Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती शांतताप्रिय पारशी समाज

शांतताप्रिय पारशी समाज

1

पारशी समाजाने नुकतीच त्यांच्या नव्या वर्षाला सुरुवात केली. त्यानिमित्ताने जगभरातील पारशी धर्मीयांनी ‘पतेती’ सण साजरा केला. शांतताप्रिय असणारा हा समाज त्यांचा सणदेखील शांततेत साजरा करतो.

भारतीय संस्कृतीत साखरेप्रमाणं विरघळून जाऊन इथल्या संस्कृतीशी एकरूप झालेल्या पारशी धर्मीयांचा ‘पतेती’ हा उत्सव नुकताच संपन्न झाला. अत्यंत शांततेनं जगणारा आणि असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारा समाज ही पारशी समाजाची ओळख आहे. या धर्मात फारसे सण-उत्सव नाहीत. पतेती, नवरोज व जमशेद नवरोज हे त्यांचे वर्षभरातील प्रमुख सण. पारशी वर्षातील शेवटचे दहा दिवस हे पिरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात आणि अखेरच्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते.

पारशी धर्मामध्ये पितरांच्या शांतीला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत सांगितल्याप्रमाणं आत्मा हा अमर मानलेला आहे, तीच धारणा पारशी समाजात दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी दहा दिवस वेगवेगळे उपचारकेल्यानंतर शेवटच्या दिवशी पतेती साजरी केली जाते. पारशी लोकांची मूळ देवता ही ‘अग्नी’ आहे. पतेतीच्या दिवशी आग्यारीत जाऊन ते अग्नीची पूजा करतात. पारशी धर्मात पवित्र मानल्या जाणा-या ‘अवेस्ता’ या धार्मिक ग्रंथाचं या वेळी पठण केलं जातं.

आपल्याकडे जशी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते त्याच प्रमाणात पारशी धर्मात पतेतीचं महत्त्व आहे. या दिवशी सगळी पारशी कुटुंबं नवीन कपडयांची खरेदी करतात. घरात गोडधोड पदार्थाची मेजवानी असते. मित्र-नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. त्यात गोड खीर, गव्हाच्या सुजीचा (रव्याचा) शिरा, दह्यापासून बनविले जाणारे गोड पदार्थ अशी रेलचेल प्रत्येक घरात असते. दिवाळीत जसं आपण एकमेकांना मिठाई देतो, तसंच पारशी लोक एकमेकांना आणि इतर धर्मातील मित्रांनाही मिठाई वाटून सणाचा आनंद साजरा करतात.

मुळातच पारशी समाज हा शांतताप्रिय समजला जातो. पारशी धर्माचा उगम इराणमध्ये झालेला असला, तरी आज जगभरातील पारशी धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात आहे. आताचं चित्र पाहता, भारतीय संस्कृतीत हा समाज एकरूप झाला, इतकंच नव्हे देशाच्या उन्नतीतही या समाजाचं मोठं योगदान आहे. भारतात ज्या काही लोकांनी देशाला नावलौकिक मिळवून दिला, त्यात संख्येनं ख-या अर्थानं अल्पसंख्याक असलेल्या या समाजाचं मोठं योगदान आहे. भारतीय इतिहासात ज्यांच्या नावाची नोंद आहे, अशा काही नावांवर नजर टाकली तरी पारशी समाजाचं योगदान आढळून येईल. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, जमशेदजी टाटा, मादाम कामा, सर जमशेदजी जिजीभॉय, जे. आर. डी. टाटा, डॉ. होमी भाभा, अर्देशीर इराणी, गोदरेज बंधू, फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ, नरिमन कॉण्ट्रॅक्टर, संगीतकार झुबीन मेहता, रतन टाटा, शामक दावर, नानी पालखीवाला, सोली सोराबजी अशी कितीतरी नावं सांगता येतील, ज्यांनी भारताच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे.

पारशी धर्माचं मूळ हे वैदिक संस्कृतीमध्ये दिसून येतं. सध्याचं इराण ज्या ठिकाणी आहे, त्याच क्षेत्रात सुमारे आठ हजार वर्षापूर्वी पारशी धर्माची स्थापना झाली असावी. हा काळ वेदांच्या निर्मितीचा काळ आहे. वेदांमध्ये यज्ञाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या यज्ञामध्ये पशूंची दिली जाणारी आहुती पाहून अस्वस्थ झालेल्या पारशी धर्मीयांचे संस्थापक ‘इरतुष्ष्ट्र’ यांनी या धर्माची स्थापन केली. त्या वेळी यज्ञात बळी देण्यासाठी आणलेल्या काही पशूंना त्यांनी जीवदान दिलं होतं, असा संदर्भही सापडतो.

त्यानंतर या धर्मातील सण-सणावळी कमी करून केवळ तीनच उत्सव साजरे करण्याची पद्धत त्या काळापासूनच सुरू झाली. धर्म संस्थापकानं गाथा लिहून धर्माची मूळ तत्त्वं लोकांपर्यंत पोहोचवली. वेदांची भाषा आणि पारशी गाथा यात बरंचसं साम्य आढळतं. अगदी देवतांमधील साम्यापासून ते इतर अनेक दुवे सापडतात. उदाहरणार्थ, देव – दैव, असुर – अहूर, मित्र – मिथ्र, वरुण – वरेण, विवस्वान – विवहवंत, यम – यिम, सोहम् – होम, मास – माह असे दोन्ही धर्मातील कर्मकांडाविषयी साधम्र्य साधणारे अनेक दुवे सापडतात.

पारशी धर्म संस्थापकानं लिहून ठेवलेल्या गाथांमध्ये हे दुवे आढळतात. मात्र पारशी साहित्याचं पुढे मोठया प्रमाणात नुकसान झालं. पारशी राज्यावर अलेक्झांडरने आक्रमण केलं. त्यात फार मोठय़ा प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली. राजवाडे पेटवले गेले. या सगळ्या जाळपोळीत फार मोठय़ा प्रमाणात पारशी साहित्य नष्ट झाल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत.

पुढे अति हिमवृष्टीचा भाग असल्यामुळे पारशांच्या काही टोळया खैबर खिंड ओलांडून भारतीय उपखंडात आल्या, तर काही इराकच्या पूर्व भागात स्थिरावल्या. भारतीय उपखंडात आलेला समाज इथंच विसावला. मात्र पुढे इराणवर मुस्लीम आक्रमकांनी केलेल्या हल्ल्यात तिथं स्थिरावलेल्या पारशी समाजावर मोठं संकट आलं. मुस्लीम आक्रमकांच्या दबावापोटी त्यातील अनेकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला तर काही जण आपलं कुटुंब (कबिले) घेऊन जगात विखुरले गेले. त्यातील अनेक कुटुंबं भारतात आली. या समाजाची संपूर्ण जगभरातील लोकसंख्या पाहता, ते केवळ दीड-दोन लाखांच्या आसपास आहेत. त्यातील साठ ते पंच्याहत्तर हजार पारशी हे भारतात स्थिरावलेले आहेत. मूळ उगमस्थानी म्हणजेच इराणमध्येही त्यांची संख्या आता खूपच कमी आहे.

हा धर्म भारतात आला आणि इथल्या मातीशी, संस्कृतीशी एकरूप झाला. भारताच्या स्वातंत्र्य लढय़ापासून विकासापर्यंत या समाजाचं खूप मोठं योगदान आहे. विचारांमधील आणि कृतीतील पावित्र्य जपणारा, तसंच कोणत्याही कार्यात संपूर्ण झोकून देण्याची वृत्ती असणा-या या पारशी समाजाला सुरू झालेलं हे नववर्ष आनंदाचं, शांततापूर्ण आणि भरभराटीचं जावो हीच शुभेच्छा..!!

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version