Home महाराष्ट्र कोकण मेवा रत्नदुर्गवासिनी श्री देवी भगवती

रत्नदुर्गवासिनी श्री देवी भगवती

1

भगवती देवीने रत्नासूर नावाच्या असुराचा वध करून रत्नदुर्ग किल्ल्यावर वास्तव्य केले. तेव्हापासून वर्षानुवर्षे देवीचे बारा मानकरी आणि ग्रामस्थ भक्तिभावाने आणि नित्यनेमाने नवरात्रोत्सव साजरा करतात.
रत्नागिरी– भगवती देवीने रत्नासूर नावाच्या असुराचा वध करून रत्नदुर्ग किल्ल्यावर वास्तव्य केले. तेव्हापासून वर्षानुवर्षे देवीचे बारा मानकरी आणि ग्रामस्थ भक्तिभावाने आणि नित्यनेमाने नवरात्रोत्सव साजरा करतात. रत्नागिरी शहराच्या पश्चिमेला २ कि. मी. अंतरावर अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर रत्नदुर्ग किल्ल्यात श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंना समुद्र आहे. १९६० मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील शेखोजी आंग्रे यांनी भगवती देवीसाठी हेमाडपंथी घुमट बांधला. नंतर १७०० मध्ये शाहू महाराजांनी बावडेकर संस्थानचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांना मंदिरासाठी आर्थिक मदत दिली. त्यावेळी भगवती देवीचे मंदिर बांधले गेले.

या मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार १९४१ मध्ये रत्नागिरीतील कै. भागोजीशेठ बाळोजी कीर यांनी केला. त्यानंतर १९५१ आणि १९५८ मध्ये मंदिरावर वीज पडली. मंदिराच्या डागडुजीसंदर्भात विश्वस्तांसमोर मोठे संकट उभे राहिले. त्यावेळी विश्वस्तांनी देणगीस्वरूपात पैसा गोळा करून मंदिराची डागडुजी केली. त्यानंतर १९८८-८९ मध्ये पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर परिसरामध्ये आता अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

किल्ल्यावरील भगवती देवी ही मूळची रत्नागिरीतील नव्हे तर कोल्हापूरनिवासी आहे. या देवीची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, कोल्हासूर, करवीर व रत्नासूर असे तीन राक्षस मातले होते. या राक्षसांचा संहार करण्याचे काम अंबा देवीकडे होते. कोल्हासुराचा नाश अंबाबाईने केला. तेथे कोल्हापूर वसले. करवीराला अंबाबाईने मारले. तेथे करवीरनगरी वसली.

महाबलाढय रत्नासुराचा वध करण्याचे काम बाकी होते. त्यावेळी अंबाबाईने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकराने देवीला आणखी दोन वष्रे तपसाधना करायला सांगितली. दोन वर्षानंतर देवीला भगवान शंकराने डोळे उघडायला सांगितले. त्यावेळी श्री देवी टेंबलाई व देवी भगवती समोर उभ्या होत्या. कालांतराने या तिन्ही देवींनी जोतिबाच्या वाडीतील खिंडीत रत्नासुराला गाठले. भगवतीने दैत्यावर शस्त्र चालविले व मुंडके उडवले. त्या वाडीचे नाव ‘वाडी रत्नागिरी’ असे पडले. दैत्यांचा नाश झाल्यावर अंबाबाईने वाट दिसेल तिथे जा, अशी सूचना केली. त्यावेळी टेंबलाईने कोल्हापुरात राहण्याचे ठरवले. भगवतीने कोकणची दिशा ठरविली. ती विशाळगडावरून दर्ग्याचे दर्शन घेऊन हातखंबा येथील कदम यांच्याकडे आली. त्यामुळे देवीचे ते मानकरी बनले. त्यानंतर रत्नदुर्गतील बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी सावंत यांच्या घरी देवी बसली. नंतर किल्ल्यात आली व स्वयंभू रूपाने येथे वास करू लागली.

भगवती मंदिर चौसेपी बांधणीचे आहे. मंदिराचा गोपूर जमिनीपासून सुमारे ७० फूट उंचीचा आहे. मंदिर परिसरात श्रीदेव गणपती, खंडोबा, वेताळ, होळदेव व चव्हाटा ही देवस्थाने आहेत. अलीकडेच या मंदिर व परिसरातील भागाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. याचप्रमाणे भक्तनिवासाची सोय विश्वस्तांनी केली आहे. देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे. पूर्वाभिमुख असलेली देवी महिषासुरावर आरूढ झालेली आहे. वर्षातून दोन वेळा देवीचे उत्सव होतात. एक नवरात्रोत्सव आणि दुसरा शिमगोत्सव. या उत्सवांच्या वेळी देवीला संपूर्ण सोन्या-चांदीचे रूपे आणि दागिने घालून सजवले जाते. ही रूपे सावंत खोतांकडे ठेवलेली असतात. नवरात्रातील नऊ दिवस देवीला माळ घातली जाते.

उत्सवकाळात रत्नागिरीबरोबरच मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथून भाविक दर्शनासाठी येतात. नवव्या माळेच्या दिवशी रात्री देवीचा गोंधळ असतो. गोंधळ घालून दिवटया पाजळल्या जातात व रात्री वाजतगाजत देवीचा ‘आराबा’ बाहेर पडतो. त्यावेळी बालेकिल्ल्यावरील सात बुरूजांना रात्री १२ वाजता नारळ देऊन शांत केले जाते. रात्री १ वाजता मिरवणूक देवळात येते. प्रत्येक मानक-यास मानाचे नारळ दिले जातात. पहाटे ४ वाजता देवीची आरती होऊन गा-हाणे घातले जाते. सायंकाळी ७ कुमारिकांची पूजा केली जाते. देवीला कोहळयाचा बळी दिला जातो आणि उत्सवाची समाप्ती होते.

उत्सवाच्या वेळी देवीचे बारा मानकरी उपस्थित असतात. दस-याच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता सोने लुटण्याचा कार्यक्रम असतो. यानंतर देवीच्या पायथ्याशी असणा-या गणपती मंदिराला भेट देण्यासाठी देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. देवीची पूजा करण्यासाठी चार गुरवांची पूर्वापार नियुक्ती करण्यात आली आहे. पाळीनुसार प्रत्येक वर्षी गुरव बदलला जातो. काही मुस्लीम बांधवही या देवीचे भक्तगण आहेत. महालदार नावाचे मुस्लीम बांधव या देवीच्या मुख्य १२ मानक-यांपैकी एक आहेत.

देवीच्या दर्शनाला कसे यावे

रत्नागिरी एस.टी. स्टँड येथून किल्ला व भगवती बंदर अशा बसेस सोडल्या जातात. या बसचा शेवटच्या थांब्यापासून देवीच्या मंदिरात जाण्यासाठी २० मिनिटे चालावे लागते. रिक्षा किंवा खासगी वाहनाने थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.

1 COMMENT

  1. आपल्या लेखतील हा सदर-

    “भगवतीने कोकणची दिशा ठरविली. ती विशाळगडावरून दर्ग्याचे दर्शन घेऊन हातखंबा येथील कदम यांच्याकडे आली.”

    संदर्भात एक प्रश्न असा पडतो की, त्यावेळीस दर्गा होता काय??

    तशी माहिती काळववि

    बाक़ी लेख सुन्दर
    धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version