Home कोलाज रेल्वेचे दोन क्लास

रेल्वेचे दोन क्लास

1

विचार करावासा वाटतो, की सेकंड क्लासमधे दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लासमधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? हा महिमा क्लासचा असतो, की आणि कशाचा? क्लासचा परिणाम लोकांच्या वृत्तीवर होतो, की लोकांच्या वृत्तीचा परिणाम क्लासमधे दिसतो?

मुंबई रेल्वे ही भारतातल्या सर्वाधिक गर्दीच्या परिवहन सेवांपैकी एक आहे. दररोज सुमारे २५०० लोकल सेवा या मार्गावर धावतात आणि सरासरी ७५ लाख प्रवाशांची ने-आण करतात. या रेल्वेचं मुंबईकरांशी असलेलं नातं, मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबई बाहेरच्यांनाही जवळचं वाटणारं आहे.

‘जवळचं’ म्हणताना गर्दी, चेंगराचेंगरी नाही आठवली तरच नवल. प्रचंड गर्दीच्या या मुंबईतील लोकल प्रवासात, भाग्यवंतांनाच बसायला मिळतं, एरवी घोडय़ासारखं उभं राहाण्यावाचून पर्याय नसतो. घोडाही नीट सरळ उभा रहात असेल, पण गर्दीच्या वेळी लोकलमधे सरळ उभं राहाणंही दुरापास्त असतं.

या लोकलमध्ये दोन ‘क्लास’ असतात. एक प्रथम दर्जा म्हणजे फर्स्ट क्लास तर दुसरा द्वितीय दर्जा म्हणजे सेकंड क्लास. त्यापैकी फर्स्ट क्लासमधला माझा एक अनुभव आहे. यातील लोकं फर्स्ट क्लास दिसण्यापुरतीच मर्यादित असतात. म्हणजे असं की एकदा नेहमीप्रमाणे फर्स्ट क्लासमधून प्रवास होत होता.

गर्दी बरीच होती आणि बसायला सोडाच, उभं राहायलाही जागा नव्हती. माणसं ‘सो मच ऑफ क्राउड’, ‘डिस्गस्टिंग वगरे म्हणंत चुकचुकत होती. दोन सीटच्या मधील जागेत जाऊन मी उभा राहिलो होतो. एक व्यक्ती पुढील स्टेशनवर उतरण्यासाठी उठला. तेव्हा जागा रिकामी झाली, असं बघून मी बसण्यासाठी सरसावलो.

चौथी वाटणारी ती जागा खरं तर तिस-या माणसाची होती. खिडकीजवळची व्यक्ती आणि तिच्या बाजूची व्यक्ती पाय इतके पसरवून बसल्या होत्या की तिसरी जागा केवळ अर्धा फूटच उरली होती. मी बसणार हे ताडताच दुस-या बसलेल्या व्यक्तीने पाय अजूनच जरा पसरवले.

एकंदरीतच माजोरडेपणाचा आव बघून मला तिथे बसणं प्रचंड अपमानास्पद वाटायला लागलं आणि मी तितक्याच शांतपणे पुन्हा उभा राहिलो. बाजूला उभे असलेले एक वृद्ध गृहस्थ मात्र नाईलाजाने त्या चार-पाच इंचात स्वत:ला बसवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे पाय दुखत असावेत बहुदा. या ठिकाणी तोंड उघडायची मला इच्छाही न होता त्या आणि त्याच्यासारख्या माणसांची कीव वाटू लागली.

याच्या उलट एक दिवस सेकंड क्लासमधून प्रवास करत असताना आलेला अनुभव. गर्दी साधारण तितकीच होती. वेळही तीच होती. मी असाच दोन सीटच्या मधे उभा होतो आणि जागा मिळण्याच्या आशेवर होतो. गाडी मुंबई सीएसटी वरून कल्याणला जात होती आणि विक्रोळीच्या आसपास होती. मला ठाण्याला उतरायचं होतं.

खिडकीजवळची व्यक्ती माझ्याकडे बघून डोळ्याने मला खुणावू लागली. ‘काय?’ असं विचारलं असता म्हणाली ‘बसताय?’. मी म्हटलं, ‘नाही ठीक आहे, तुम्ही कुठे उतरणार?’ ‘मी कल्याणला. पण तुम्ही बसा. मी आत्तापर्यंत बसलोयच की.’ हो-नाही करताना शेवटी तो उठूनच उभा राहिल्यावर मी बसलो. त्याचा माझा
काहीही संबंध नव्हता, की मी त्याला सीट मागितली नव्हती. पण तरीही त्याने स्वत:हून देऊ केली.

वर नमूद केलेल्या दोनही अनुभवांसारखे अनुभव अनेकदा आलेले आहेत, त्या त्या ‘क्लास’मध्ये. पण विचार हा करावासा वाटतो, की सेकंड क्लासमध्ये दिसलेलं, हे फर्स्ट क्लास सौजन्य, फर्स्ट क्लासमधे गेल्यावर थर्ड क्लास माजाचं रूप कसं घेतं? हा महिमा क्लासचा असतो, की आणि कशाचा? क्लासचा परिणाम लोकांच्या वृत्तीवर होतो, की लोकांच्या वृत्तीचा परिणाम क्लासमधे दिसतो? लहान मुलं जशी सगळी खेळणी मीच खेळणार, असा हट्ट करून सख्या भावंडालाही देत नाहीत, तो स्वभाव मोठेपणीही कायम राहातो असं मानायचं का?

काहीही असलं तरी अशा अनेक अनुभवांतून हे कळत गेलं, की फर्स्ट क्लासमधे उभं राहावं लागलं, तर बसायला मिळण्याची आशा करू नये आणि सेकंड क्लासमधे बसायला मिळालं तर मात्र समजून उमजून दुस-या उभ्या व्यक्तीला जागा दिली पाहिजे. अर्थात सरतेशेवटी फर्स्ट क्लासशी फारकत घेण्यातच शहाणपण आहे, असा निर्णय झाला. ‘डिस्गस्टिंग’ अहंकाराच्या सुटसुटीतपणापेक्षा गर्दीची अप्रिय जवळीक बरी. त्यातही अधून मधून मिळणारी सौजन्याची झलक जो आनंद देते, तो फर्स्ट क्लासमध्ये होणा-या अपमान आणि मनस्तापापेक्षा कैकपटीने बरा वाटतो.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version