Home कोलाज संदेसे आते थे..

संदेसे आते थे..

1

गावी पत्र पाठवताना जोडकार्ड वापरले जायचे. एका पोस्टकार्डावर खुशालीचा मजकूर तर दुसरे पोस्टकार्ड कोरे ठेवले जायचे. मात्र त्यावर आपला पत्ता लिहिला जायचा. त्यावर परतपावली समोरून उत्तर अपेक्षित असायचे. आता मोबाईलवर चुटकीसरशी खुशाली मिळते म्हटल्यावर कोण कशाला पत्र लिहिण्याच्या फंदात पडेल?

या वर्षीच्या एक एप्रिलपासून ‘मनीऑर्डर’ ही पोस्ट खात्यातर्फे चालविण्यात येणारी सेवा बंद करण्यात आल्याचे वाचनात आले. साधारण दीड वर्षापूर्वी याच खात्याने ‘तार’ सेवा बंद केली. ती बंद होण्याच्या शेवटच्या दिवसात या तारेची आठवण आपल्याकडे असावी म्हणून अनेकांनी तारेद्वारे जवळच्या नातेवाइकांना संदेश पाठवून घेतले. त्यांच्याकडून तोच तारेचा कागद आता ऐतिहासिक ऐवज म्हणून जतन केला जाईल.

खरं तर संपर्काची साधने अत्याधुनिक आणि जलद झालेल्या आणि ती साधने वापरत असलेल्या हल्लीच्या काळातील पिढीला असा काही प्रकार असेल, किंबहुना होता हे ऐकूनच हसू येईल. परंतु असाही काळ होता की पोस्ट खाते हे सर्वसामान्यांच्या जीवनाचा एक भाग होते.

खुशालीसाठी पाठविण्यात येणारी पत्रे, तातडीच्या आणि महत्त्वाच्या संदेशासाठी तार, एका भागातून लांबवर असलेल्या दुस-या भागातील नातेवाइकांकडे पैसे पाठविण्यासाठी मनीऑर्डर, या दळणवळणाच्या सोयीव्यतिरिक्त गुंतवणुकीसाठी किसान विकास पत्रे, राष्ट्रीय बचत योजना पत्रे, मुदत ठेवी, पोस्ट बचत खाते, पोस्ट विमा योजना या देखील सुविधांच्या निमित्ताने टपाल खात्याचा लोकांशी जवळचा संबंध होता. संबंध होता असेच म्हणावे लागतेय कारण एकामागोमाग एक सुविधा बंद होत आहेत.

लहानपणी पोस्टाशी संबंध यायचा तो पत्र लिहिण्याच्या वेळी. मुंबईची खुशाली गावी कळवून तिकडच्या खुशालीची विचारणा करण्यासाठी पत्र लिहिले जायचे आणि शाळेत शिकतो म्हटल्यानंतर आम्ही ते लिहिणे व आलेले पत्र वाचणे हे ओघाने व्हायचेच. पोस्टकार्ड हे सर्वात जास्त वापरले गेलेले माध्यम. मजकूर थोडा जास्त किंवा खासगी असेल तर आंतरदेशीय पत्र वापरले जायचे.

खासगी असेल तर त्यावर ‘मालकाशिवाय उघडू नये’ अशी सूचनाही लिहिली जायची. गावी पत्र पाठवताना जोडकार्ड वापरले जायचे. एका पोस्टकार्डावर खुशालीचा मजकूर तर दुसरे पोस्टकार्ड कोरे ठेवले जायचे. मात्र त्यावर आपला पत्ता लिहिला जायचा. त्यावर परतपावली समोरून उत्तर अपेक्षित असायचे.

आता मोबाईलवर चुटकीसरशी खुशाली मिळते म्हटल्यावर कोण कशाला पत्र लिहिण्याच्या फंदात पडेल? तसे वर्तमानपत्रात नियमित पत्रलेखन करणारे पोस्टकार्डाचा वापर काही प्रमाणात करत असले तरी पत्रलेखन आता केवळ शालेय अभ्यासातच राहिले आहे. ‘आईचं पत्र हरवलं’ असा खेळ खेळला जायचा. आता तर सगळ्यांचीच पत्रं हरवली आहेत. त्यामुळे पत्रंही नाही आणि तो खेळही नाही.

पत्र नेहमीच्या खुशालीकरिता तर तार महत्त्वाचे व तातडीचे संदेश देण्यासाठी वापरली जात असे. इतरही संदेश तारेने पाठवले जात असले तरी मुख्यत्वे दु:खद बातमी कळविण्यासाठी तारेचा वापर होत असे. त्यामुळे तार घेऊन पोस्टमन आल्यास काहीतरी विपरीत घडल्याची भावना असे. याच तारेचा ‘कडकट्ट’ हा आवाज दीड वर्षापूर्वी बंद झाला. मनीऑर्डर तर गावातील

नातेवाइकांसाठी हक्काचा आधार असायचा. चाकरमान्यांकडून ठरावीक तारखेला ठरावीक रक्कम हमखास मनीऑर्डरद्वारे गावी पाठविली जात असे. सोबत एक-दोन ओळींचा मजकूरही असे. कितीतरी कुटुंबे या मनीऑर्डरवरच जगली. आता तीही बंद झाली. नाहीतरी आता पैसे पाठविण्याची इतर माध्यमे उपलब्ध झाल्यावर हे माध्यम बंद होणारच होते.

पत्र, तार, मनीऑर्डर हातात पडायची ती पोस्टमनमुळे. वर्षाचे बारा महिने व उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या सर्व ऋतूत पोस्टमन पत्रे, तार, मनीऑर्डरी यांचे वितरण करत असे. आताही पोस्टमनकडे ‘स्पीड पोस्ट’ची कामे असतात. परंतु तार, मनीऑर्डर बाद झालेत. पत्रे क्वचितच पोहोचवावी लागतात. अगोदरच्या काळात मात्र पोस्टमन सुख-दु:खाच्या बातम्या पत्र, तार यांच्या माध्यमातून पोहोचवून आपले काम अविरत करत असे. त्यामुळे त्याची वाट पाहिली जात असे. आता मात्र खासगी कुरियर वाढल्याने पूर्वीच्या उत्सुकतेने पोस्टमनची वाट पाहिली जात नाही.

जीवनचक्र हे असेच चालत राहणार. जुन्या गोष्टी जाऊन त्यांची जागा सुधारित अशा नव्या गोष्टी घेतात. हे बदल चांगल्यासाठीच असतात. पण म्हणून जुन्यांची गोडी कमी होत नाही. जुन्या गोष्टी सोडून देताना त्यांचे स्मरणरंजन करणे एवढेच आपल्या हाती उरते. मनीऑर्डर बंद झाल्याचे कळताच मी तरी वेगळे काय केले? तरीपण त्या निमित्ताने पोस्टाशी निगडित असलेल्या आठवणींना उजाळा देता आला हेही नसे थोडके!

1 COMMENT

  1. खुप सुंदर लिहीलंय.
    मनिऑर्डर व तार बंद झाली हे खरे परंतु पत्र सेवा बंद व्हायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version