटासमान मानले. देश उलटा पालटा करणारा नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या कॅबिनेट मंत्र्यांना ‘कोंडून ठेवले’ वाहिन्यांवर निर्णय जाहीर करेपर्यंत मंत्र्यांचे मोबाईल काढून घेतलेत. तुमचे सहकारी मंत्री या गोष्टी विसरणार नाहीत हे लक्षात ठेवा. सत्तेला घाबरून लाचार झालेली फौज तुमच्या मागे आहे. पण ही मुजोरी फार काळ टिकत नाही मोदी साहेब!!! माझ्या इशा-यावर देश चालेल ही तुमची गुर्मी संपलेली आहे. तुमचा पक्ष भाजपा असा विकलांग आहे की सहा राज्यांच्या निवडणुकीत (आसाम, दिल्ली, बंगाल, तामिळनाडू, केरळ, बिहार) त्या त्या राज्यातील भाजपा नेत्याला कोणीही विचारत नव्हते. देशाचा पंतप्रधान विधानसभा निवडणुकीत गल्लीबोळात फिरला. तुमच्या पी.एम.ओ. कार्यालयाला तपशील काढायला सांगा, नेहरू, शास्त्री, इंदिरा, राजीव, नरसिंह राव अगदी वाजपेयी सुद्धा, विधानसभा निवडणुकीत गल्लीगल्लीत कधी फिरले होते का? तुमचा कोणावरच विश्वास नाही. म्हणून लोकशाहीच्या सगळ्या व्यवस्था तुम्ही मोडून टाकीत आहात. आणि एवढे झाल्यावर बिहार, दिल्ली, बंगाल, तामिळनाडू, केरळ ही राज्ये तुम्हाला जिंकता आली नाहीत. तुमची फटफजिती झाली. २०१४ चे तुम्ही राहिलेले नाहीत. हे लक्षात ठेवा, सकाळी उठल्यावर आरशात एकदा चेहरा बघा, मोदींची हवा गूल झालेली आहे. लोकांचे प्रेम तुम्ही बघितलेत, आता ‘‘प्यारे देशवासीयों’’ मधले ‘‘प्यारे’’ तुम्हाला कसे पाणी प्यायला लावतील आणि ‘‘प्या-रे’’ ते बघा. आज हे लिहून ठेवा की, ज्या पाच राज्यांत आता निवडणुका आहेत त्यातील एकही राज्य तुम्हाला जिंकता येणार नाही. गोवा, पंजाबची निवडणूक झालीच आहे व बंद मतदान यंत्रात तुम्ही हरलेले आहात आणि हे लिहून ठेवा की उत्तर प्रदेशमध्येही तुम्हाला अस्मान दाखवले जाणार आहे. राहुल-अखिलेश जोडी उत्तर प्रदेश बहुमताने जिंकणार आहेत. तुमच्याकडे पोलीस रिपोर्ट येतच असतील.

तुम्ही बाजारात आणलेल्या दोन हजारांच्या नवीन नोटा उत्तर प्रदेशात कितीही ओतल्या तरी या राज्यात तुमच्या नावाने लोक आंघोळ करणार आहेत आणि त्यावेळी तुमच्या अंगावर रेनकोटही नसेल! हा देश मुजोरी सहन करीत नाही हे लक्षात ठेवा. भाजपा तुमचा नुसता भ्रष्ट नाही, तर दुष्ट सुद्धा आहे. लोकशाहीचे संकेत तुम्हाला मान्य नाहीत. रामाला व गंगेला फसवणारे तुम्ही, माणसाची तुम्हाला कशी पर्वा असणार?

तुमच्या नोटाबंदीने देशातील शेतकरी बरबाद झाला. अंबानीची ‘जिओ’ नाक्यानाक्यावर वाजत आहे. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे लोकांना कळलेले आहे. येणा-या पाच राज्यांच्या निवडणुकीतही, भाजपा गेल्या पाच राज्य निवडणुकीप्रमाणे, भाजपा साफ होणार. जे देशात होणार त्या अगोदर मुंबई महापालिकेत होणार हेही लिहून ठेवा. अपघाताने मिळालेली सत्ता ना तुम्हाला पचली आहे, ना फडणवीस यांना समजली आहे. तुमची आणि फडणवीसांच्या आई-वडिलांची पुण्याई मोठी म्हणून ही उच्चस्थ पदे तुम्हाला मिळाली, पण ती जाणारच व तुमच्या नावाने लोक आंघोळ करणारच!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version