Home टॉप स्टोरी चार नराधमांना जन्मठेप!

चार नराधमांना जन्मठेप!

0
संग्रहित छायाचित्र

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने चारही आरोपींना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

संग्रहित छायाचित्र

मुंबई- महालक्ष्मी येथील शक्ती मिल येथे टेलिफोन ऑपरेटर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराप्रकरणी सत्र न्यायालयाने चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एखाद्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप होण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना आहे. याच परिसरात छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कारातही याच तीन आरोपींचा सहभाग असल्यामुळे त्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद असलेले सुधारित कायद्यातील भादंवि कलम ३७६(ई) लागू करावे अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे केली. या प्रकरणी सोमवारी शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. शिक्षा ऐकल्यावरही या आरोपींचा निर्ढावलेपणा कायम होता.

[poll id=”595″]

सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांनी अवघ्या सहा महिन्यांत हा खटला निकाली काढला. या खटल्याचे सर्व कामकाज ‘इन-कॅमेरा’ चालवण्यात आले होते. त्यानंतर टेलिफोन ऑपरेटर सामूहिक बलात्काराप्रकरणी विजय जाधव, कासिम बंगाली, मोहम्मद अन्सारी व अश्फाक शेख या चारही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापुढे अर्ज सादर करून दोनही प्रकरणांमध्ये समावेश असलेल्या तीन अरोपींविरोधात फाशीची तरतूद असलेले भादंवि कलम ३७६(ई) हे अतिरिक्त कलम लावण्याची मागणी केली. बचाव पक्षाने मुदत मागितल्याने याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने चारही आरोपींना पुरावा नष्ट करणे, समान हेतूने गुन्हेगारी कारस्थान करणे, सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, डांबून ठेवणे, मारहाण करणे आदी १३ कलमांतर्गत गुरुवारी दोषी ठरवले होते.

१९ वर्षीय टेलिफोन ऑपरेटर तरुणी जुलै महिन्यात भावी पतीसोबत शक्ती मिल परिसरातून महालक्ष्मी येथे जात असताना आरोपींनी या दोघांना मारहाण करून तरुणीवर बलात्कार केला होता. यामुळे हादरलेली ही तरुणी अन्य राज्यातील तिच्या गावी निघून गेली होती. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत परतलेल्या या तरुणीने छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कारासंदर्भात बातम्या वाचल्यावर ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तिच्यावरील बलात्काराचीही तक्रार दाखल केली होती. तपासाअंती छायाचित्रकार तरुणीवर बलात्कार करणारे विजय जाधव, कासिम बंगाली, मोहम्मद अन्सारी यांच्यासह अश्फाक शेख व आणखी एका अल्पवयीन मुलाचा या बलात्कारात सहभाग असल्याची बाब समोर आली होती.

काय आहे कलम ३७६ (ई) ?
दिल्लीतील निर्भया बलात्कार व हत्येच्या घटनेनंतर बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमधील कलमांमध्ये सुधारणा करून ते आणखी कडक करण्यात आले. या सुधारणेनुसार एकापेक्षा अधिक बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या आरोपींसाठी ३७६(ई) हे कलम समाविष्ट करण्यात आले. या कलमानुसार, कमीतकमी मरेपर्यंत जन्मठेप अथवा जास्तीत जास्त फाशीची शिक्षेची तरतूद असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी न्यायालयाने तीन आरोपींवर हे कलम लावण्याची परवानगी दिल्यास त्यांच्या शिक्षेत वाढ होऊन ती फाशीही होऊ शकते.

[EPSB]

शक्ती मिल सामूहिक बलात्कारप्रकरणी ५ दोषी

शक्ती मिलमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाचही आरोपी दोषी असल्याचे गुरुवारी न्यायालयाने सांगितले.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version