Home महाराष्ट्र कोकण शिवसेनेचा जैतापूर विरोध ; कळवळा की पुतणामावशीचं प्रेम ?

शिवसेनेचा जैतापूर विरोध ; कळवळा की पुतणामावशीचं प्रेम ?

0

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरी विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचा हा विरोध खरा आहे की पुतणामावशीचं प्रेम आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

रत्नागिरी- प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. त्यासाठी उद्या २७ ऑगस्ट रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवसेनेतर्फे स्थानिकांना आवाहन केले आहे. शिवसेनेने नाणार रिफायनरीलाही विरोध केला आहे. मात्र त्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिवसेनेच्यादृष्टीने दोन्हीकडे विरोधाची भूमिका असताना दोन्ही आंदोलने एकत्रित होण्याची गरज आहे. मात्र ‘जैतापूर’साठी २७ रोजी जेलभरो करणार आणि ‘नाणार’साठी ३१ ऑगस्ट रोजी मोर्चा काढणार. हा दुजाभाव होत असल्याने स्थानिक नागरिक संभ्रमात पडले आहेत. शिवसेना खरोखरच या प्रकल्पांना विरोध करतेय की हे पुतणामावशीचं प्रेम आहे, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

“जैतापूर नाही म्हणजे नाहीच” ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा अजूनही येथील जनतेला आठवणीत आहे. याच परिसरातील प्रस्तावित नाणार रिफायनरीलाही शिवसेना पक्ष विरोध करीत आहे. मात्र उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह राजापूरचे आमदार राजन साळवी, माजी आमदार प्रमोद जठार, वैभव नाईक आदी स्थानिक नेते मंडळींनी कायम दुटप्पी भूमिका घेतल्याने स्थानिकांचा त्यांच्यावर काडीमात्र विश्वास राहिलेला नाही. एकिकडे पक्षाचा विरोध असल्याचे दाखवले जाते. केंद्रात आणि राज्यात शिवसेना सत्तेत आहे. तिथे शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि रस्त्यावर मात्र विरोध असल्याचे दाखवितात. यामुळे स्थानिक जनता शिवसेनेसोबत कधीही नव्हती. याआधीही डोंगर टिठा, सागवे येथे झालेल्या सभा व आंदोलनात गर्दी दाखवण्यासाठी पक्षातर्फे हजोरोंनी लोक भाड्याने आणले होते. त्यामुळे स्थानिकांचा सहभाग नसतानाही २७ तारखेच्या जेल भरो आंदोलनातही शिवसेना पक्ष शेकडोनी कार्यकर्ते-जनता आणेल. व आंदोलन यशस्वी ‘करुन दाखवलं’ म्हणेल. परंतू ते आंदोलन केवळ प्रातिनिधिक स्वरूपाचे असेल. यात स्थानिकांचा सहभाग असणार नाही, अशी स्थानिकांमध्ये चर्चा आहे.

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पविरोधी आंदोलन एकत्रितरित्या मोठ्या ताकतीने लढण्याचा निर्धार याआधीच जैतापूर अणुऊर्जा विरोधी जन हक्क सेवा समिती आणि कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या संयुक्त बैठकीत करण्यात आलेला आहे. जोपर्यंत रिफायनरीसह अणऊर्जा प्रकल्प रद्द होत नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केलेला आहे. या लढ्याला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी पाठींबा दिलेला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version