Home क्रीडा ‘लगोरी’ची सातासमुद्रापार भरारी

‘लगोरी’ची सातासमुद्रापार भरारी

1

एकावर एक सात दगड ठेवून रचलेली लगोरी चेंडूने नेम धरून फोडणे आणि विस्कळीत झालेले दगड प्रतिस्पर्धी संघाचा चेंडूचा मारा चुकवत रचण्याच्या हा खेळ बालपणात अनेकांनी खेळला आहे.

मुंबई – एकावर एक सात दगड ठेवून रचलेली लगोरी चेंडूने नेम धरून फोडणे आणि विस्कळीत झालेले दगड प्रतिस्पर्धी संघाचा चेंडूचा मारा चुकवत रचण्याच्या हा खेळ बालपणात अनेकांनी खेळला आहे. बालपणातील हा लगोरी खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत भारताच्या ज्युनियर संघाने सुवर्णपदक पटकावले आहे.

या खेळाला सरकाकडूनही मान्यता मिळावी आणि ऑलिंपिकमध्येही त्याचा समावेश व्हावा, यासाठी आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती या संस्थेचे सचिव संतोष गुरव यांनी ‘प्रहार’ला दिली. मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यात लगोरी खेळाच्या संघटना आहेत. ‘मुंबई’तील चार मुले राष्ट्रीय पातळीवरील लगोरी संघांमध्येही खेळली आहेत. या पारंपरिक खेळाची पहिली-वहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा नुकतीच भूतानमध्ये झाली.

मात्र हा आपला पारंपरिक खेळ असला तरी या स्पर्धेत बांगलादेश आणि नेपाळ यांनी वरिष्ठ स्तरावर सुवर्णपदके पटकवली असून भारताला ज्युनियर स्तरावरील मिळालेल्या सुवर्णपदकावर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी लगोरीसारखा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला हे महत्त्वाचे असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले.

नागोठणेसारख्या गावातील रहिवासी संतोष गुरव आणि त्यांचे कुटुंबीय लगोरी खेळ वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. संतोष यांचे भाऊ भरत हेदेखील आंतरराष्ट्रीय लगोरी खेळाचे पंच आहेत. स्वत: आंतरराष्ट्रीय स्तरावर वुडबॉल खेळणारे संतोष यांनी हा खेळ वाढवण्यासाठी नागोठण्यातूनच या खेळाचा प्रसार करायला सुरुवात केली. त्यांनी या खेळाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही सांगितली.

महाभारतात श्रीकृष्णाने बालपणी संवगडय़ांसोबत हा खेळ खेळल्याचे म्हटले जाते. संत एकनाथांच्या गाथेतही २७१-३०० या पानांवर या खेळाचा उल्लेख दिसतो. पेशवेकाळात जे मान्यताप्राप्त खेळ होते त्यातही लगोरी खेळाचा समावेश होता,’’ असे संतोष आवर्जून सांगतात.

लगोरी खेळ तीन वर्षे मोठय़ा पातळीवर खेळला जात आहे त्यामुळे पुढील वर्षापर्यंत त्याला राज्य सरकारची मान्यता मिळेल आणि शाळांमध्येही या खेळाच्या स्पर्धा भरवल्या जातील, असा विश्वास संतोष यांना आहे. खेळाच्या प्रसारासाठी त्यांनी सुरुवातीला भारतात विविध ठिकाणी दौरे करून विविध राज्यांना लगोरी खेळाचे महत्त्व पटवून दिले.

फक्त भारतातच नाही तर नेपाळ, भूतान, बॅँकॉकसारख्या देशांमध्ये जाऊनही त्यांनी लगोरी खेळासाठी पुढाकार घेतला. त्यातच भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या देशांतही लगोरीची परंपरा असल्याने त्या देशांनी लगेचच खेळाच्या विकासाला मान्यता दिली. त्यातून आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघ निर्माण झाला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. सध्या जवळपास १५ देशांमध्ये आणि भारतातील २६ राज्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. प्रत्येक राज्यात आणि हा खेळ खेळणा-या देशांत लगोरी खेळाचे नाव वेगळे आहे.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लगोरी स्पर्धेत भारतासह अन्य देशांनीही विजय नोंदवले. ते पाहता परदेशातही हा खेळ गंभीरपणे खेळला जात असल्याचे संतोष म्हणाले. आशियाई आणि ऑलिंपिकपर्यंत हा खेळ पोहोचावा म्हणून खेळाच्या नियमांत बदल करण्यात आल्याचेही संतोष यांनी सांगितले.

पूर्वी हा खेळ लाकडाच्या लगो-या वापरून खेळला जात असे. परंतु आता प्लॅस्टिकच्या लगो-या वापरूनही हा खेळ खेळला जात आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये क्रीडापटूंना दुखापत होण्याची शक्यता असलेली साहित्ये वज्र्य असतात. त्यामुळे आम्ही लगोरीच्या नियमांत आणि क्रीडा साहित्यांत बदल केला आहे.
– संतोष गुरव, सचिव, आंतरराष्ट्रीय लगोरी महासंघ

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version