Home टॉप स्टोरी ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेत कडाडले

ज्योतिरादित्य शिंदे लोकसभेत कडाडले

1
Jyotiraditya Scindia

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसने जेएनयू व रोहित वेमुल्लाच्या हत्येवरून मोदी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली.

नवी दिल्ली – ‘राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे मोदी सरकारला देशभक्त वाटतो, तर कोणताही गुन्हा नसलेल्या विद्यार्थ्यांवर थेट देशद्रोहाचा आरोप लावला जातो’, असा घणाघाती आरोप कॉँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी करून मोदी सरकारला धारेवर धरले.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) सुरू असलेली दडपशाही, हैद्राबाद विद्यापीठात दलित विद्यार्थी रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येबाबत शिंदे यांनी आपल्या तासाभराच्या भाषणात मोदी सरकारचे वाभाडे काढले. शिंदे बोलत असताना सरकारी बाकांवर चिडीचूप शांतता होती.

लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर कॉँग्रेसने जेएनयू व रोहित वेमुल्लाच्या हत्येवरून मोदी सरकारची कोंडी करायला सुरुवात केली. लोकसभेतील कॉँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पक्षाचे मुख्य प्रतोद ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणात सरकारला बॅकफूटवर ढकलले.

मोदी सरकारवर आरोपाची राळ उडवताना शिंदे म्हणाले की, मोदी सरकार देशातील तरुणांचा आवाज दडपत असून लोकशाहीच्या तत्त्वांना पायदळी तुडवत आहे. वेमुल्ला प्रकरणात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी व कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हस्तक्षेप केला. दत्तात्रय यांनी त्यांच्या पत्रात रोहितचा उल्लेख जातीयवादी व देशविरोधी केला. मनुष्यबळ विकासमंत्री एखाद्या प्रकरणात पाच पानाचे पत्र लिहितो याचे उदाहरण जगात दाखवा, असे आव्हानच त्यांनी सरकारला दिले.

एफटीआयआय, आयआयटी मद्रास आणि जेएनयूमध्ये वाढत्या दबावाबद्दल ते म्हणाले की, देशातील युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तसेच वेमुल्ला दलित नव्हता, असे म्हणणा-या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, आदिवासी मंत्री ज्युअल ओराम आणि स्मृती इराणी यांचाही शिंदे यांनी समाचार घेतला. शैक्षणिक संस्थांमध्ये आंदोलने हा महत्त्वाचा घटक आहे. पण, कुलगुरूंनी या प्रकरणी अधिक चांगल्या पद्धतीने हा विषय हाताळायला हवा होता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाच्या राजकारणामुळे त्यांनी दलित विद्यार्थ्यांनाच निलंबित करून वसतिगृहाबाहेर काढले, असा आरोप त्यांनी केला.

देशातील लोकशाही संस्थांची आणि जनतेच्या भल्यासाठी काम करणे हे सरकारचे काम आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात देशात असहिष्णुता वाढत असून सर्वानाच असुरक्षित वाटत आहे. देशात लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. देशातील तरुण हे आशास्थान आहे हे पंतप्रधान मोदी सांगतात. पण, मध्य प्रदेशात व्यापमं, पंजाबमध्ये अमली पदार्थाचे व्यसन वाढत आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असून विद्वान व विचारी माणसांचा आवाज दाबला जात आहे, अशी टीका त्यांनी केली. जेएनयू प्रकरण सोडून मोदी प्रत्येक घटनेवर ट्विट करतात. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर टीका झाल्यानंतर पाच दिवसांनंतर त्यांनी या मुद्दय़ावर भाष्य केले. ‘मन की बात’मध्येही या मुद्दय़ाचा उल्लेख नाही, अशी टीका त्यांनी केली.

 राज्यसभेचे कामकाज वाया

लोकसभेबरोबरच राज्यसभेतही रोहित वेमुल्ला व जेएनयू प्रकरणाचे पडसाद उमटले. बसपा नेत्या मायावती यांनी वेमुल्लाच्या हत्येप्रकरणी केंद्र सरकारला धारेवर धरले. सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमकीमुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

मायावती म्हणाल्या की, सरकार या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत आहे. तर स्मृती इराणी म्हणाल्या की, या प्रकरणी आपण सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार आहोत. मात्र, मायावती माझ्या वक्तव्याशी सहमत नसल्याने माझे शिर कापून तुमच्या पायावर ठेवायला तयार आहे, असे इराणी यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करणा-या समितीत दलित व्यक्तीचाही समावेश करावा, अशी मागणी मायावती यांनी केली.

 सरकार घाबरल्यानेच माझा आवाज दडपतेय

सरकार मला घाबरत असून जेएनयू प्रकरणी माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. संसदेत या प्रकरणावर मी बोलेन याची भीती वाटत असल्याने सरकार माझी मुस्कटदाबी करत आहे. कन्हैया कुमार याच्या अटक प्रकरणी जेएनयूच्या विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला होता. संघ व भाजपा त्यांचे तत्त्वज्ञान आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप
त्यांनी केला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version