Home महाराष्ट्र विठ्ठल दर्शनासाठी आता टोकन पद्धत!

विठ्ठल दर्शनासाठी आता टोकन पद्धत!

0

कार्तिकी यात्रेपासून तिरुपतीच्या धर्तीवर प्रारंभ

पंढरपूर – विठुरायाच्या दर्शनासाठी ऊन-पाऊस याची तमा न बाळगता ३०-३० तास दर्शनरांगेत उभ्या राहणा-या भाविकांसाठी मंदिर समितीने एक गोड निर्णय घेतला असून आता यापुढे विठुरायाचे दर्शन तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दिले जाणार. या टोकनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

गुरुवारी झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून येत्या कार्तिकी यात्रेपासून याची सुरुवात करण्याची तयारी मंदिर समितीने सुरू केल्याचे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी सांगितले. विठ्ठलाचे दर्शन म्हटले की डोळ्यासमोर येते ८-१० किलोमीटर लांबच लांब दर्शन रांग आणि त्यात दर्शनाच्या ओढीने उभे असलेले हजारो विठ्ठल भक्त. विठ्ठलाचे दर्शन सुलभ करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र याबाबत यापूर्वीच्या कोणत्याच समितीने गांभीर्याने लक्ष न दिल्याने विठ्ठल दर्शन अनेक यातना सोसून भाविकांना घ्यावे लागत होते. या निर्णयाने दर्शन अधिक सुलभ होणार आहे. भाविकांना टोकन दिले जाईल व त्यावर दर्शनाची वेळ दिली जाईल. त्यामुळे दोन दोन दिवस दर्शन रांगेत तिष्ठत थांबावे लागणार नाही.

विठुरायाच्या दर्शनासाठी वषार्तून सव्वा ते दीड कोटी भाविक पंढरपूरला येत असल्याने त्यांना सुलभ दर्शन देण्यासाठी सुरू होणा-या या टोकन दर्शन व्यवस्थेचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार असल्याने यासाठी समिती अथवा भाविकांना आर्थिक झळ बसणार नाही. याशिवाय भाविकाला पंढरपुरात आल्यावर आपल्या दर्शनाची नक्की वेळ समजणार असल्याने उरलेल्या वेळेत तो खरेदी व इतर भागाचे पर्यटन करण्यास मोकळा राहणार आहे. एका मिनिटाला सर्वसाधारणपणे ५० भाविक विठ्ठलाचे दर्शन घेतात, त्यानुसार तासाला ३ हजार भाविक गृहित धरून रोज तेवढेच टोकन भाविकांना दिले जाणार आहेत.

बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन आणि मंदिर परिसरात टोकन देणारे स्टोल समिती उभारणार असून आलेल्या दर्शनासाठी भाविकाला प्रथम आपल्या दर्शनाचे टोकन घ्यावे लागणार आहे. या व्यवस्थेनंतर आता ऑनलाईन दर्शन व्यवस्था आणि मुखदर्शन व्यवस्थेचा देखील विचार केला जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version