Home Uncategorized शाश्वत दूध उत्पादनासाठी हिरवा चारा महत्त्वाचा!

शाश्वत दूध उत्पादनासाठी हिरवा चारा महत्त्वाचा!

0

कोकणातील जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जनावरांच्या आहार व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

मसुरे- कोकणातील जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जनावरांच्या आहार व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. आहार व्यवस्थेमध्ये हिरव्या चा-याचे महत्त्व मोठे असून दुधाळ जनावरांची प्रामुख्याने पचन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वर्षभर हिरवा चारा पुरविणे आवश्यक आहे.

दुभत्या गाई- म्हशींना त्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी लागणारी सर्व पोषकद्रव्ये, जीवनसत्त्वे आणि क्षार ही त्यांच्या आहारातून पुरवली जातात. संतुलित आहार देण्यासाठी आहारात पशुखाद्य व हिरव्या चा-याचा उपयोग केला जातो. त्यामुळे शाश्वत दूध उत्पादनासाठी हिरवा चारा महत्त्वाचा घटक आहे.

कोकणात श्वेतक्रांतीची हालचाल सध्या जोरात सुरू झाली आहे. पशुपालन व्यवसायास सामाजिकदर्जा प्राप्त झाला आहे. संकरित वाणाच्या गायी-म्हशींची पैदास येथील शेतकरी करू लागला आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील गाई-म्हशींच्या दूध उत्पादन क्षमतेपेक्षा कोकणातील जनावरांची दूध उत्पादन क्षमता फारच कमी आहे. ही उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जनावरांच्या आहार व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.

आहार व्यवस्थेमध्ये हिरव्या चा-याचे महत्त्व मोठे असून दुधाळ जनावरांची प्रामुख्याने पचन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी वर्षभर हिरवा चारा पुरवणे आवश्यक असल्याची माहिती सहाय्यक कृषी अधिकारी अभिजित मदने यांनी दिली आहे. दुभत्या गाई-म्हशींना त्यांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी लागणारी सर्व पोषकद्रव्ये, जीवनसत्त्वे आणि क्षार ही त्यांच्या आहारातून पुरवली जातात. त्यामुळे त्यांचा आहार परिपूर्ण व संतुलित असणे आवश्यक असते.

संतुलित आहार देण्यासाठी आहारात पशुखाद्य व चा-याचा उपयोग केला जातो. दरम्यान याच अनुषंगाने गोकुळ दूध संघाच्या वतीने येथील शेतक-यांना हिरव्या वैरणीचे बियाणे व बहुवर्षीय गवताचे सेट्स वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले असून शेतक-यांनी दूध संस्थांकडे मागणी नोंदवण्याचे आवाहन गोकुळ दूध संघाचे मुख्य संकलन अधिकारी एच. व्ही. तुरुंबेकर यांनी केले आहे.

हिरव्या चा-याचे महत्त्व

हिरवा चारा जनावरांस दिल्याने त्याचे स्वास्थ्य चांगले टिकून त्यांची प्रजननक्षमता चांगली राहते. चारा चवदार असल्याने जनावरे आवडीने खातात. जनावरांना मलावरोधाचा त्रास न होता हिरव्या चा-यातून ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोजसारख्या सहज विरघळणा-या साखरेचा पुरवठा होतो. चा-याद्वारे अ जीवनसत्त्वाचा पुरवठा चांगल्या प्रकारे होऊन जनावरांचे डोळे आणि त्वचेची कांती चांगली राहते. तसेच हिरव्या चा-यातून जनावरांना खनिजाचा पुरवठा होतो.

लागवडीसाठी हिरवा चारा निवडताना

चा-यासाठीचा वाण जलद वाढणारा व उत्पादनक्षम असावा. वाण लुसलुशीत व जादा पोषणमूल्ये असणारा असावा. चा-याच्या जास्त कापण्या करता याव्यात. तसेच खतांना व प्रतिकूल हवामान व कमी पाण्यात चांगला प्रतिसाद देणारा असावा. मिश्र तसेच आंतरपीक पद्धतीस प्रतिसाद देणारा असावा.

जिल्ह्याच्या वातावरणात मका तसेच पाण्याचा पुरवठा चांगला असल्यास यशवंत २ हे बहुवर्षीय वाण चांगल्या प्रकारे उपयोगी ठरत आहे. मसुरे येथील भाई सुर्वे, आपा राणे आदी बहुसंख्य शेतक-यांनी या चारापिकाची लागवड केली असून हा चारा गुरांना दिल्याने दुग्धउत्पादन वाढल्याचे या शेतक-यांचे म्हणणे आहे.

हिरव्या चा-यासाठी पिके

हिरवा चारा देताना तो प्रमाणात देण्याची आवश्यकता असून १० लीटर दूध देणा-या जनावराचे वजन सरासरी ४०० किलो गृहीत धरल्यास त्यास २५ ते ३० किलो हिरवा चारा व ६ ते ७ किलो वाळलेला चारा देणे आवश्यक आहे असे  सहाय्यक कृषी अधिकारी मदने यांनी सांगितले. तृणधान्य चारापिकांमध्ये मक्याचे मांजरी, आफ्रिकन टॉल, गंगासफेद हे वाण आहेत. या पासून ९ टक्के प्रथिने मिळतात.  ओट या हंगामी पिकामध्ये हरिता, केंट, जेएओ ७२२ ही वाण असून यापासून ९ टक्के प्रथिने मिळतात. बरसीम या द्विदल वर्गीय चारापिकामध्ये मस्कावी, जेबी १, जेबीएल १ तर स्पायलोपीकस पासून १३ टक्के प्रथिने मिळतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version