Home देश ‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’

‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’

1
New Delhi: Opposition members protest in the Rajya Sabha in New Delhi on Tuesday.

गोरक्षकांच्या हिंसक कृत्यावरून समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत हिंदू देवी – देवतांविषयी वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला.

नवी दिल्ली – गोरक्षकांच्या हिंसक कृत्यावरून समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत हिंदू देवी – देवतांविषयी वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी ‘राम का अपमान, नही सहेगा हिंदुस्तान’ अशा घोषणा देत नरेश अग्रवाल यांनी संसदेची माफी मागण्याची मागणी केली. मात्र अग्रवाल यांचे विधान कामकाजातून वगळण्यात आल्याने माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.

राज्यसभा आणि लोकसभेत बुधवारी स्वयंघोषित गोरक्षकांच्या हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्यसभेतील चर्चेदरम्यान  नरेश अग्रवाल यांनी गाय आणि रामाविषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले. अग्रवाल म्हणाले, १९९१ मध्ये राम जन्मभूमीसाठी आंदोलन सुरू होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्हाला मतदारांना स्पष्टीकरण द्यावे लागायचे. भाजपचे काही ठेकेदार जे स्वत:ला विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते समजतात, ते सांगायचे की,  आमच्याकडून प्रमाणपत्र घेऊन येणार नाही ते हिंदू नाही. यानंतर त्यांनी काही ओळी वाचून दाखवल्या ज्या रामभक्तांनी तुरुंगाच्या भिंतीवर लिहील्या होत्या असा दावा त्यांनी केला.

अग्रवाल यांच्या ओळी ऐकताच भाजप खासदार आक्रमक झाले. अनंत कुमार जागेवर उभे राहून अग्रवाल यांनी राज्यसभेची माफी मागावी अशी मागणी केली. अग्रवाल यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे. असे विधान त्यांनी संसदेच्या बाहेर केले असते तर त्यांच्यावर खटलाच दाखल झाला असता असे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही राज्यसभेत या वादावर भाष्य केले. अग्रवाल यांनी हिंदू देवाचे नाव मद्याशी जोडले आहे. यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ह्यराम का अपमान, नही सहेंगा हिंदुस्तान अशा घोषणा भाजप खासदारांनी याप्रसंगी दिल्या.

काँग्रेस खासदार गुलाम नवी आझाद यांनीदेखील गोरक्षकांच्या हिंसाचारावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. गोरक्षेच्या नावाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. व्हॉट्स अॅप मेसेजच्या आधारेही अटक केली जात असून असे झाल्यास प्रत्येकजण तुरुंगातच जाईल असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर दिले की, जमावाकडून एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याच्या घटनांना धार्मिक रंग दिला जात आहे. या घटना गुन्हेगारी स्वरूपाच्या आहेत. त्यांना धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version