Home मनोरंजन मल्टिप्लेक्स रिव्ह्यू: थोडे लिहिले थोडे बाकी

रिव्ह्यू: थोडे लिहिले थोडे बाकी

2

एक हूरहूर, गूढत्व आपल्या मनावर साचून राहताना दिसते. अशाच प्रकारची काही भावना होते ती गजेंद्र अहिरे याच्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटातून.

पोस्टकार्ड
दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे
कलाकार : दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, राधिका आपटे, सुबोध भावे

आपण कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या लहान शहरात गेला असाल तर एक अनुभव तुम्हालाही आला असेल. अशा ठिकाणी पहिले काही दिवस गेल्यानंतर आपल्याला एक प्रकारचा कंटाळा येतो. मग तो घालवायला आपण तिथल्या वाचनालयात जातो. त्या ठिकाणी अनेक जुनी पुस्तकं असतात. गुलाबी नक्षीच्या कागदी पुठ्ठयाच्या कव्हरची ही धुळीनं माखलेली पुस्तकं. त्याला हिरव्या रंगाच्या कॅनव्हासचं बाइंडिंग. या पुस्तकांचा टाइपही जुना. काहींच्या कडा फाटलेल्या, काहींवर एक पिवळसर झाक आलेली. या पुस्तकांमधून आपल्याला कधी कधी एखादा कथासंग्रह हाती लागतो. वरकरणी काहीशा गूढ असलेल्या, विचार करायला लावणा-या, विलक्षण रचनासौंदर्य असलेल्या या कथांशी आपण तादात्म्य पावतो. त्यांच्यातल्या विनोदांनी हसतो, त्यातल्या दु:खांनी डोळे ओले करतो. त्या पुस्तकात आपण अगदी रंगून जातो. तो कथासंग्रह हातावेगळा केल्यावर त्यातल्या कथांची अस्वस्थता कितीतरी वेळ आपल्या मनात राहते. जी. ए. कुलकर्णी वाचत असताना अशाच प्रकारची एक हूरहूर, गूढत्व आपल्या मनावर साचून राहताना दिसते. अशाच प्रकारची काही भावना होते ती गजेंद्र अहिरे याच्या ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटातून.

चित्रपटाची कथा म्हणजे लेखकाचा एक खेळ आहे. एखादा चित्रकार आधी काही रेषा आखत जातो. व पाहता पाहता त्यातून एक विलक्षण असं चित्र निर्माण होते. अशाच प्रकारची काहीशी ही रचना. चित्रपटाच्या नावाप्रमाणे ही कथा आहे पोस्टकार्डची. एक असं माध्यम ज्यात एक व्यक्ती आपल्या भावना दुस-या व्यक्तीला कळवते. ते व्यक्तिगत असतं. मनाच्या खोल गाभा-यातलं असतं. तरीही ते कोणीही वाचू शकेल असं असतं. अशाच प्रकारच्या तीन कथा आपल्यासमोर तिपेडी वेणीप्रमाणे बांधण्यात गजेंद्र यशस्वी झाला आहे. अनेक दिवसांनंतर हा गजेंद्र अहिरेचा खास मनाच्या कुपीतला सिनेमा आहे, असं तो पाहताना सतत जाणवत राहतं.

चित्रपटाला एक कथा नाही. तरीही एक कथा आहे. कथा म्हणाल तर एका पोस्टमनची, त्याच्या कुटुंबाची, त्याच्या पत्नीची. त्याचं जीवन अगदी सुरळीत सुरू आहे. त्यात कोणतंही वादळ नाही. त्याला असलेल्या पगारात तो सुखानं जीवन जगत आहे. आपल्या कुटुंबात तो सुखी आहे. त्याच्या बायकोला असलेली लोकांची पत्र वाचायची एक वाईट सवय सोडली तर त्यांच्यात काही नाराजीही नाही. हळूहळू आपल्या या पोस्टमनगिरीमुळे त्याच्या आयुष्यात विविध प्रसंग येतात, काही माणसं भेटतात. तो आपलं निरोप पोहोचवायचं काम चोखपणे करत जातो. मात्र तरीही त्याच्या आयुष्यात जी वादळं येतात त्याची ही कथा आहे. ती सलगपणे इथे सांगून चित्रपट या कलेचाच अपमान न केलेला बरा.

गजेंद्रने या वेळी आपली सगळी बुद्धिमत्ता, आपली सगळी सर्जनशीलता वापरल्याचं दिसून येत आहे. ही कथा त्याचीच आहे. त्याने घेतलेल्या विविध माणसांचा व त्याच्या वाचनाचा एक आगळावेगळा संबंध या चित्रपटातून दिसून येतो. एकाच वेळेस तीन वेगवेगळया कथा मांडूनही त्यात एकसंधता ठेवण्याची एक विलक्षण कसरत त्यानं या चित्रपटाच्या माध्यमातून लीलया केलेली आहे, त्यात तो यशस्वी झालेला आहे. त्यानं चित्रपटाचा प्रवाहीपणा जरी चांगला जपला असला तरी काही फ्रेम्सच्या प्रेमात पडल्यामुळे काही काही प्रसंग संथ झालेले आहेत. तेवढी एक गोष्ट सोडली तर चित्रपट आपला परिणाम तर साधतोच, त्याचबरोबर एक उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंदही देऊन जातो. त्याने दिलेला हा अनुभव आपल्या मनावर रेंगाळत राहणारा आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडल्याबरोबर विसरून जावा असा हा चित्रपट नाही. या चित्रपटाला एक साहित्यिक परंपराही आहे. त्यामुळे ज्यांनी आपल्या जीवनात जी.ए.कुलकर्णी यांचं लेखन वाचलेले आहे त्यांना या चित्रपटातून एक वेगळीच अनुभूती मिळते. ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी चित्रपटाच्या भाषेतला हा एक वेगळाच जॉनर आहे. ही काही गूढकथा नाही तरी त्यात गूढत्व आहे. अ‍ॅक्शन नाही पण जीवनातल्या विविध परिस्थितींमध्ये नोंदवलेली एक तीव्र प्रतिक्रिया आहे. या कथांमधली माणसं वेडी नाहीत तरी त्यांचे मनोविकार सुस्पष्ट आहेत. चित्रपटातील विविध पात्रांच्या जीवनातील विविध प्रश्नांकडे पाहात असतानाच त्याचं मनोविश्लेषण करण्याचाही एक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. जी.ए. यांची कथा चित्रपटात आणणं वेगळं व त्यांच्या जॉनरच्या कथेवर चित्रपट करणं यातला वेगळेपणा अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. तरीही हा चित्रपट एक विशेष अनुभव आहे. ते मनोरंजन नाही तर मनाला अस्वस्थ करून जाणारं काहीतरी आहे, एवढंच या चित्रपटाच्या संदर्भात आपल्याला बोलता येईल.

गजेंद्रनं या कथांचा पोत वापरून एक वेगळया धाटणीचं काम या चित्रपटातून केलं आहे. त्याच्या फ्रेम असोत, विविध दृश्य चित्रित करण्याची त्याची शैली असो की त्याची एकंदरीत कथा सांगण्याची शैली असो, की या चित्रपटातल्या प्रसंगांसाठी त्याने केलेला संगीत व नृत्यांचा वापर असो, प्रत्येक पातळीवर एक दिग्दर्शक म्हणून त्याची छाप पडलेली आपल्याला दिसून आल्याशिवाय राहत नाही. या चित्रपटाच्या छायांकनातही योगेश राजगुरु यांनी अनेक विलक्षण प्रयोग केले आहेत. जगातील काही चित्रपटांतून चित्रीकरणांच्या शैलींवर त्या त्या देशाची छाप दिसून येते. इराण, इराक इथल्या कॅमे-याची पद्धत वेगळी, फ्रान्समधल्या कॅमे-याची पद्धत वेगळी तर अगदी हॉलिवुडमधल्या चित्रपटांची पद्धत वेगळी. या चित्रपटातून सुरेश देशमाने यांनी एक खास भारतीय कॅमे-याच्या फ्रेमची पद्धत विकसित केल्याचं दिसून येतं. त्यांनी वापरलेले लाँग, मीडियम लाँग व क्लोज शॉट यांचा एक अनोखा संगम यात दिसून येतो. त्याचं एक उदाहरण इथे देतो. एका प्रसंगात पोस्टमन बैलगाडीतून दुस-या गाडीत जात असतो. त्यावेळी दुरुन ती गाडी दिसते. ती जवळ आल्यावर पोस्टमन दिसतो, त्यानंतर मीडियम शॉटमध्ये गुलजार हे एक पात्र दिसतं व त्यानंतर लगेच गुलजार या पात्राचा एक क्लोज. अहा.. काय जबरदस्त कॉम्बो या निमित्तानं त्यांनी साधलेला आहे. या चित्रपटात अशाच प्रकारच्या तंत्राच्या अनेक आनंदमय लहरी आपल्याला जाणवतात. तोच आनंद या चित्रपटाच्या संगीतातून व पार्श्वसंगीतातूनही दिसून येतो.

हा चित्रपट अनेक पात्रांच्या मनोविकारांचा चित्रपट आहे. त्यामुळे त्यासाठी सशक्त अभिनेत्यांची एक फौज असणं आवश्यक आहेच. केवळ नावं सांगितली तरी ते पुरेसं होईल असं या लोकांचं आतापर्यंतचं कर्तृत्व आहे. दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी, सई ताम्हणकर, राधिका आपटे, सुबोध भावे अशा सर्वच कलाकारांनी आपल्याला मिळालेल्या एका एका फ्रेममध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. कोणाच्याही कामात डाव-उजवं नाही. सगळ्यांचाच अभिनय उजवा असा अनुभव या चित्रपटातून दिसून येतो. हा अनुभव सगळ्यांनीच घ्यावा असा आहे. ज्यांना केवळ मनोरंजनासाठी चित्रपट पाहायचा असतो त्यांनीही कधी तरी अनवट वाटेनं चालण्याचा आनंद घ्यायचाच, अशा विचाराने हा चित्रपट पाहावा. हा अनुभव तुमची अभिरुची समृद्ध करून जाणारा ठरेल.

2 COMMENTS

  1. Cinematography is done by Mr. Yogesh Rajguru and not by Mr. Suresh Deshmane. Thank you for compliments as considering this is work of Suresh sir itself is big compliment for new cinematographer like me. Warm regards

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version