Home क्रीडा रोनाल्डोला ‘गोल्डन बॉल’

रोनाल्डोला ‘गोल्डन बॉल’

4

पोर्तुगाल आणि रेआल माद्रिदचा ‘स्टार’ फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफाच्या ‘गोल्डन बॉल’ पुरस्कारावर नाव कोरले. 

झ्युरिच : अर्जेटिना आणि बार्सिलोनाचा लिओनेल मेसीची चार वर्षाची मक्तेदारी मोडीत काढताना पोर्तुगाल आणि रेआल माद्रिदचा ‘स्टार’ फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफाच्या ‘गोल्डन बॉल’ पुरस्कारावर नाव कोरले.

‘गोल्डन बॉल’ २०१३ पुरस्कारासाठी २८ वर्षीय रोनाल्डोसमोर मागील चार वर्षातील विजेता मेसीसह फ्रान्सचा फ्रँक रिबेरीचे आव्हान होते. मात्र २७.९९ टक्के मते मिळवत रोनाल्डोने बाजी मारली. मेसी (२४.७२ टक्के) आणि रिबेरीला (२३.३६ टक्के) अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ‘गोल्डन बॉल’ जेतेपदाचा ‘पंचक’ पूर्ण करण्यासाठी मेसी उत्सुक असला तरी यावेळी रोनाल्डोचे पारडे जड होते. झ्युरिचमध्ये सोमवारी झालेल्या पुरस्कार सोहळय़ादरम्यान रोनाल्डोच्या कुटुंबियातील सात सदस्य उपस्थित होते. रोनाल्डोचा क्लब असलेल्या रेआल माद्रिदने पुरस्कार सोहळय़ाचे थेट प्रक्षेपण केले होते. चाहत्यांचे वाढते प्रेम पाहता पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात रोनाल्डोला अश्रू अनावर झाले.

अन्य पुरस्कारांमध्ये अपेक्षेप्रमाणे बायर्न म्युनिचचे जुप हीकनेस यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार पटकावला. जर्मनीची गोलकीपर नॅडिन अँगररने महिलांचा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार मिळवला. जर्मनीच्या सिल्व्हिया नीड सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक ठरल्या. महान फुटबॉलपटू, ब्राझीलचे पेले यांना विशेष मानद ‘गोल्डन बॉल’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version