Home क्रीडा रिव्हर्स स्विंग रिव्हर्स स्विंग- ३१ जानेवारी २०१४

रिव्हर्स स्विंग- ३१ जानेवारी २०१४

1

 क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामोडी…

१९३४
इंग्लंडचे माजी कसोटीपटू आणि सिलेक्टर ब्रायन बोलस यांचा जन्म. कसोटी कारकीर्दीच्या पहिल्याच चेंडूवर त्यांनी वेस्ट इंडिजचे वेस्ली हॉल यांना चौकार लगावला होता. ते सातच कसोटी सामने खेळले. पण सरासरी ४०पेक्षा अधिक असूनही जेफ्री बॉयकॉट, जॉन एड्रिच अशा फलंदाजांमुळे त्यांना फारशी संधी मिळाली नाही. १९९४ मध्ये ते इंग्लंड संघाचे सिलेक्टर होते.


१९४४
ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू जॉन इनव्हेरॅरिटी यांचा जन्म. ते सहा कसोटी सामने खेळले. टिच्चून फलंदाजी आणि उपयुक्त डावखु-या फिरकीसाठी प्रसिद्ध होते. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट गाजवले.


१९५४
वेस्ट इंडिजचे फलंदाज फाउद बाकस यांचा जन्म. ते १९८३ वर्ल्डकपमध्ये खेळल्यामुळे भारतीयांना परिचित होते. कानपूरमध्ये १९७८-७९ एका कसोटी सामन्यात त्यांनी २५० धावा केल्या. पण त्यांना २६च्या पलीकडे फलंदाजी सरासरी गाठता आली नाही. पुढे ग्रीनिज-हेन्स जोडीचा उदय झाल्यानंतर बाकस यांना संधी मिळण्याची शक्यताच मावळली.


१९७६
मेलबर्नमध्ये या दिवशी ऑस्ट्रेलियन फलंदाज इयन रेडपाथ यांना बाद करून वेस्ट इंडिजचे ऑफस्पिनर लान्स गिब्ज यांनी इंग्लंडचे फ्रेडी ट्रमन यांचा त्यावेळचा सर्वाधिक ३०७ कसोटी विकेटचा विक्रम मोडला. गिब्ज यांची ती शेवटची कसोटी होती आणि त्यांनी घेतलेल्या विकेटची संख्या ३०९ वर स्थिरावली. परिणामी याच विकेट नवा विक्रम म्हणून प्रस्थापित झाला. पण या कसोटी सामन्यानंतरच पुढे फिरकी गोलंदाज उपलब्ध नसल्यामुळे वेस्ट इंडिजने चार-चार वेगवान गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला. गिब्ज यांची निवृत्ती या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरली.


१९७७
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज डेव्हिड टेरब्रुगे याचा जन्म. कारकीर्दीतील पहिल्याच कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने २८च्या सरासरीने नऊ विकेट घेऊन चांगली सुरुवात केली होती. पण १९९०च्या अखेरच्या दशकात दक्षिण आफ्रिकेकडे गुणवान वेगवान गोलंदाजांचा ताफा होता. त्यामुळे काही यथातथा सामन्यांनंतर टेरब्रुगेचा निभाव लागला नाही. त्याला दुखापतींनीही सतावले.


१९९५
हरारे कसोटीच्या नाणेफेकीसाठी झिम्बाब्वेचा कर्णधार अँडी फ्लॉवरने नाणेफेक केली. पाकिस्तानचा कर्णधार सलीम मलिक म्हणाला.. बर्ड! हेड नाही किंवा टेलही नाही! कारण झिम्बाब्वेचे राष्ट्रीय चिन्ह असलेला गरुड नाण्याच्या एका बाजूवर होता. तांत्रिकदृष्टय़ा मलिक बरोबर ठरला, कारण नाणे जमिनीवर स्थिरावले तेव्हा ‘बर्ड’च दर्शनी भागावर होता. मलिकने ‘फलंदाजी करणार’ असे जाहीरही केले. पण सामनाधिकारी जॅकी हेन्ड्रिक्स यांनी हस्तक्षेप करून पुन्हा नाणेफेक करवली. यावेळी फ्लॉवर जिंकला आणि त्याने फलंदाजी घेतली. झिम्बाब्वेने तो सामना डावाने जिंकला!


१९९९
सचिन तेंडुलकरच्या एका अविस्मरणीय खेळीची शोकांतिका. चेन्नईत पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी भारताला हव्या होत्या २७१ धावा. पाच बाद ८१ अशा स्थितीतून भारताला फारशी आशा नव्हतीच. पण सचिनने १३६ धावांच्या खेळीतून भारताला सहा बाद २५४ धावांपर्यंत नेले. विजयासाठी केवळ १७ धावा हव्या असताना सचिन साकलेन मुश्ताकच्या एका ‘दूसरा’वर चकला आणि झेलबाद झाला. उर्वरित फलंदाजांचे पाय लटपटले आणि भारत १२ धावांनी पराभूत झाला.


२००२
शारजातील क्रिकेट मैदानावर खेळवला गेला पहिला कसोटी सामना. अमेरिकेवरील ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यांनंतर पाकिस्तानमधील परिस्थितीही चिघळली. त्यामुळे वेस्ट इंडिजने तेथे जाऊन खेळायला नकार दिला. मग ही मालिका शारजात खेळवण्याचे ठरले. पाकिस्तानने हा सामना १७० धावांनी जिंकला.


२०१०
पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने चेंडूचा चक्क चावा घेतला. एकदा नव्हे तर दोनदा! टीव्ही पंचांनी मैदानावरील पंचांच्या नजरेस ही बाब आणून दिली आणि चेंडू तात्काळ बदलण्यात आला. विशेष म्हणजे आफ्रिदी त्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार होता. त्याच्यावर पुढील दोन टी-२० सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version