Home Uncategorized शेतक-यांना खुणावतोय मोगरा

शेतक-यांना खुणावतोय मोगरा

3

फुलांची बाजारपेठ सर्वत्रच जोरात आहे. सिंधुदुर्गही फुलांच्या मागणीच्या बाबतीत मागे नाही. मात्र त्याप्रमाणात जिल्हय़ात फुलांचे उत्पादन होत नाही. त्यामुळे परजिल्हय़ात उत्पादित झालेली फुले चढय़ा भावाने येथील ग्राहकांना विकत घ्यावी लागतात. जिल्हय़ातील फुलांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी येथील शेतक-यांनी फु लशेतीकडे वळले पाहिजे. मोग-याच्या रूपात शेतक-यांकडे यादृष्टीने चांगला पर्याय उपलब्ध आहे. मोग-याला बाजारात विविध कारणांसाठी मोठी मागणी वाढत आहे. यादृष्टीने नियोजन करून शेतक-यांनी मोग-याची शेती केल्यास शेतक-यांची आर्थिक प्रगती वेग घेईल. 

मोग-याची शेती हा फुलशेतीत शेतक-यांना चांगला पर्याय ठरू शकेल. ही बाग एक वेळ केली की सलग १० वष्रे उत्पादन घेता येते. या शेतीला पाणी कमी प्रमाणात लागते. जनावरांकडून मोग-याला धास्ती नसते. यात शाश्वत उत्पन्न मिळत असून बाजारपेठेतील वाढत्या मागणीमुळे हमीभावही चांगला मिळतो. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास शेतक-यांसाठी अधिक किफायतशीर ठरते. विशेष म्हणजे एकदा लागवड केलेली बाग सलग १० वष्रे फुले देत असल्याने ठिबक सिंचनाचा खर्च पहिल्याच वर्षी वसूल होतो. तसेच रोपे लागवडीसाठी जमीन मशागत व रोपांचा खर्चही पहिल्याच वर्षी करावा लागतो. त्यामुळे वर्षाला सुमारे लाखभर रुपयांचा खर्च वाढतो. कोकणी माणूस हा व्यवहार पाहतो. अमुक रुपये गुंतवल्यावर किती रुपये मिळणार, हे विचारतो. व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचे झाल्यास १० वर्षाला २७ लाख रुपये गुंतवा आणि ९० लाख रुपये कमवा, असे म्हणावे लागेल.

या शेतीसाठी मुरमाड व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. तशा प्रकारची जमीन आपल्या जिल्हय़ात सर्वत्र उपलब्ध आहे. नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जून-जुलै महिन्यामध्ये या फुलशेतीची लागवड केली जाते. आपल्याजवळ बेंगलोर जातीची मोगरा रोपे चांगले उत्पादन देतात. एक एकर जागेमध्ये ही शेती करावयाची झाल्यास ४ हजार ५०० रोपे लागतात. दोन रोपांतील अंतर २ फूट ठेवावे लागते. २ वाफ्यांतील अंतर ५ फुटांचे असते. मोग-याच्या शेतीसाठी जमीन मशागत करताना एक एकरसाठी ८ टन शेणखत, २०० किलो एसएसपी खत, २०० किलो निम पेंडल व १२५ किलो करंज पेंडल खत घालावे लागते. तसेच ३०० किलो सुफला खताची आवश्यकता असते. पहिल्या वर्षी उत्पादन मिळत नाही. दीड वर्षापासून उत्पादनाला सुरुवात होते. फुलांची तोडणी सकाळी ७.३० ते १०.३० पर्यंत करायची असते. त्यानंतर फुलांचे पॅकिंग करून बाजारात पाठवावी लागतात. सध्या मोगरा फुलाला किलोमागे २०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. एका एकरमागे दररोज मोगरा फुलाच्या किमान २५ किलो कळय़ा मिळतात. लागवड केल्यानंतर जानेवारीमध्ये छाटणी करावी लागते. आठ महिन्यांत सरासरी सहा टन उत्पादन मिळते. अशा प्रकारे फुलांची लागवड सुरू झाल्यानंतर प्रत्येक वर्षी किमान ९ लाख रुपये उत्पादन घेता येते.

पहिल्या वर्षी खते व कीटकनाशके ४५ हजार रुपये, रोपे ३५ हजार रुपये, बेड खर्च १० हजार रुपये, ठिबक सिंचन खर्च ३५ हजार रुपये, वाहतूक खर्च ५ हजार रुपये, तर कामगार मजुरी २ लाख ४० हजार रुपये अशाप्रकारे एकूण ३ लाख ७० हजार रुपये खर्च येतो. मात्र या बदल्यात ९ लाख रुपये हमखास मिळत असल्याने ४ लाख ३० हजार रुपये आर्थिक फायदा होतो. पहिल्या वर्षातील एकूण खर्चामधील किमान १ लाख रुपये खर्च दुस-या वर्षापासून करावा लागत नसल्याने ५ लाख १० हजार रुपये तिस-या वर्षापासून निव्वळ नफा मिळू शकतो. एकदा केलेली बाग सलग दहा वर्षे राहत असल्याने या दहा वर्षामध्ये २७ लाख रुपये खर्च येतो. मात्र यातून ९० लाख रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळते. त्यामुळे तब्बल ६३ लाख रुपयांचा आर्थिक फायदा होऊ शकतो.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version