Home कोलाज वैचारिक स्वातंत्र्याची विचित्र शोकांतिका : हिंदू धर्म

वैचारिक स्वातंत्र्याची विचित्र शोकांतिका : हिंदू धर्म

1

धर्माची भारतीय व्याख्या जरी ‘यत् धारयति स धर्म:’ अशी असली तरी प्रत्यक्षात संपूर्ण समाजाचे धारण, पोषण, रक्षण करणारी व्यवस्था असे हिंदू धर्माचे स्वरूप फार काळ राहू शकले नाही.

आदर्श आणि प्रत्यक्ष आचरणातील प्रचंड दरी

धर्माची भारतीय व्याख्या जरी ‘यत् धारयति स धर्म:’ अशी असली तरी प्रत्यक्षात संपूर्ण समाजाचे धारण, पोषण, रक्षण करणारी व्यवस्था असे हिंदू धर्माचे स्वरूप फार काळ राहू शकले नाही. कारण ज्या चातुवण्र्य व्यवस्थेचा स्वीकार करून हिंदू धर्माने, खरे तर पुरोहित वर्गाने आणि वरिष्ठ जातींनी, या विषमतावादी व्यवस्थेला अनुमती दिली त्यांच्या फायद्याशिवाय या व्यवस्थेत इतरांचे ‘धारण’ असे काहीच नव्हते.

उत्पादक श्रम करणा-या आणि समाजाला महत्त्वाच्या सेवा देणा-या समाजघटकांना, अत्यंत हीन वागणूक आणि अनुत्पादक अवडंबर माजविणा-याना सन्मान आणि सर्व अधिकार असे जातीव्यवस्थेचे स्वरूप राहिले.

आर्थिक आणि राजकीय सत्ता निवडक जातींकडे राहिल्याने ही व्यवस्था बहुतांश लोकांच्या तोटयाची असूनही सुरू राहिली, कारण बहुसंख्यांकडे संघटनही नव्हते आणि ज्ञान, शिक्षण, विचार या अमूर्त संपत्तीचेही अधिकार त्यांना कधीच मिळू नयेत अशी व्यवस्था रचली गेली होती. यातून हिंदू धर्मात एकजिनसीपणा कधीच आला नाही. त्याचा सघन आध्यात्मिक आशय त्याच्याच सर्व सदस्यांना कधी उपलब्ध झाला नाही.

समाजाची शैक्षणिक, आर्थिक, वैचारिक, ऐहिक आणि नतिक अधोगती एवढेच एकमेव साध्य जातीव्यवस्थेने केले. हे विस्ताराने मांडण्याचे कारण जातीव्यवस्था हे केवळ हिंदू धर्माचेच अधिकृत वैशिष्टय आहे.

इतर कोणत्याही धर्माला जातीव्यवस्था अधिकृतरित्या मान्य नाही. जातीव्यवस्थेचे लाभार्थी आजही कुटिलपणे तिचे समर्थन करताना दिसतात. त्यांच्या पूर्वजांनी ‘चातुर्वण्या मया सृष्ट्वा गुणकर्मविभागश:’ (गुण आणि कर्म यांच्या आधारे मीच चार वर्ण निर्माण केले आहेत-गीतेतील प्रक्षिप्त भाग.) असे वचन श्रीकृष्णाच्या तोंडी टाकून ठेवले आहे ते अत्यंत धूर्तपणे! विषमतावादी वर्णव्यवस्थेचे ‘ईश्वरी’ समर्थन करता यावे म्हणूनच ही योजना त्यांनी करून ठेवली आहे. पुढे तिचे अत्यंत अन्याय्य, आक्षेपार्ह अशा जातीव्यवस्थेत रूपांतर झाले आणि हिंदू धर्माचे विघटन सुरू झाले.

समावेशक, स्पिरिच्युअल स्वरूप

खरे पाहता ‘कणकणमे भगवान’ असे मानणारा, गाय, बैल, साप, नाग, चंद्र, सूर्य, पृथ्वी, वृक्षवल्ली यांना सोयरे मानणारा हा धर्म अधिक समतावादी, समावेशक आणि स्पिरिच्युअल असा विचार होता.

‘वसुधव कुटुंबकम्’ अशी त्याची उदारमतवादी मांडणी होती. मात्र शोषक, स्वार्थी, क्षुद्र अशा पुरोहितवर्गामुळे हे उदात्त विचार केवळ काही सणावारांना पाळावयाचे कर्मकांड (उदा. : नागपंचमी, पोळा) किंवा अलंकारिक काव्यमय साहित्य (अभंग, भजने) याच स्वरूपात राहिले. ते वापरात आले नाहीत.

त्यांचा पुरस्कार करणा-या संताना, समाजसुधारकांना वाळीत टाकण्यात आले. संतांनी दिलेल्या अगणित चांगल्या विचारांना, उच्च जातीच्या हितसंबंधासाठी दैनंदिन आचरणात एक भूमिका म्हणून महत्त्वाचे स्थान मिळाले नाही. ‘उच्च विचार आणि भ्रष्ट आचार’ हे समाजाचे स्वभाववैशिष्टय बनले.

जीवनवादी विचार

हिंदू धर्मावर दुसरा आक्षेप येतो तो म्हणजे तो दैववादी आहे आणि तो निवृत्तीवादी, पलायनवादी विचारांना उत्तेजन देतो. खरे पाहता हिंदू धर्माने केंद्रीभूत मानलेले पुरुषार्थ-धर्म,अर्थ, काम, मोक्ष हे तो मुळीच पलायनवादी नसल्याचे सिद्ध करतात. तो जीवनाकडे रसिकपणे, अतिशय सकारात्मक विचाराने बघणारी एका समावेशक (inclusive ) विचारसरणी आहे.

संपत्ती मिळविणे, कामाला म्हणजे शारीरिक सुखाला एक पुरुषार्थ मानणे हे वैशिष्टय केवळ त्याच्यातच दिसते. इतर बहुतेक विचारधारा संपत्तीचा, ऐहिक सुखोपभोगाचा कडक निषेध करतात, मात्र भारतीय विचारधारा सुसंस्कारित अशा गृहस्थाश्रमात सर्व सुखे, समृद्धी आणि त्यासाठी संपत्तीचा संचय या गोष्टींना केवळ स्वीकारतच नाहीत तर त्यांना एका नतिक चौकटीत चक्क उत्तेजन देतात.

स्वत:हून स्वीकारलेला प्रतिगामी चेहरा

एकच धर्मगुरू, एकच धर्मग्रंथ आणि एक अधिकृत अशी जीवनशैली नसल्याने हिंदू धर्मात बदल, सुधारणा नेहमी होत गेल्या. त्या करणे शक्यही झाले आणि पुढेही नेहमीसाठी शक्य राहिले.

अनेक विचारवंतानी अनेक क्रांतिकारक बदल घडवून आणून त्याचे वेळोवेळी पुनरुज्जीवन केले. मात्र पौरोहित्याची संघटित संरचना नसल्याने आणि पुरोहित आणि धर्ममरतडानी मूळ धर्मकल्पनेतच स्वत:चे हितसंबंध संभाळणा-या अनेक आक्षेपार्ह गोष्टी घुसडून ठेवल्याने हिंदू धर्माचा एकंदर चेहरा नेहमी प्रतिगामी, विषमतावादी, बुरसटलेलाच राहिला. तो बदलण्याचे प्रयत्न झाले नाहीत.

नेतृत्वहीन, दिशा गमावलेली विचारधारा

कोणतेही धार्मिक शिक्षण न घेता, आचरणाची कोणतीही बंधने न पाळता, कोणतीही परीक्षा न देता कुणालाही एखाद्या धर्मात धर्मगुरू किंवा पुरोहित, पुजारी बनता येत असेल तर तो फक्त हिंदू धर्मच होय. यामुळे समाजात प्रचंड गरसमज, अंधश्रद्धा, मूर्खपणा पसरविणारे घातक लोक हिंदू धर्माचे नेतृत्व करू लागले. कोणती श्रद्धा, कोणत्या धारणा अधिकृत आणि कोणत्या अनिधिकृतपणे घुसडलेल्या ते कळूच नये अशी परिस्थिती निर्माण झाली.

यातही आशेचा एक सुप्त किरण आहे. भारतातील मुख्य धर्म असलेल्या या ८५% लोकांना अनागोंदी म्हणावे इतके स्वातंत्र्य असल्याने हिंदू धर्मात जसे अनेक स्वार्थी, लंपट, लोभी, खुनी आणि गुन्हेगार लोक धर्मगुरू, बाबा बनून बसले आहेत तसेच अनेक प्रबुद्ध गट, व्यक्ती, समाजोपयोगी संस्था आपापल्या परीने उच्च भारतीय जीवनमूल्ये जोपासतानाही दिसत आहेत.

मात्र जसे पोप जगातल्या सर्व ख्रिस्ती आणि ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या, नववर्षाच्या शुभेच्छा देतात आणि त्याचे प्रसारण सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून, नभोवाणी केंद्रावरून संपूर्ण जगाला दाखविले जाते तसा कोणताही शंकराचार्य कधीही, अगदी आपत्तीच्या वेळीही समाजाशी बोलत नाही. समाजाच्या सुखदु:खाशी त्याला काहीही देणेघेणे असल्यासारखे कधीही दिसत नाही.

उज्ज्वल, समृद्ध, कलासक्तवारसा, संपन्न जीवनशैली

असे असले तरीही जसे अलीकडे स्वामी विवेकानंद निर्माण झाले आणि त्यांनी हिंदू विचाराचा अगदी प्रगत, उजळ चेहरा जगासमोर समर्थपणे मांडला व त्यामुळे पाश्चिमात्य जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला तसे अनेक लोक सौम्यपणे हा प्रयत्न आजही करताना दिसत आहेत. हिंदू धर्माच्या मूळ विचारात धर्मप्रसाराचा उद्देशच अभिप्रेत नसल्याने अनेक पाश्चिमात्य लोक स्वत:हून या विचारसरणीचा अभ्यास आणि नंतर अंगीकार करीत आहेत.

संगीत, चित्रकला, साहित्य, नृत्य, नाटय, लोककला, शिल्पकला यात हिंदू धर्म पूर्णत: सामावून गेला आहे, पाय रोवून उभा आहे. या कलांच्या फळण्याफुलण्यात हिंदू मिथकांचे, महाकाव्यांचे, आध्यात्मिक कथांचे अतुलनीय योगदान आहे. राधाकृष्णाच्या अलौकिक प्रेमाशिवाय आपण रागदारीची कल्पना करू शकत नाही.

रामायण, महाभारताला किंवा शिवपार्वतीच्या प्रेमनाटयाला वगळून भरतनाटयम आणि कथक्कलीचे नयनरम्य प्रयोग अशक्य आहेत. सरस्वतीवंदनाशिवाय कुणाही रसिकाला स्वर्गीय आनंद देणा-या अभिजात भारतीय संगीताची कल्पनाच करणे शक्य नाही.

‘समृद्ध अडगळ’ !  

हे सर्व लक्षात घेता एखाद्या शेतक-याच्या गावाबाहेरच्या सारवलेल्या गोदामात हिरवी लुसलुशीत भाजी, मधुर फळे, शक्तिदायक पोषके देणारे अन्नधान्य, गोड रस देणा-या उसाचे दांडके, पालापाचोळा, उंदीर, घुसी,  थकलेल्या, रुग्णाईत मनुष्याला जीवदान देण्या-या दुर्मीळ औषधी वनस्पतींची पाने-फुले असे सगळे एकत्रच पडून असावे तसे हिंदू धर्माचे झाले आहे.

कसलेही वर्गीकरण नाही, चांगल्या वेष्टनात पॅकिंग नाही, टिकवून ठेवायची व्यवस्था, संरक्षण नाही, योग्य कॉस्टिंग नाही, विपणनाची आकर्षक व्यवस्था नाही, असे हे उत्तम पदार्थाचे सरमिसळ गोडाऊन आहे. म्हणूनच त्याला कदाचित ज्ञानपीठ विजेते लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ‘समृद्ध अडगळ’ म्हटले असावे. अडगळ आहे खरी; पण अतिशय समृद्ध, सघन आणि मौल्यवान आहे हेही विसरता येत नाही.

1 COMMENT

  1. जे अस्तितवात नाही ते असतीत्वात आहे.असे समजणे murkha panache lakshan आहे.हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही.१९४८ साली ब्रीठीशानी bhartiyanche समाज जीवन उधवासात करण्या साठी जे कायदे केले त्या कायधाचे नाव हिंदू धर्म.तेच कायदे अजूनही चालू आहेत.म्हणून हिंदू उधवसत आहेत.भारतीय मुल निवासींचा धर्म अनादी सनातन मानव धर्म आहे.धर्माचे रक्षण निसर्ग करतो.निसर्ग नियमांचा अभ्यास करून निसर्ग नियमांना समांतर असे नियम मुलनिवाशी bhartiyani केले आहेत.त्या नियमांच्या विरोधात जानाराना निसर्ग शिक्षा करतो.तिथे कोणाचा वशिला चालत नाही.हे सत्य कोणाला माहित आहे.ज्यांना माहित आहे त्यांना अन्यांनी अंध श्रद्धाळू ठरवण्यात आले आहे.ज्यांना माहित नाही ते उधवसत होत आहेत.सनातन धर्म सांगणारा लिखित धर्म ग्रंथ कुठे आहे.असे सर्व विचारतात.अमेरिकेच्या शिकागो विद्या पिठात अभ्यास क्रमात आहे. भारतात कुठे आहे. भारतात त्याची जाळून राख केली आहे.राख करणाराला भारत नर रतन हि पदवी देण्यात आली आहे. मागा म्हणजे मिळेल. शोधा म्हणजे सापडेल.सनातन धर्माचे पालन करा निसर्ग तुम्हचे रक्षण करेल.पती म्हणजे पर में शवर मी परमे शवरि मी अबला नाही मी महाकाली आहे. या तत्वाचा वापर भारतीय मुल निवाशी स्त्रिया करतात. आधुनिक स्त्रिया आरक्षणाची भिक मागतात हे खरे आहे ना.हिंदू धर्म नावाचा धर्म नाही तो भातीय samajache shoshan करणारा विदेशी बहु राष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेला प्रोग्राम आहे.कर नावाचा सैतान त्याचे रक्षण करीत आहे.जय श्री राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version