Home क्रीडा भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

भारताचा वेस्ट इंडिजवर विजय

1

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजीकरताना भारताने सात बाद २६३ धावा केल्या आहेत.

नवी दिल्ली- सांघिक कामगिरी उंचावतानाच दुसरी वनडे ४८ धावांनी जिंकत भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. फिरोजशा कोटला मैदानावर शनिवारी झालेल्या लढतीत यजमानांच्या २६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्यांचा डाव २१५ धावांत संपला.

सलामीवीर ड्वायेन स्मिथची (९७) फटकेबाजी, त्याने डॅरेन ब्राव्होसह (२६) दिलेली अर्धशतकी सलामी तसेच कीरॉन पोलार्डला (४०) गवसलेला सूर पाहता ४०व्या षटकापर्यंत वेस्ट इंडिजचे पारडे जड वाटत होते. मात्र त्यानंतर पारडे फिरले. मध्यमगती मोहम्मद शामी (चार विकेट) तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाच्या (तीन विकेट) अचूक मा-यामुळे पाहुण्यांची मधली फळी कोसळली. पाच षटकांत सहा विकेट पडल्या. पहिल्या वनडेत चमकलेले मार्लन सॅम्युअल्स (१६) आणि दिनेश रामदीन (३) सातत्य राखण्यात अपयशी ठरले.

फलंदाजीपाठोपाठ भारताची गोलंदाजीही सुधारली. यजमानांच्या गोलंदाजांनी केवळ दोन अवांतर धावा दिल्या.

त्याआधी विराट कोहलीसह सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग ढोणीच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुस-या वनडे शनिवारी वेस्ट इंडिजसमोर २६४ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

रैना आणि कोहलीने अनुक्रमे ३०वे आणि ३१वे अर्धशतक ठोकतानाच चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी करताना भारताला सावरले. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग ढोणीच्या फटकेबाजीमुळे यजमानांना ५० षटकांत ७ बाद २६३ धावांची मजल मारता आली. वास्तविक पाहता नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या वनडे अर्धशतक झळकावणारा सलामीवीर शिखर धवनला (१) जेरॉम टेलरने वैयक्तिक पहिल्या आणि डावातील दुस-या षटकात त्रिफळाचीत केले. कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर उतरवताना अंबाती रायडूला ‘वनडाउन’ म्हणून बढती दिली. त्याने अन्य सलामीवीर रहाणेसह  दुस-या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या तरी धावगती फारच कमी होती. रहाणेने (१२) पुन्हा निराशा केली तर रायडूला (३२) मोठी खेळी करण्यात अपयश आले.

१८व्या षटकात ३ बाद ७४ धावा अशी स्थिती असताना कोहली आणि रैनाने जबाबदारीपूर्वक फलंदाजी करताना भारताला सुस्थितीत आणले. कोहली आणि रैनाने प्रत्येकी ६२ धावा फटकावल्या. मात्र कोहलीच्या (५ चौकार) रैना (५ चौकार आणि २ षटकार) थोडा आक्रमक खेळला. चार षटकांच्या फरकाने ही जमलेली जोडी परतल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने सामन्याची सूत्रे आपल्याकडे घेतली. ५५वे अर्धशतक ठोकणाऱ्या त्याच्या ४० चेंडूंतील नाबाद ५१ धावांच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रवींद्र जडेजा (६) लवकर बाद झाला तरी भुवनेश्वर कुमारने (१८) ढोणीला चांगली साथ दिली.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी (विशेष करून जेरॉम टेलर) सुरुवातीला अचूक मारा केला. तीन विकेट घेणारा टेलर सर्वाधिक यशस्वी ठरला. मात्र रैना, कोहली आणि ढोणीच्या फटकेबाजीमुळे कर्णधार ड्वेन ब्राव्होला तब्बल आठ गोलंदाज वापरावे लागले. त्यातील पाच जणांना विकेट मिळाली.

काळी फित बांधून निषेध

वेस्ट इंडिज क्रिकेटपटूंनी खेळावर अधिक लक्ष केंद्रित केले तरी बोर्डाचा अन्याय अद्याप ते विसरलेले नाहीत. मानधनातील कपातीचा निषेध म्हणून सर्व क्रिकेटपटू दंडाला काळी फित बांधून खेळले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version