Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती राक्षसी प्रवृत्ती

राक्षसी प्रवृत्ती

0

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक राक्षस राहात होता. त्याला आपल्या दैनंदिन सगळ्या कामांसाठी एका माणसाची गरज लागायची. खूप शोधाशोध करून त्याने आपली सगळी कामं करण्यासाठी एका सज्जन माणसाची नियुक्ती केली.

एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक राक्षस राहात होता. त्याला आपल्या दैनंदिन सगळ्या कामांसाठी एका माणसाची गरज लागायची. खूप शोधाशोध करून त्याने आपली सगळी कामं करण्यासाठी एका सज्जन माणसाची नियुक्ती केली. तो माणूस खूपच सज्जन होता. राक्षस सांगेल ते कोणतंही काम तो अगदी नीटनेटकेपणे आणि वेळेत पूर्ण करत असे. सतत तो राक्षसाच्या कोणत्या ना कोणत्या कामात गर्क असायचा.

इतका सज्जन गडीमाणूस मिळूनही राक्षस मात्र आपली दुष्ट प्रवृत्ती दाखवून द्यायचाच. तो त्याला सतत धमकावत असे. कामात जराही विलंब राक्षसाला खपत नसे. त्या गडीमाणसाने जरा जरी कामात विलंब केला तर, ‘मी तुला मारून टाकीन’, अशी धमकी तो राक्षस सतत द्यायचा. तो माणूस त्या महाकाय राक्षसाच्या भीतीनं घाबरून आणखी वेगानं काम करत असे. तो माणूस सतत कामांपेक्षा राक्षसाच्या दहशतीखाली राहायचा.  दिवस-रात्र तो विचार करायचा की, ‘आपण जर काम नीट केलं नाही तर आपल्याला हा राक्षस मारून टाकणार तर नाही ना!’

एकेदिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो सतत काम करत होता. तो इतका थकला होता की, त्याला सुस्ती येऊ लागली. त्याला एक पाऊलही टाकवेना. थोडया वेलाने राक्षस आला. माणसाला बसलेलं पाहून राक्षस त्याच्यावर ओरडला, ‘तुझी अशी रिकामं बसून राहण्याची हिंमत झालीच कशी, चल उठ, कामाला लाग नाहीतर मी तुला खाऊन टाकीन.’ राक्षसाच्या धमकीने माणूस घाबरला.

त्याच्या मनात विचार आला की, तू माणूस आहे व तो राक्षस आहे. ‘धमकावणं’ हे त्याचं काम आणि स्वभाव आहे. तू जोपर्यंत त्याला घाबरशील, तोपर्यंत हा तुला घाबरवत राहणार. एकदा का होईना, याला चोख प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. शेवटी माणसाने मनाची तयारी केली.

आता जे होईल ते होईल पण याला उत्तर हे द्यायलाच हवं, हा पुरुषार्थ त्याच्या मनात जागृत झाला व तो अत्यंत हिंमतीनं त्या महाकाय राक्षसाला म्हणाला, ‘‘सारखं सारखं खाऊन टाकण्याची धमकी का देतोस, खायचे असेल तर मला खाऊन टाक म्हणजे मी पण एकदाचा तुझ्या जाचातून सुटलो.’’ त्याचं हे धैर्य पाहून राक्षसाने आपलं वागणं बदललं.

तात्पर्य : आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यात असे राक्षस आपल्याला घाबरवत असतातच. पण त्यांना किती किंमत द्यायची, हे आपणच ठरवायचं असतं. ज्या दिवशी आपल्यातली भीती सोडून आपण या राक्षसीप्रवृत्तींना सामोरं जातो, तेव्हा ही राक्षसीप्रवृत्ती आपोआप गप्प बसते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version