Home कोलाज मोदी आता काय शिक्षा भोगणार?

मोदी आता काय शिक्षा भोगणार?

1

नोटाबंदी करून अर्थक्रांती घडवण्याचा डाव फसल्याचे लक्षात येताच मोदींनी ‘कॅशलेस’चा फंडा काढला आहे. मोदींनी अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले. देशाला रांगेत उभे करणारे मोदी आता काय शिक्षा भोगणार?

३० डिसेंबरला आता अवघे १२ दिवस उरले आहेत. ३० तारखेला बोलू असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना म्हणाले होते. पण आता बोलण्यासारखे त्यांच्याकडे काही राहिले नाही. नोटाबंदीचा निर्णय त्यांच्या अंगावर उलटला आहे. त्यांनी जेवढय़ा मोठय़ा नोटा बाद केल्या होत्या, जवळपास तेवढय़ा नोटा लोकांनी बँकांमध्ये परत केल्या आहेत. मग काळा पैसा खणला कुठे? नोटाबंदीने भ्रष्टाचार संपेल असे मोदी म्हणाले होते. पण आतापर्यंत भरवशाच्या मानल्या जाणा-या बँकाच भ्रष्टाचारात उतरल्या आहेत. जवळपास ४०० कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या गेल्या. कुठे संपला भ्रष्टाचार? काहीही संपणार नव्हते. पण मोदींना राजहट्ट पुरवायचा होता. त्यांनी त्यांची हौस भागवून घेतली. ५० दिवस देशाला रांगेत उभे करून मोदींना काहीही साधता आले नाही. ‘फेल झालो तर मला वाट्टेल ती शिक्षा करा’ असे मोदींनी जनतेला सांगितले होते. आता काय शिक्षा करायची? अर्थव्यवस्थेचे वाटोळे करणा-या माणसाला कुठलीही शिक्षा कमी आहे. हिटलर आज जिवंत असता तर त्याने गॅस चेंबरमध्ये टाकला असता. मोगलाई असती तर लोकांनी भर चौकात फटके लगावले असते. आपल्याकडे लोकशाही आहे. मोदींना झेड प्लस सेक्युरिटी आहे. रांगेतली माणसे त्यांच्या सावलीलाही फिरकू शकत नाहीत. मोदींना हे चांगले ठाऊक आहे. त्यामुळे नोटाबंदीचा प्रयोग फसूनही त्यांचा तेटरपणा चालू आहे. रांगेत उभे राहताना ९१ लोक मेले. जगले ते मेल्यात जमा आहेत. अर्थव्यवस्थाच मारून टाकली. व्यापा-यांकडे पैसा नाही. त्यामुळे ते शेतक-यांचा माल उचलत नाहीत. उचलला तर भाव पाडतात. म्हणजे शेतकरी ठार मेला. हातात पैसा नाही म्हणून लहान-मोठे धंदे चौपट झाले आहेत. जीडीपी घटतोय असे परवा रिझव्र्ह बँकेनेच म्हटले आहे. मोदी म्हणतात, डेबिट कार्ड वापरा, धनादेश वापरा, कॅशलेस व्हा. पण ९८ टक्केव्यवहार जिथे रोखीने होतात तिथे एका रात्रीत हा बदल कसा शक्य आहे? खेडय़ात बँका नाहीत, लोक शिकलेले नाहीत. तिथे हे कसे शक्य आहे? मोदींनाही हे कळते. पण लोकांना उल्लू बनवण्यात वस्ताद आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते हाच गोरखधंदा करीत आले. पण सर्वाना सदाकाळ मूर्ख बनवता येत नाही. 

माणसे मरताहेत, शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देतो आहे. पण २४ तास ट्विटरवर असणारे मोदी चकार शब्द बोलायला तयार नाहीत. १५ दिवसांपासून संसद ठप्प आहे. विरोधी नेते जाब मागत आहेत. पण मोदी म्हणतात, विरोधक मला बोलू देत नाहीत. गरज नसताना, कुठलीही पूर्वतयारी नसताना नोटाबंदी देशावर लादली हे कबूल करायची मोदींची तयारी नाही. बाहेर जाहीर सभांमध्ये ते बोलत आहेत. बाहेर काहीही बोलता येते. जबाबदारी नसते. संसदेत जे बोलले जाते त्याची जबाबदारी येते. काँग्रेसच्या राज्यात भाजपानेही असाच गोंधळ घातला होता. कित्येक दिवस कामकाज होऊ शकले नव्हते. आज काँग्रेसवाले गोंधळ घालत आहेत तर भाजपाला मिरच्या झोंबल्या. अखेरच्या टप्प्यात मोदी बोलतीलही. पण उपयोग काय? व्हायचे ते नुकसान होऊन गेले आणि बोलणार काय? पंतप्रधानपद सोडणार का? मुळात मोदींना संसद किंवा लोकशाहीशी काही घेणे-देणे नाही. पंतप्रधानपदाची शपथ घेताना त्यांनी संसदेच्या पायरीवर डोके टेकले होते. ते नाटक होते हे आता लोकांच्या लक्षात येत आहे. बाहेरच बोलायचे असेल तर मग निवडणूक लढवली कशाला? मोदींना विरोधी पक्षच नको आहेत.

हुकूमशाहीकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.

मोदींच्या कामाची ही स्टाईल आहे. प्रश्नांना बगल द्यायची, हा त्यांचा खाक्या आहे. अडचणीत असले की, भावुक होऊन बोलतील. दलितांवर अत्याचार वाढले तेव्हा ‘मला गोळय़ा घाला. पण त्यांना मारू नका’ असे मोदी बोलले होते. नोटाबंदीला त्यांनी देशभक्तीचा मुलामा दिला. रांगेत उभे राहणे ही देशभक्ती आहे असे मोदीभक्तही म्हणू लागले. भाजपाची ही रणनीती असते. खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे म्हणजे लोक खरे मानू लागतात. याचाच फायदा मोदी उठवत आले आहेत. मोठय़ा नोटा चलनातून काढून घेतल्याने काळा पैसा बाहेर येईल, दहशतवाद संपेल, नकली नोटा रद्द होतील अशी कारणे आपल्या पहिल्या भाषणात मोदींनी दिली होती. लोकांनीही सुरुवातीला स्वागत केले. पण आता पोल खुलली आहे. मुळात आपल्याकडे नकली नोटा होत्या तरी किती? दर १० लाख रुपयात २५० नकली नोटा असे प्रमाण आहे. हा सरकारी आकडा आहे. त्यासाठी सा-याच मोठय़ा नोटा रद्द करणे हा उपाय म्हणजे रोगापेक्षा औषध जीवघेणे. दुसरा प्रश्न काळय़ा पैशाचा. काळा पैसा नेमका किती या बाबतीत मतभेद आहेत. पण ४ ते ७ टक्केकाळा पैसा रोखीत आहे, यावर अभ्यासकांचे एकमत आहे. बाकी काळा पैसा सोने, रिअल इस्टेट या रूपात आणि विदेशात ठेवला जातो. ४ टक्क्यांसाठी मोदींनी सोन्याची कोंबडी मारली. काळा पैसा खणून काढायची खरेच इच्छा असती तर धनदांडग्यांवर आयकर धाडी मारल्या असत्या. करबुडव्यांची यादी आयकर खात्याकडे आहे. देशाला रांगेत उभे करण्याची काय गरज होती? सरकारी बँकांनी वाटलेले १० लाख कोटी रुपयांचे कर्ज बुडले आहे. ते वसूल करण्यासाठी मोदींनी काहीही केले नाही. आता काही बँकवालेच परस्पर नव्या नोटा वाटत असल्याचे लक्षात आल्यानंतर मोदींनी तब्बल ९७ बँक शाखांचे स्टिंग ऑपरेशन केले. पण देशात बँकांच्या सव्वा लाख शाखा आहेत. कुणा कुणाचे ऑपरेशन करणार? हवाला व नोटाबदली रॅकेटच्या मदतीने पैसेवाले आपले काळे धन बदलून घेत आहेत आणि काही बँक अधिकारी या कामी मदत करीत आहेत. भ्रष्ट बाबूंमुळे सारी व्यवस्थाच बेकाबू झाली आहे. हा धोका मोदींनी आधीच ओळखायला हवा होता. पण श्रेय लाटण्याच्या चक्करमध्ये मोदींनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. आपण काही मोठी क्रांती करायला निघालो आहेत अशा भ्रमात मोदी होते. पण ८६ टक्केनोटा कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता एका रात्रीत रद्द केल्या, असे जगात कधीही घडले नाही. मोदींनी ते घडवले. रद्द केलेल्या नोटांपैकी ३ ते ४ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत येणार नाहीत, तेवढा पैसा काळा जाहीर करून आपण मैदान मारून नेऊ असा मोदींचा डाव होता. तो तर फसला. पण या सर्कशीत सरकारचे सव्वा लाख कोटी रुपये खर्च झाले, त्याचे काय? अर्थव्यवस्थेला फटका बसला, त्याचे काय? मोदीच काय, भाजपाचा कुणीही नेता, या बद्दल बोलायला तयार नाही. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी म्हणतात, ‘मी बोललो तर भूकंप होईल.’ पण आता आणखी काय भूकंप व्हायचा राहिला आहे? सारे तर उद्ध्वस्त झाले. मोदींनी बाद केलेल्या नोटा नव्याने छापून यायला किमान एक वर्ष लागेल. नव्या नोटा मिळतील. पण तोपर्यंत देश जगायला हवा. कारण आता उद्योग बंद पडायला सुरुवात झाली आहे. मोठमोठय़ा कंपन्या उत्पादनात कपात करीत असून नोक-याही कपात होऊ लागल्या आहेत. नव्या नोक-या तर सोडा, आहे त्या नोक-यांवर गदा आली आहे. खेडय़ांमध्ये तर हाहाकार आहे. महासत्ता बनायला निघालेल्या भारतापुढे भीषण आर्थिक संकटे दत्त म्हणून उभी राहात आहेत. नव्या नोटा उद्या मिळतीलही. पण नोक-या? नोक-या मिळाल्या नाही तर रिकाम्या हाताची पोरं रस्त्यावर येतील. खूनखराबा होईल. देशावर अराजकाचे संकट घोंघावत आहे. तीन वर्षापूर्वी एका लाटेवर देश वाहात गेला. आज त्याची किंमत मोजतो आहे.

नोटाबंदी फसली हे लक्षात येईल तेव्हा सरकारातलेच काही मोदीभक्त बंड करू शकतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक स्टाईल आहे. कामाचा नसेल तर ते त्याला फेकून देतात. लालकृष्ण अडवाणी यांना फेकून दिले. आता मोदींची वेळ आहे. पण मोदी इतक्या सहजासहजी बाजूला होतील? त्यापेक्षा पाकिस्तानशी युद्ध छेडून ते हीरो होऊ पाहतील. मोदी काहीही करू शकतात. ८ नोव्हेंबरच्या भाषणात ‘कॅशलेस’चा फंडा नव्हता. तो आता काढला. मोदींच्या जॅकेटमध्ये असे अनेक फंडे तयार आहेत. आपल्याला वरचढ होतील अशा सा-यांची मोदींनी आधीच ‘नसबंदी’ करून टाकली. अरुण जेटली, राजनाथ सिंग महिनाभर गप्प आहेत. आता कुठल्या तोंडाने बोलतील? नितीन गडकरींना डावलून संघाने मोदींना आणले. संघ परिवाराला पश्चात्ताप होत असेल. ३ वर्षापूर्वी मोदींना ‘लंबी रेस का घोडा’ म्हटले गेले. या घोडय़ाला आता लोकच पेन्शनीत काढतील. मोदी नाही तर मग कोण? कुणीही चालेल, काँग्रेसही चालेल. पण मोदी नको, अशा मानसिकतेत देश आला आहे. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले मोदी आता मोदीमुक्त भारत झालेला पाहतील. २०१९ फार दूर नाही.

1 COMMENT

  1. वाईट अँड वाटच ३० डिसेंबर तहान यु टोक हे खूपच खराब झाले परंतु सर्व लोकांना कळले काय आहे देशात काय चालले आहे देशात मोदीजींनी संगीतले आहे मी कोटीही शिक्षा भोगायला तयार आहे मग त्यांनीच त्यांची शिक्षा ठरवावी जय हिंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version