Home कोलाज वैदिक गणिताचा कूटप्रश्न

वैदिक गणिताचा कूटप्रश्न

1

वैदिक गणिताची सध्या बरीच चर्चा चालू आहे. खरं तर या गणिताचा वेदांशी खरंच काही संबंध आहे का, हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे या गणिताची उपयुक्तता आणि व्यवहार्यता तपासून मगच त्याचा प्रचार व्हायला हवा.
भारतीय संस्कृती आणि परंपरेबद्दल आपल्यापैकीच काही जणांना इतका अभिमान असतो की, आज जगात जे काही अत्याधुनिक आहे, त्याचं मूळ आमच्या भारतीय परंपरेतच आहे, असं त्यांना ठामपणे वाटतं. मग ते आपल्याकडे प्राचीन काळात विकसित झालेलं खगोलशास्त्र असो की, वास्तुकला असो. भले या विषयात आपण गेली हजारो र्वष काहीही प्रगती केली नसली तरी आपण कधी काळी अश्म, ताम्र, काष्ठ वगैरे युगात जे काही केलं त्याची थोरवी गात राहतो. एखादी गोष्ट आमच्या परंपरेशी निगडीत आहे ना, मग ती सर्वश्रेष्ठ असणार, असाही आमचा दावा असतो. त्यावेळी आम्ही केलेलं काम भलेही आजच्या जगात उपयुक्त असलं-नसलं तरी ते आम्ही कवटाळून बसतो. किंवा त्याची आजच्या जगातली उपयुक्तता आणि व्यवहार्यता तपासण्याची तसदी आम्ही घेत नाही. ‘वैदिक गणित’ या विषयाबद्दल सध्या असंच म्हणता येईल.

अलीकडे वैदिक गणित हा शब्द खूपदा कानावर पडू लागला आहे. या गणिताचा प्रचार करणा-यांची आणि ते शिकणा-यांची संख्या वाढू लागली आहे. आजच्या इंटरनेटच्या युगातही हे गणिताची चर्चा होते, हे विशेष. त्यामुळे या गणिताविषयी माहिती नसलेल्यांनाही त्याच्याविषयी उत्सुकता वाटते. या गणिताविषयी जे सांगितलं जातं त्यावरून हा काहीतरी अद्भुत प्रकार आहे, अशीही भावना होते. या गणिताचा आपल्या आजच्या गणिताशी काय संबंध, ते आजच्या काळात उपयुक्त आहे का, असे प्रश्न मनात येतात. खरं तर हा विषय नवा नाहीच. या विषयावरील अनेक पुस्तकं मराठीसह अनेक भाषांत प्रसिद्ध झालीत. त्यामुळे वैदिक गणित याविषयाला एक वलय पूर्वीपासून आहे.

प्राचीन काळात भारतीय गणितात चांगले पारंगत होते, असं म्हणतात. शून्याची देणगी भारतानेच जगाला दिली. अरब लोक भारतीयांकडूनच शून्याचा वापर करायला शिकले. तिथून शून्य आधी युरोपात आणि नंतर ते जगभर पोहोचलं. गणिताच्या या पारंगतेतून भारतात अनेक गणिती परंपरा निर्माण झाल्या. त्यातून वैदिक गणित उदयाला आलं, असं म्हटलं जातं. हे वैदिक गणित म्हणजे काय? नावावरून असा अर्थबोध होतो की, या गणिताचा वेदांशी संबंध असावा. विकीपीडियासारख्या माहितीदायक साइटवर पाहिलंत तरी असंच आढळतं. इथेच मेख आहे. वैदिक गणिताचा तसा पाहिला तर वेदाशी संबंध नाही.

तर आज वैदिक गणित म्हणून जे प्रचलीत आहे ते जगद्गुरू शंकराचार्य स्वामी श्री भारती कृष्ण तीर्थजी महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकातील गणित आहे. त्यांचा काळ विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा. अमेरिकेत शिकलेले स्वामीजी संस्कृत, तत्त्वज्ञान, इंग्रजी, विज्ञान, गणित आणि इतिहास या सगळ्याच विषयांचा दांडगा अभ्यास होता. असं म्हटलं जातं की, वेदाभ्यास करताना त्यांना गणिती सूत्रांचा परिचय झाला. त्यांनी त्यांचा अभ्यास करून त्यावर ग्रंथ लिहिला. तसंच गणिताचा कुठलाही भाग या सोळा सूत्रांच्या पलीकडे नाही, हे त्यांनी पाश्चात्य गणितज्ञांना मान्य करायला लावलं, असंही म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना वैदिक गणिताचे आधुनिक प्रवर्तक म्हटलं जातं. विशेष, म्हणजे, स्वामीजींचा वैदिक गणितावरील ग्रंथ त्यांच्या मृत्युनंतर प्रकाशित झाला. त्यामुळे हे गणित त्यांना कोणत्या वेदात सापडलं, याविषयी काहीच माहिती नाही. या ग्रंथात गणिताची एकूण तेरा सूत्रं आणि सोळा उप-सूत्र आहेत. ही सूत्र अथर्ववेदातील असल्याचे पुस्तकाच्या प्रास्ताविकात म्हटले आहे, परंतु ती अथर्ववेदात कुठेही सापडत नसल्याचं जाणकार म्हणतात. त्यामुळेच ही सूत्रं खरोखर वैदिक आहेत का, हाच प्रश्न आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ जयंत नारळीकर यांनी ‘द सायंटिफिक एज : द इंडियन सायंटिस्ट फ्रॉम वेदिक टू मॉडर्न टाइम्स’ या पुस्तकात याविषयी खुलासा केला आहे. हे वैदिक गणित नाहीच, पण साधं गणितही नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. हे गणित वैदिक नाही, असं मान्य केलं तरी ते गणिती सिद्धांतांच्या कसोटीवर उतरणारे नाही. यातली सोळा सूत्रं नगण्य आहेत, या शब्दांत त्यांनी गणिताचा फोलपणाही दाखवून दिला आहे.

थोडक्यात गणितज्ञ आणि शास्त्रज्ञ वैदिक गणिताला थातूरमातूर सूत्र, ज्यांचा हवा तसा अर्थ काढता येऊ शकतो, असं मानतात. आकडेमोड करण्याच्या साध्या क्लुप्त्या म्हणूनही ते उपयोगाचं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. याऊलट या गणितावर विश्वास असणारे, या गणितात मानवी मन कसं काम करतं याचा विचार करण्यात आलाय. त्यामुळे आकडेमोड सोपी व जलद होते, पण गणित करताना मनावरही ताण पडत नाही, म्हणून आजच्या संगणकाच्या युगातही वैदिक गणिताचं महत्त्व टिकून आहे, वगैरे सांगतात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये या गणिताचा विद्यार्थ्यांना फायदा होतो असाही प्रचार केला जातो. वैदिक गणितावर विश्वास ठेवणा-यांमध्ये काही शास्त्रज्ञ, गणितज्ञ, तंत्रज्ञ यांचाही समावेश आहे, हे विशेष.

वैदिक गणिताविषयी वाचून पडणारा पहिला प्रश्न असा की, वैदिक गणित आजच्या काळात किती उपयुक्त आहे. या गणितात गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळं आहेत, हे खरं असलं तरी आजच्या शालेय पातळीवरील गणितासाठी त्याच्या पद्धती किती उपयुक्त आहेत. मुळात गणित हा किचकट विषय असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा तो नावडता असतो. या विषयात दांडी उडणा-यांची संख्या मोठी आहे. म्हणूनच शालेय पातळीवर तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकवला जातो. ही पद्धत शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ यांनी विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास आणि विचार करून घडवलेली आहे. ती रिलेव्हंट म्हणजे कालसुसंगत आहे. वैदिक गणित एवढे कालसुंसगत आहे का? वैदिक गणितामुळे आकडेमोड जलद होते, असं म्हटलं जा असलं तरी तज्ज्ञांच्या मते, जलद आकडेमोड म्हणजे गणित नव्हे तर गणित म्हणजे तर्कशुद्ध विश्लेषण करण्याची पद्धत आहे. शिवाय जलद आकडेमोड ही तुम्हाला सगळ्या ठिकाणी उपयोगी ठरत नसते. याखेरीजही वैदिक गणित सर्वश्रेष्ठ असेल तर ते गणितज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या कसोटीवर उतरायला हवं, आजच्या काळातली त्याची उपयुक्तता सिद्ध व्हायला हवी. कुणाला त्याविषयी उत्सुकता असेल तर त्याने या गणिताचा अभ्यास करायला हरकत नाही, परंतु त्याच्या सर्वश्रेष्ठतेचा उगाच बाऊ कशाला?

वैदिक गणितापाठोपाठ आजकाल जैन गणिताचाही प्रचार सुरू झाला आहे. ही गणिती परंपरा वैदिक गणिताइतकीच जुनी असल्याचं म्हटलं जातं. जैन गणितवाल्यांचा असा दावा आहे की, शून्याचा शोध भास्कराचार्यानी लावलाच नाही. तर तो सर्वनंदी नावाच्या जैन आचार्यानी लावला. गणित .या विषयाच्या विकासात जैन गणिताचं योगदान खूप मोठं असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे वैदिक गणिताचा घोळ वाढण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा आजच्या शिक्षणपद्धतीतलं सोपं गणित सोडवलेलंच बरं. नाही का?

1 COMMENT

  1. बरोबर आहे वैदिक गणिताबद्दल समाजात खुप गैरसमज पसरले आहेत. वैदिक गणित या विषयवार लिहिलेला वैदिक गणित आणि समज – गैरसमज हा लेखहि वाचकांना नक्कीच आवडेल. माझा लेख वाचण्ययासाठी माझ्या ब्लॉग ला नक्कीच भेट द्या. http://shabdsaundarya.blogspot.com/2017/10/blog-post_7.html

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version