Home महामुंबई शिक्षणसमिती अध्यक्षांकडून शिक्षकांची शाळा

शिक्षणसमिती अध्यक्षांकडून शिक्षकांची शाळा

0

मुंबई महापालिका शाळांमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही त्याचा योग्य प्रकारे वापर होत नाही.

मुंबई – मुंबई महापालिका शाळांमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतानाही त्याचा योग्य प्रकारे वापर होत नाही. परिणामी महापालिका शाळा दर्जेदार शिक्षणाअभावी विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होऊन बंद पडत आहेत.

त्यामुळे काळानुसार शिक्षण प्रक्रियेत बदल आवश्यक असून प्रशासकीय बाबींवर हा बदल घडवून आणण्यासाठी शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी महापालिकेच्या सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांची शाळा घेत त्यांना बदलाचे धडे दिले.

महापालिकेच्या शाळा एकामागून एक अशा प्रकारे बंद होत असल्यामुळे शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी स्वत: पुढाकार घेत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-यांसह मुख्याध्यापकांचे ब्रेन वॉश करण्यासाठी शुक्रवारी राजे शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती.

या कार्यशाळेत विनोद शेलार यांनी पावणेदोन तास भाषण करत मुख्याध्यापकांना विचारांचा डोस पाजला. आज कस्टर मार्केट आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे आपले ग्राहक समजून त्यांना चांगली सेवा कशा प्रकारे देऊ शकतो याचा विचार करायला हवा. जर कार्यपद्धतीत सुधारणा केल्या तरच महापालिका शाळांमधील शिक्षकांचे अस्तित्व टिकून राहील, असे त्यांनी सांगितले.

आज शाळा बंद होत असल्यामुळे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत पालकांशी संवाद साधणा-या पालक व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून चांगले काम करायला हवे. हे एक माध्यम असून मुख्याध्यापकांनी याद्वारे लीडरची भूमिका पार पाडायला हवी, असे शेलार यांनी सांगितले. जो आपल्याकडे असलेल्या साधनांचा उपयोग योग्य प्रकारे करतो तो लीडर ठरू शकतो.

उपायुक्त, शिक्षणाधिकारी ही वरची फळी असली तरी प्रत्येक शाळांचा पालक असलेला मुख्याध्यापक हाच लीडर असतो. तोच सरदार असतो. त्यामुळे युद्धाची पहिली फळी म्हणून मुख्याध्यापकांकडे पाहिले जाते. त्यामुळे मुख्याध्यापक अधिक शिक्षकांसह शाळांमधील सर्वच कर्मचा-यांनी टीमवर्कने करायला हवे असे सांगतानाच त्यांनी शिक्षण विभागांमधील ग्रुपबाजीही संपवून सर्वानी टीमवर्कने काम केल्यास महापालिकेच्या शाळा टिकतील.

नव्हे तर चांगल्या दर्जाचे शिक्षणही मिळेल. परिणामी खासगी शाळांकडे असलेला कल कमी होऊन महापालिकेच्या शाळांमध्ये पालक आपल्या मुलांना पाठवतील. हे चित्र आम्हाला पाहायचे आहे आणि तुम्हा सर्वाच्या सहकार्यानेच सध्याचे चित्र बदलले जाईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

महापालिका शिक्षण विभागाच्या इतिहासात प्रथमच मुख्याध्यापकांची कार्यशाळा एका शिक्षण समिती अध्यक्षाने आयोजित करत त्यांना मोलाचे धडे दिले. या कार्यशाळेत उपायुक्त (शिक्षण) सुनील धामणे, शिक्षणाधिकारी शांभवी जोगी, सर्व उपशिक्षणाधिकारी तसेच सुमारे हजारांहून अधिक मुख्याध्यापक तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version