Home एक्सक्लूसीव्ह शताब्दी, डबल डेकर ठरले पांढरे हत्ती

शताब्दी, डबल डेकर ठरले पांढरे हत्ती

1

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या शताब्दी, डबल डेकर एक्स्प्रेसच्या भरमसाट भाडय़ामुळे त्याच्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. 

रत्नागिरी – गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सुरू झालेल्या शताब्दी, डबल डेकर एक्स्प्रेसच्या भरमसाट भाडय़ामुळे त्याच्याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. या गाडय़ा रिकाम्या धावत असून त्या पांढरे हत्ती ठरल्या आहेत. त्यामुळे या गाडय़ातून प्रवास करण्याचे आवाहन कोकण रेल्वेने प्रवाशांना केले आहे. या गाडय़ांना प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्यास या गाडय़ा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका कोकण रेल्वेने घेतली आहे.

प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे रेल्वेने यंदा गणेशोत्सवात सुमारे २१४ विशेष गाडय़ांसह शताब्दी एक्स्प्रेससह डबल डेकर गाडी चालवली. मुंबई- मडगाव मार्गावरील स्लीपर दर्जाचे तिकीट सर्वसाधारणपणे ४०० रुपये आहे. मात्र, डबल डेकर तसेच शताब्दी गाडय़ांच्या तिकिटांसाठी साडेतीन ते चार हजार रुपये मोजावे लागले. त्यामुळे या गाडय़ांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या गाडय़ा रद्द करण्यात येतील, असे कोकण रेल्वे आता म्हणते.

या गाडय़ांना अल्प प्रतिसाद मिळण्यास रेल्वेच जबाबदार असल्याचे प्रवासी तसेच प्रवासीतज्ज्ञांचे मत आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर चालवल्या जाणा-या डबल डेकरला वातानुकूलित चेअरकारचे नियमित भाडे आकारले जाते. मात्र, कोकण रेल्वे मार्गावर सोडल्या जाणा-या डबल डेकरला प्रीमियमचा वेगळा नियम का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ही गाडी कोकणात चालवायचीच नाही, असे मत रेल्वेतील विशिष्ट अधिकाऱ्यांचे आहे. त्यामुळे प्रीमियम पद्धतीने ही गाडी चालवून प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही, असे दाखवायचे. त्यानंतर ती अन्यत्र वळवण्याचा डाव असल्याचीही चर्चा आहे.

करमाळी नेमके कुठे?
डबल डेकर गाडी मडगावऐवजी करमाळी स्थानकापर्यंतच धावत असल्याने त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. करमाळी स्थानक गोव्यातच येते, याची माहिती नसलेले पर्यटक या गाडीने प्रवास कसा करणार? गाडी सुरू करण्यापूर्वी रेल्वेने त्याचे योग्य मार्केटिंग केले नसल्यानेच तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अय्यर नावाच्या एका प्रवाशाने सांगितले. रेल्वेच्या चुकीच्या धोरणामुळे डबल डेकर, शताब्दी एक्स्प्रेससह वातानुकूलित गाडय़ांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. आता रेल्वेने या गाडय़ांमध्ये उपलब्ध असलेली आसनक्षमता, बुकिंग आणि उपलब्ध आसनांची माहिती जाहिरातींच्या माध्यमातून देण्यास सुरुवात केली आहे.

1 COMMENT

Leave a Reply to sachin Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version