Home कोलाज श्रावणातला रिमझिम पाऊस

श्रावणातला रिमझिम पाऊस

1

श्रावणातला पाऊस खरे तर ऊन-पावसाचा सुंदर खेळ असतो. एकतर तो रिमझिम असतो, त्यामुळे तो अंगावर घ्यायला मजा वाटते. श्रावणातला रिमझिम मोरपिशी पाऊस चक्क खिडकीतून बघणा-यांची मला कीव येते.

श्रावणातला पाऊस खरे तर ऊन-पावसाचा सुंदर खेळ असतो. एकतर तो रिमझिम असतो, त्यामुळे तो अंगावर घ्यायला मजा वाटते. श्रावणातला रिमझिम मोरपिशी पाऊस चक्क खिडकीतून बघणा-यांची मला कीव येते. जगातल्या एवढया सुंदर अनुभवाला आपण मुकतो आहोत हे त्यांच्या लक्षात येत नाही.

खरं तर पाऊस घराबाहेर येता-जाताना अनुभवायचा असतो. विशेष म्हणजे पाऊस आपल्या घराच्या अंगणात पडत असताना त्याचे नाचून स्वागत करायचे, पण हल्ली घराला अंगण कुठे असते. म्हणजे वीस-वीस पंचवीस माळ्याच्या बिल्डिंग असतात. मग मधल्याच एखाद्या फ्लॅटला अंगण कुठून असणार.

अर्थात गॅलरी असते, पण तिला अंगणाची सर येत नाही. सर्व कॉलनी मिळून एक मोठे प्रांगण असते. पण ते लगेच घराच्या दारासमोर नसते. बहुतेक शहरात हीच परिस्थिती असते. गावी मात्र घराच्या समोर अंगण असल्याने रिमझिम पावसाची मजा घेता येते. पण हल्लीही गावाकडे उंच इमारती वाढून कौलारू घरे कमी व्हायला लागलीत. असो! तर श्रावणातील हा मऊ रेशमी रिमझिम पाऊस अंगावर घेताना त्याचा स्पर्श खरोखरच मोरपिशी असतो. आपण नुकतेच आषाढातील मुसळधार पावसाच्या तडाख्यातून वाचलेले असतो. आठ-आठ दिवस हा पाऊस मुक्काम ठोकून असतो.

धड घराबाहेर पडता येत नाही की, ऑफिसातून घरी येता येत नाही. मोठं टेन्शन आलेले असते, पण श्रावणमास आला की सारं टेन्शन जातं. छत्रीचा भार डोक्यावरून जातो. छत्री घेतलीच पाहिजे, असं बंधन नसतं. ती नसली तरी चालते. अगदी विसरली तरी चालते. थोडक्यात आषाढातला पाऊस, त्यात मुसळधार असेल तर अगदी अंगावर येतो आणि तो डोक्यात जातो. मात्र श्रावणातला रिमझिम पाऊस अंगावर घ्यावासा वाटतो आणि तो उन्हातला इंद्रधनुषी पाऊस असल्याने डोळ्यांचे पारणे फेडतो.

आषाढाचा पाऊस मनासारखा पडल्यावर तहानलेली झाडे तृप्त होतात. माती सुखावते. हवेत थोडासा गारवा येतो. सगळीकडे हिरव्या रंगांची उधळण सुरू होते. त्यात सकाळ प्रसन्न असतानाच आभाळात इंद्रधनुष्याच्या रंगांचा उत्सव सुरू झाला की श्रावण सुरू झाला असे समजावे. श्रावणात पावसाच्या अधून मधून सरी येतात आणि सकाळी सकाळी अंगणात सडासमार्जन करून जातात.

आभाळात निळे-जांभळे, भुरके ढग जमू लागतात, ते थोडे सावळे झाले की पावसाची सर उन्हाला भेटून जाते. सकाळी सकाळी कोवळे ऊन आणि त्यात पडणारा रिमझिम पाऊस हिरव्यागार गवतावर पडला की जणू काय पैंजणाचे घुंगरूसारखे गवतावर सांडते. दुपार झाली की वातावरण थोडे धुसर होते, कारण ऊन पश्चिमेला आळशासारखे रेंगाळते. त्या सोनेरी उन्हात श्रावणातील एखादी चंदेरी सर नाचून जाते. सूर्य मावळत असताना मग आपल्याला भा. रा. तांबे यांच्या ओळी आठवतात. त्या अशा –

तांबूस पिवळे ऊन कोवळे पसरे चौफेर।
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर।।

म्हणजे तांबूस पिवळया सोनेरी उन्हात जेव्हा श्रावणाच्या रेशमी धारा मिसळतात तेव्हा उन्हात पाऊस पडतोय की पावसात ऊन पडतंय हे कळत नाही. लहानपणी उन्हात, पाऊस पडू लागला की, आम्हाला मोठी माणसं म्हणायची, उन्हात पाऊस पडतोय म्हणजे कोल्हा कोल्हींचं लगीन लागतंय. मग आम्हीही तेच म्हणत पावसात नाचायचो. पण आता जाण आल्यावर वाटतं की, श्रावणातल्या पावसात लग्न लावणारे कोल्हा-कोल्ही हे मोठे रसिक जोडपे असावे. निसर्गाने मात्र एवढा रसिकपणा माणसात दिला नाही.

श्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन निसर्गकवी बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे व वास्तव केले आहे. ते म्हणतात,

‘श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात पिवळे ऊन पडे’

श्रावणातल्या पावसातला मातीचा हिरवा उत्सव साजरा होत असताना, श्रावणातला पाऊस धरणीला कसे अधून मधून स्नान घालतो आणि मग रिमझिम पावसात भिजलेली ती ओले ती धराराणी कशी गर्भवती होऊन आपुले हिरवे डोहाळे पुरवते, हे सारं श्रावणमासात घडते. आषाढातला पाऊस मातीच्या गर्भाधानाचा सोहळा करतो, तर श्रावण मातीचे डोहाळे पुरवतो. अशावेळी निसर्ग प्रसन्न असतो. वातावरणात गारवा आलेला असतो.

पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशावेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते तर कधी हळूच ऊन येते. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस पडतो, तर कधी पावसात ऊन पडते, पाऊस वेडा असतो म्हणून श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधत असावेत किंवा आषाढात पाऊस माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधीत असावा.

लहानपणी आम्हाला कुणी मारले तर आई आमचं सांत्वन करताना म्हणायची, ‘थांब त्याचं घर आपण उन्हात बांधू’ खरं तर वेडयाचं घर उन्हात असतं. पण हल्ली सा-यांचीच घरे उन्हात बांधतात. म्हणजे आपण सारेच वेडे आहोत काय? सारे जग नसले तरी बहुतेक जण पावसाचे वेडे असतात. अशांसाठी श्रावण पावसाचं घर उन्हात बांधतो.

श्रावणाचा महिना म्हणजे रिमझिम पावसाचा महिना! तसाच तो सणासुदीच्या दिवसांचा महिना असतो. आपल्या संस्कृतीत सणांची सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते आणि वर्षभर आपण सणच साजरे करत असतो. म्हणजे आयुष्यात निम्मा काळ आपण सणासुदीचे दिवस साजरे करण्यात घालवतो. त्यात श्रावणातले सण साजरे करताना वरून पाऊस जणू रिमझिमत्या रूपाने गुलाबपाणी नटलेल्या स्त्रियांवर शिंपडीत असतो.

श्रावणातल्या अनेक सणात स्त्रिया हिरव्यागार साडया नेसून आपले आवडते खेळ खेळून घेत असतात. हल्ली हे खेळायला कुणालाच वेळ नसतो. मात्र ते खेळ आपल्याला टीव्हीवर किंवा फेसबुकवर बघायला मिळतात, परंतु गावाकडे अजून तरी हा हिरवेपणा टिकून आहे. गावाकडे श्रावणात ब-याच तरुणी हिरव्यागार साडया नेसून गावातून किंवा शेतावर नटताना, मुरडताना आढळतात. ते दिवस आठवले की या ओळी ओठावर येतात.

श्रावणातल्या एका दिवशी
इर्कलीत त्यात तुला पाहिली
जास्वंदीचा पदर तांबडा
शुभ्र पांढरी जुईची चोळी

उत्सवात किंवा जत्रेत अशी एखादी बाई पिवळ्या जर्द साडीत जवळून गेली की जणू चाफ्याचे झाड घमघमाट करीत जवळून गेल्यासारखे वाटते. अगदी शहरातल्यासुद्धा पार्टीत हा अनुभव मलाच काय इतरांनाही येत असेल. पण हल्ली गावातही नऊवारी काय किंवा पाचवारी साडया जाऊन आता सगळीकडे ड्रेस आल्याने पूर्वीचे ते ग्रामीण सौंदर्य आढळत नाही. श्रावणातल्या तर हिरव्या साडीला सौंदर्याचा दुसरा पर्याय नाही.

श्रावणातल्या सणासुदीत जसे स्त्रिया अनेक घरगुती खेळ खेळतात, तसाच खेळ श्रावणातला पाऊस उन्हात खेळत असतो किंवा ऊन-पाऊस दोघेही हा खेळ खेळत असतात. मला तरी हे खेळ ऊन आणि पाऊस खेळत असताना दिसतात.

सकाळी अंगणात सोनेरी ऊन पडले असताना, श्रावणातील रिमझिम पाऊस हुतुतू खेळत उन्हाच्या पाठीला शिवतो आणि सर होतो, तर कधी श्रावणातला पाऊस लंगडी घालीत तथ्थैया करतो आणि ऊन आऊट होत नाही, म्हणून गयावया करतो, तर कधी श्रावणातला पाऊस खो-खो खेळत झरझर येतो आणि उन्हाला खो देऊन भुरभुर जातो. तर कधी तो आटयापाटया खेळत टपटप येतो आणि उन्हाला हुलकावणी देऊन झाडामागे गपगप होतो.

यावेळी हिरवी झाडे हा खेळ बघत पाऊस डोक्यावर घेत हर हर करतात. मग हा खेळ थांबायला संध्याकाळ होते आणि अशावेळी उन्हं मावळतीला जाताना दिसतात. खेळ खेळून ती दिवसभर थकलेली असतात. सगळीकडे धूसर वातावरण पसरलेले असते. धुक्यात हिरवीगार सृष्टी बुडालेली असते.

दिवसभर भिजलेला सूर्य मावळत असतो. त्याचे सोनेरी हात जणू काय निरोप देत असतात, जणू काय तो माणसांना सायोनारा करीत असतो, परंतु आयुष्याच्या घाईगर्दीत माणसाला तो सोन्याचा गोळा बघायला वेळ नसतो आणि वाटते आताच्या वातावरणात बहुतेक श्रावणाचे दिवस सरणार असे दिसते. कारण श्रावण कधी पुढे जाईल तर कधी येणारही नाही, पण मला श्रावणाच्या या ऊन-पावसाच्या खेळात मला कुणाची तरी आठवण होते.

श्रावणाच्या उन्हा-पावसाच्या खेळात ऊन बाद होते।
आणि संध्याकाळी भरपावसात मला तुझी याद येते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version