Home महामुंबई शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमतच नाही

शिवसेनेची सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमतच नाही

1

शिवसेनेची सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमतच नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

मुंबई- भाजपा सरकारमध्ये सहभागी शिवसेनेला अद्याप मानाचे स्थान नाही. फक्त सेनेची आरडाओरड सुरू आहे. त्यामुळे शिवसेना सध्या तरी भाजपासोबत काडीमोड घेईल, असे वाटत नाही. मुळात शिवसेनेची सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमतच नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली.

शिवसेनेची नेमकी भूमिका काय, हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पहिल्यांदा विरोधीपक्षात बसलेली शिवसेना नंतर सत्तेत जाऊन बसते हे अनाकलनीय आहे. सत्तेत सहभागी होऊन काही दिवस होत नाहीत तोच शिवसेनेत कुरबूर सुरू आहे. सत्तेत राहूनही काही करता येत नसल्याची सल स्वत: उद्धव यांना आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांना जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवावे लागले, असा चिमटा तटकरे यांनी काढला.

उद्धव हे भाजपाच्या दिल्लीतील पराभवानंतर खूष होतात. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनावतात. हे पाहता शिवसेनेची नक्की भूमिका काय, असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा हा विरोध कायम राहील का, असा खोचक सवाल तटकरे यांनी केला. शिवसेनेची सत्ता लालसा पाहता ते सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत दाखवतील का, याबाबत शंका असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीचे बारीक लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीचा हाच प्रमुख विरोधीपक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यापुढील काळात राष्ट्रवादीला वगळून राज्याचे राजकारण होऊ शकणार नाही, असेही ते म्हणाले.

धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे

राष्ट्रवादी हा विरोधीपक्षातच आहे आणि विरोधीपक्षाची भूमिका कायम पार पाडणार आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप करत बसण्यापेक्षा सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन तटकरे यांनी केले. काँग्रेसला मुखेड पोटनिवडणुकीत पाठिंबा दिल्याचे सांगत काँग्रेसनेही भविष्यात मैत्रीसाठी प्रतिसाद दिल्याचेही ते म्हणाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version