Home महामुंबई महापालिकेत महागोंधळ

महापालिकेत महागोंधळ

0

शीतल म्हात्रे आणि डॉ. शुभा राऊळ या शिवसेनेच्या नगरसेविकांवरील अत्याचार आणि बदनामीविरोधात नगरसेवकांनी महापालिका सभागृहात चर्चा करण्याची मागणी करताच महापौरांची बोबडीच वळली.

मुंबई- शीतल म्हात्रे आणि डॉ. शुभा राऊळ या शिवसेनेच्या नगरसेविकांवरील अत्याचार आणि बदनामीविरोधात नगरसेवकांनी मंगळवारी महापालिका सभागृहात चर्चा करण्याची मागणी करताच महापौरांची बोबडीच वळली. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, सपा आदी पक्षांचे नगरसेवक या मुद्दय़ावरून एकत्र आले. त्यांच्या आक्रमकतेपुढे निभाव न लागलेल्या महापौरांनी चर्चा करण्याची मागणीच फेटाळली. शिटय़ा वाजवत विरोधकांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे महापौरांनी पाच नगरसेवकांना दिवसभरापुरते निलंबित केले.

गेल्या ४५ वर्षात प्रथमच नगरसेवकांना सभागृहात निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु कारवाईनंतरही विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यामुळे अखेर अर्ध्या तासातच कामकाज तहकूब करत महापौरांसह सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनी सभागृहातून पळ काढला.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभा सुरू होताच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि सपाच्या नगरसेविकांनी गटनेत्यांच्या आसनांचा ताबा घेतला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे आणि डॉ. शुभा राऊळ यांच्यावरील अत्याचाराविरोधात आमदारांवर गुन्हा दाखल झाला होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृहात चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगत निवेदन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी मागच्या बाकावरून केली. मात्र विरोधी पक्षनेतेपद हे वैधानिक आहे. त्यांचे आसन हे पहिल्या रांगेत आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आसनावर बसून निवेदन करावे. मागच्या बाकावर बसून त्यांना निवेदन करता येणार आहे. हे महापालिकेच्या प्रथा आणि परंपरेला मोडीत काढणारे असल्याचे सांगत महापौर सुनील प्रभू यांनी निवेदनास नकार दिला. त्यामुळे विरोधकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. परंतु त्यानंतरही विरोधी पक्षनेत्यांना बोलू न दिल्यामुळे मनमानी कारभार करणा-या महापौरांची कानउघाडणी करण्यासाठी नगरसेवकांनी चक्क शिटय़ा वाजवत त्यांचा निषेध केला.

सभागृहात अशा प्रकारच्या शिटय़ा वाजवत बेशिस्तीचे वर्तन केल्यामुळे महापौरांनी प्रथम काँग्रेसच्या वकारुनिस्सा अन्सारी, पारुल मेहता आणि नूरजहाँ रफिक या तिघींना एक दिवसाकरता निलंबित केले. त्यानंतरही ते सभागृहाबाहेर गेल्या नाहीत आणि विरोधक आणखीनच आक्रमक झाल्यामुळे महापौरांनी त्यानंतर काँग्रेसचे प्रवीण छेडा आणि मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांना निलंबित केले. मात्र तरीही विरोधकांचा गोंधळ थांबत नाही, हे पाहून अखेर महापौरांनी अधिनियमातील कलम ३६(अ)२नुसार कामकाजच बरखास्त केले.

दहिसर पोलिस ठाण्यावर महिलांचा मोर्चा

नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणी शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांना पोलिसांकडून अद्याप अटक न झाल्यामुळे मंगळवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि स्वाभिमान संघटनेच्या महिलांच्या वतीने दहिसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चात सामिल झालेल्या महिलांनी घोसाळकरांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. दहिसर पोलिसांनी घोसाळकर यांच्यावर अश्लील शब्द वापरल्याप्रकरणी तसेच गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

तीन सभा तहकूब

शीतल म्हात्रे प्रकरणात सभागृहात चर्चा करण्यास दिली जात नसल्यामुळे आतापर्यंत तीन सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. सत्ताधारी पक्ष महिलांच्या मुद्दय़ावर गंभीर नसून, यासाठी तीन सभा तहकूब कराव्या लागल्या. आज हा मुद्दा केवळ त्यांचा वैयक्तिक राहिला नसून, संपूर्ण महिलांचा आहे. परंतु सत्ताधारी जाणीवपूर्वक चर्चेसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका वकारुनिस्सा अन्सारी, नयना शेठ, अजंता यादव आदींनी केला.

४५ वर्षानंतर निलंबनाची कारवाई

सभागृहात शिटय़ा वाजवून गोंधळ घातल्यामुळे पाच नगरसेवकांना महापौरांनी एका दिवसासाठी निलंबित केले. अशी कारवाई ४५ वर्षानंतर झाली. १९६८-६९ मध्ये सदानंद वर्दे आणि सोहनसिंग कोहली यांना सभागृहातील बेशिस्त वर्तनाबद्दल एका दिवसाकरता निलंबित करण्यात आले होते. तत्पूर्वी १९५५ मध्येही नगरसेवकांना निलंबित करण्यात आले होते. त्या वेळी महापालिकेचे सुरक्षा खाते नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत नगरसेवकांना बाहेर काढण्यात आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version