Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ

संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ

1

बहुतेक वीरगळ शिवमंदिराच्या जवळ, क्वचित शेतात व रणभूमीच्या आसपास आढळतात. लोकभावना अशी आहे की, मृतात्मा प्रथम शिवगणात सामील होऊन नंतर तो मोक्षास जातो. त्यामुळे अशी स्मारकं शिवमंदिराच्या आजूबाजूस उभी केली जातात किंवा ठेवली जातात. त्यावर शिवलिंगाची पूजा ठळकपणे दाखविली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवमंदिरं जास्त असल्यामुळेच देवस्थानच्या आसपास दिसणा-या वीगळांची संख्याही जास्त आहे. त्यांपैकीच काही वीरगळांविषयी असलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध.

कोकणातील वीरगळांचा अभ्यास करताना चित्रमय स्मृतिशिल्पात बोरिवली येथे अस्तित्वात असलेला एकसार वीरगळ हा संपूर्ण महाराष्ट्रात अद्वितीय असा वीरगळ आहे. तो शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना असून त्यावर बारकाईनं कोरण्यात आलेल्या शिल्पांमधून तत्कालीन युद्धदलाचा वापर दर्शवण्यात आला आहे. त्यावर कोरलेली अक्षरं पुसट झालेली असली, तरी पाश्चात्त्य पुरातत्त्ववेत्ता कझिन्सच्या मते, हा वीरगळ श्री (ठाणे) स्थानकाचा शेवटचा शिलाहार राजा सोमेश्वर व देवगिरीचा राजा महादेव यादव यांच्या कालखंडातील (इ.स १२६५) आहे. यावर पायदळ, घोडदळ, गजदल आणि नाविक दलात झालेलं घनघोर युद्ध तसंच सोमेश्वराचं हौतात्म्य या घटनांचं शिल्पचित्रण आहे. समुद्रातील नाविक युद्धात सोमेश्वर बुडून मेला, याचं वर्णन हेमाद्रीने ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या ग्रंथात केलं आहे. ते वाक्य असं, सोमेश्वरानं महादेव राजाच्या क्रोधाग्नीपेक्षा समुद्रातील वडवानलाला तोंड देणं पसंत केलं असावं. यामुळे या वीरगळाला लिखित वाङ्मयाची पुष्टी मिळते. या युद्धात शिलाहारांचं राज्य नष्ट झालं. सोमेश्वराचे अग्निसंस्कार समुद्राकाठच्या एकसर गावात करण्यात आले. त्या जागी या महायुद्धाचं वीरगळरूपी चित्रमय स्मारक उभारण्यात आलं. रायगड जिलत देगावच्या मराठय़ांविरुद्ध सुलतानशाहीच्या युद्धात कामी आलेल्या अनेक अनाम वीरांच्या स्मारक शिला पसरल्या आहेत.

वीरगळांनासुद्धा वेगवेगळी नावं आहेत. ज्या चित्रशिल्पात गाईबैलांची खिल्लारं दाखवितात व जो योद्धा गोपालांच्या रक्षणार्थ लढता लढता वीरगतीस प्राप्त झाला, त्याला ‘गोवर्धन वीरगळ’ म्हणतात. एखादा योद्धा युद्धात धारातीर्थी पडला व त्याची पत्नी त्याच्याबरोबर सती गेली, तर त्या चित्रात ती पालखीत बसविलेली दाखवतात, अशा स्मारकांना ‘पालिया’ असं म्हणतात. काही स्मारकांत खालच्या दालनात ध्यानस्थ साधू बसलेला किंवा झोपलेला दाखवितात. ती साधु-महात्म्यांची ‘समाधीशिला’ होय. सती गेलेल्या स्त्रीच्या ‘सतीशिला’ कोकणात ब-याच ठिकाणी दिसतात. या पाषाणात कोपरातून दुमडलेला हात व हाताचा पंजा असतो. हातात कंकणाचा चुडा भरलेला दाखवितात. एखादा राजा, सेनापती, सैनिक या मृतांच्या सती गेलेल्या स्त्रियांच्या या ‘सतीशिला’ होय (संदर्भ-विखुरल्या इतिहासाच्या खुणा).

असाच एक खजिना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हिवाळे गावातील धनगरवाडीच्या सडय़ावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल गावावरून हे अंतर ८ ते १० कि.मी. आहे. या एक हेक्टर भागात १५ रेखाटनं आढळतात. नक्षीदार चौकटीत कोरलेली, झोपलेल्या अवस्थेतील मानवी आकृती जिचं डोकं, हात, धड, पाय, ढोपरापर्यंतचा भाग शाबूत आहे. दुस-या शिल्पाकृतीत चार नक्षीदार चौक, चित्रलिपीशी साधम्र्य साधणारा मजकूर मात्र वाचता येत नाही. यावर बैल, शिकारी, माणूस अशी काही चिन्हं आहेत. कातळाच्या अन्य भागांत रिंगण, चंद्रकोर, वृक्ष आदी कलाकृती आहेत. माश्यांच्या कोरलेल्या दोन चित्रांपैकी एक उठावदार आहे तर दुस-यात डोळे, कल्ले, शेपूट हे सर्व कोरलेले भाग स्पष्ट दिसतात. तसंच एकमेकांकडे पाठ केलेल्या पक्ष्यांच्या जोडीचं चित्रही स्पष्ट दिसतं.

मठगावचा शिलालेख हा जिल्ह्यातील यादवकालीन मराठीचा एक उत्तम नमुना असून मराठी भाषेच्या इतिहासातील शिलालेखांमधला तो मैलाचा दगड ठरला आहे. शके १३१९चा हा शिलालेख. कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर कुडाळपासून १६ किमी व वेंगुल्र्यापासून ३ कि. मी. अंतरावर असलेलं मठ हे गाव. या गावातील मठ भागातील स्वयंभू देवळाच्या शेजारी एक छोटं देवालय आहे. त्यास मांगल्याचं देऊळ म्हणून ओळखतात. या देवळात सहा पाषाण भिंतीला टेकवून उभे ठेवले आहेत. त्यातील एका पाषाणावर शके १३१९ इ. स. १३९५चा शिलालेख दिसून येतो. हाच मठगावचा शिलालेख होय. ख्यातनाम इतिहास संशोधक राजवाडे यांनी १९०३ मध्ये तो प्रथम वाचला. त्यानंतर अनेक संशोधकांनी त्याचं वाचन केलं. चंदगड अधिपतीच्या वतीने होडावडे परगण्याचे कारभारी मांग सावंत हे होते. मांग सावंत हे मठ गावातील मुस्लिम सरदाराबरोबर लढताना धारातीर्थी पडले. मांग सावंत आणि त्यांच्या सती गेलेल्या सहा बायकाचं स्मारक रूपपाषाण म्हणजे मांगल्याचं देऊळ. त्याचप्रमाणे त्यात भडखांब किंवा देवालयाची घंटा बांधलेली नाही. या सहा वीरगळांपैकी तिन्हींवर लेख कोरलेले आहेत. या तीन शिळांपैकी एक शिळा उत्तम काळीथर दगडाची आहे. त्यामुळे यावरील लेख ५०० वर्षानंतरही सहज वाचता येतात.

याचप्रमाणे वालावल गावी गि-याच्या राईत असलेला वीरगळ हा गावडे नावाच्या मराठय़ाचा आहे. तसेच वालावल देवस्थानाच्या उत्तर दरवाजाच्या तटाच्या बाहेरही एक वीरगळ आहे. पाट-परूळे, म्हापण, वालावल, होडावडे, कोचरे, कुडाळ, हिंदळे, रेडी, आरोंदे, तेंडोली, नेरूर या सर्वच गावांना प्राचीन इतिहास आहे. हा सर्व प्रदेश त्या दृष्टीनं अभ्यासला गेला पाहिजे. सिंधुदुर्गात सर्वात प्राचीन शिलालेख सोमेश्वर मंदिर वेतोरे (ता. वेंगुर्ला) येथे आहे. तो पूजेचा पाषाण म्हणून पूजला जातो. सुमारे इ. स. ११५५मधील तो असून जवळपास नष्ट होण्याचा मार्गावर आहे. ज्येष्ठ संशोधक डॉ. के. श. गो. तुळपुले यांनी १९६३मध्ये सर्वप्रथम उजेडात आणला. या संशोधित शिलालेखाच्या ८ ओळींतील तीन ओळींचं वाचन शक्य झालं आहे. त्यांचा सारांश असा, सोमेश्वर देवाची स्थापना नारायण देवाच्या सोमदेव नामक आश्रिताने शके १०७७ चैत्र शुद्ध युवा नाम संवत्सरात केली. इंग्रजी कालगणनेनुसार ही तारीख सहा मार्च ११५५ अशी येते. लेख १ फूट आठ इंच आणि एक फूट रुंद ओबडधोबड शिलेवर कोरला आहे. शिळेच्या वरच्या भागात चंद्र, सूर्य, खड्ग, शिवलिंग, दोन शिपाई व उभा असलेला नंदी या आकृती आहेत. मंदिराच्या परिसरात एक चौकोनी ताशीव दीड फू ट लांब व सहा इंच रुंद आहे. हा शिकारीचा स्तंभ असावा. त्याच्या वरच्या भागात सूर्य व चंद्र प्रतिमा असून स्तंभाच्या मध्यभागी वराहदृश्य, पाण्याचं चित्र कोरलं आहे. तो इथे का, हे एक कोडं आहे. गाभा-याच्या मागील बाजूसही वीरगळ आहेत. संगमेश्वरमधील श्रीकर्णेश्वर मंदिराच्या परिसरातही वीरगळ दिसतात. तसंच दक्षिण द्वाराजवळील एका खांबावर एक ब्रह्मलिपित शिलालेख खोदला आहे.

फार मोठी व्याप्ती असलेला वीरगळांचा हा इतिहास आहे. कोकण परिसरातील असे हजारो वीरगळ अजूनही शोधाच्या प्रतीक्षेत आहेत. देवता, प्रतीकं , वीरगळातून इतिहासाचे निखळलेले दुवे आपण सर्वानी जोडायचे आहेत; आणि हे जोडले जातील त्या वेळी शेकडो-हजारो वर्षापूर्वीची लोकगंगा, तिचा प्रवाह आपण अनुभवू शकू.

1 COMMENT

  1. नमस्कार प्रकाशजी आपला वीरगळ वरील अभ्यासपूर्ण लेख खूपचं अप्रतिम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version