Home महामुंबई विम्याच्या नावे फसवणारे त्रिकूट गजाआड

विम्याच्या नावे फसवणारे त्रिकूट गजाआड

0

दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व बजाज अलायन्झ आदी विमा कंपन्यांच्या नावाने बनावट शिक्के व प्रमाणपत्रे तयार करून शेकडो वाहनचालकांची फसवणूक करणा-या त्रिकुटाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली- दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व बजाज अलायन्झ आदी विमा कंपन्यांच्या नावाने बनावट शिक्के व प्रमाणपत्रे तयार करून शेकडो वाहनचालकांची फसवणूक करणा-या त्रिकुटाला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अनिल गिरीधारीलाल कलानी, कुमार सुग्रीव मुराव, तुषार बागूल अशी अटक आरोपींची नावे आहेत. या त्रिकुटाकडून पोलिसांनी ७५ बनावट विमा प्रमाणपत्रे, बनावट शिक्के, संगणक, स्कॅ नर, प्रिंटर आदी साहित्य जप्त केल्याचे कल्याण परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी सांगितले.

दावडी गाव येथे राहणारे रणधीरसिंग हरिसिंग पाटील यांच्या मोटारसायकलचे विमा प्रमाणपत्र बनावट असल्याने त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी बनावट विमा प्रमाणपत्राचे वितरण करणारी एक टोळी कार्यरत असल्याची खबर काढली होती. या माहितीच्या आधारे उल्हासनगर येथे राहणारा अनिल कलानी या एजंटला अटक केली. त्याला पोलिसांनी हिसका दाखवल्यावर उल्हासनगर येथे राहणारा त्याचा साथीदार कुमार याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

तुषार हा अंबरनाथ येथील सायबर कॅफेत दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनीचे प्रमाणपत्र तयार करत असे. डोंबिवली ते अंबरनाथपर्यंत हे रॅकेट कार्यरत होते. जवळपास सातशे ते आठशे वाहनचालकांना त्यांनी बनावट विमा कंपनीचे सर्टिफिकेट वितरित केल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटमधील आणखी दोन एजंटचा शोध सुरू असल्याचे कुंभारे यांनी सांगितले. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय पांढरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version