Home मनोरंजन मल्टिप्लेक्स लव्हेबल लव्हस्टोरी

लव्हेबल लव्हस्टोरी

1
प्यार वाली लव्ह स्टोरी दिग्दशक : संजय जाधव कलाकार : स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये, उर्मिला कोठारे

प्यारवाली लव्ह स्टोरी हा संजय जाधव याचा सिनेमा हा कथेचा तर आहेच आहे त्याचबरोबर त्यातून दिसणा-या व न दिसणा-या माणूसकीचा आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी
दिग्दशक : संजय जाधव
कलाकार : स्वप्निल जोशी, सई ताम्हणकर, समीर धर्माधिकारी, उपेंद्र लिमये, उर्मिला कोठारे

प्रत्येकाची कामाची एक पद्धत ठरून गेलेली असते. ती व्यक्ती आपल्या या शैलीनुसारचं कोणतही काम करेल असं आपल्याला नेहमी पाहायला मिळेल. एखाद्या  सरकारी कार्यालयातला लिपीक सर्वच गोष्टी अगदी सावकाशीने करत असतो. किंवा अशाच प्रकारे इतरही सर्व व्यवसायिक आपल्या शैलीतचं काम करतांना दिसतात. दिग्दर्शक संजय जाधव हा मुळचा एक यशस्वी कॅमेरामन, त्याची काम करण्याची एक पद्धत ठरून गेलेली आहे. तो आधी लायटिंग करणार, मग तो कॅमे-याचे लेन्स चेक करणार, ट्रॉली लावणार, त्यानंतर तो अ‍ॅंगलं चेक करणार या सा-या गोष्टी झाल्या की मग तो प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात करणार. ही त्याची कामाची मुळ पद्धत मग कधी कधी त्याच्या चित्रपटांमधूनही दिसून येत असते. तो चित्रपट सुरू करतो, त्यानंतर तो आपल्यासमोर एका एका पात्रांना प्रस्थापित करतो. त्यानंतर तो घडणा-या कथेला हात घालतो, व शेवटी त्या कथेचा आपल्याला अंत दाखवतो.

प्यारवाली लव्ह स्टोरी हा संजय जाधव याचा सिनेमा हा कथेचा तर आहेच आहे त्याचबरोबर त्यातून दिसणा-या व न दिसणा-या माणूसकीचा आहे. माणसांचा आहे, पात्रांचा आहे. तो केवळ एक कथाच दाखवत नाही तर परिस्थितीनुसार बदलणा-या माणसांच्या मनोवृत्ती दाखवून जातो. याच बरोबर तो गर्दीचं मानसशास्त्रही अधोरेखित करतो. हा चित्रपट पाहण्याआधी आपल्याला केवळ एक कथा पाहायची आहे एवढा संकुचित विचार करता येत नाही. वास्तविक चित्रपटाची कथा साधारण आहे. ही एक प्रेमकथा आहे. दोन वेगवेगळया धर्मातल्या प्रेमिकांची आहे. एकदा का धर्माचा विचार आला की प्रेमासारखी एक सुरेख गोष्ट ही काही जणांच्या नजरेत वाईट ठरते. ती इतकी वाईट ठरत जाते की त्यातून एक नवीन सुडनाटय़ तयार होत राहातं. या चित्रपटाची कथा सांगण्यापेक्षा या चित्रपटातल्या इतर गोष्टींवर बोललेलं बरं. कारण या चित्रपटाच्या कथेत एक दिग्दर्शक म्हणून संजय ने आपल्यापुढे आष्टद्धr(155)र्याचे अनेक सुखद, दुख:द असे धक्केही पेरलेले आहेत. एका लहानशा कथाबिजावर एका मोठया चित्रपटाचा डोलारा सांभाळण्याचं शिवधनुष्यही त्याने पेललेलं आहे हे निश्चित. ते पेलतांना व तोल सांभाळता सांभाळता जे काही डगमगणं झालयं त्याचा अपवाद वगळता त्याने एक प्रभावी प्रेमकथा मांडली आहे हे निश्चितपणे म्हणावं लागेल.

या चित्रपटाला मुंबईतल्या चाळसंस्कृतीची, हिंदू मुस्लीम ऐक्याची त्याचबरोबर मुंबईत झालेल्या १९९२ च्या जातीय दंगलीची पार्श्वभूमी आहे. असं असलं तरी या चित्रपटातून त्याने हे शहर व या शहरातल्या लोकांची एक खास मानसिकताही अगदी अचूक टिपली आहे. गणेश नगर या एक काल्पनिक नगरातली ही कथा मग संपूर्ण मुंबइचीच होऊन जांतांना आपल्याला दिसते. या चित्रपात त्याने अगदी ठाशीवपणे एक एक पात्र अगदी अचूकपणे रंगवलेले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून एक कोरी करकरीत प्रेमकथाही तो अपाल्याला दाखवतो. कोरीकरकरीत हे विशेषण त्याच्या निर्मितीमूल्यासाठी आहे.

या चित्रपटात मराठीतल्या अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. समीर धर्माधिकारी याने आपल्या नेहमीच्या पठडीतल्या भूमिकेपेक्षा एक वेगळयाच धाटणीची अशी भूमिका केली आहे. त्याला तितकीच जबरदस्त अशी साथ दिलीय ती उर्मिला कोठारे हिने. आतापर्यतं तिच्या अनेक सोज्वळ अशा भूमिका प्रेक्षकांनी पाहिलेल्या आहेत. या चित्रपटात मात्र ती चाळीतल्या एका बिनधास्त शिवराळ  मुलीची भूमिका करत आहे. ही भूमिका तिने एका शैलीत जरी केली असली तरी आपल्या भूमिकेच्या इतरही सर्व संवेदना तिने अगदी समर्थपणे दाखवल्या आहेत. तिच्या आतापर्यंतच्या भूमिकांमधली ही एक महत्त्वाची भूमिका आहे असं म्हणता येईल. या चित्रपटात उपेंद्र लिमये याने कादर ही एक अतीशय संवेदनशील भूमिका मोठय़ा  समर्थपण केली आहे. एक सच्चा मित्र, आपल्या बहिणीच्या भविष्याची काळजी असलेला एक भाऊ, ते एक जबरदस्त वैरी अशी याच्या भूमिकेची अनेक अंगे आहेत. या चित्रतटातून दाखवण्यात आलेली प्रेमकथा आहे ती अमर (स्वप्निल जोशी) व आलीया (सई ताम्हणकर) यांची. या दोघांनीही आपल्या भूमिकांना एक वेगळयाच उंचीवर नेऊन ठेवलेलं पाहायला मिळतं. स्वप्निल ने साकारलेला आत्मविश्वासु, प्रेमळ युवक मोठया ताकतीने व शैलीने पेश केलेला आहे. सई दिसली छान व तिनेही आलीयाच्या या भूमिकेचा पोत सांभाळला आहे. या चित्रपटातून अनेक जबरदस्त गोष्टी जरी संजय ने आपल्याला दाखवल्या असल्या तरीही या चित्रपटात पात्रांच्या प्रस्थापनेवर अधिक भर दिल्यामुळे हा चित्रपट मध्ये काहीसा रेंगाळलेला वाटतो. त्यातही या प्रेमकथेची व त्या निमित्ताने होणा-या गुंतागुंतीतून सुटका कशी करायची याच्या बाबतीतही दिग्दर्शक काहीसा गोंधळलेला दिसला. तरीही तो एक सिद्धहस्त दिग्दर्शक असल्याने त्याने शेवटाला या सा-या गोष्टींवर विजय मिळवला व आपल्या प्रेक्षकांना एक ग्रे चित्रपट पाहिल्याचं समाधान दिलं. काही काही प्रसंग मात्र अगदी फिल्मी झाले आहेत. त्य़ात अधिक वास्तवेची भर पडायला हवी होती असं राहून राहून वाटत राहात.

संजयचे चित्रपट म्हणजे तंत्राच्या दृष्टीकोनातून एक मोठी मेजवानीच असते. याही चित्रपटातून ती आपल्याला मिळते. या चित्रपटाचे प्रमुख वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे लोकेशन, या चित्रपटासाठी पनवेलच्या सुर्वे फार्म इथे एक भव्य असा सेट उभारण्यात आला होता. त्याच बरोबर या चित्रपटातून प्रसाद भेंडे यांच्या कॅमे-याचेही वेगवेगळे रंग पाहण्याची संधी मिळालेली आहे. संगीताच्या बाबतीतही या चित्रपटातून नवे प्रयोग करण्यात आले आहेत. ते लवकरचं मराठी चित्रपटाचे ट्रेडसेटर ठरण्याची शक्यता आहे. ही आगळीवेगळी प्रेमकथा खरोखरचं पाहण्यासारखी आहे. त्यातही या चित्रपटातून दंगलीच्या दृश्यांचे जे सादरीकरण ज्या संयमाने करण्यात आले आहे त्यालाही तोड नाही. एक परिपूणं असा हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसला तरी तो एक चांगला चित्रपट पाहण्याचं समाधान मात्र नक्कीचं देणारा आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version