सगुणेचा संप

1

सगुणेचे येणे आणि काका कुलकर्ण्याचे तिला घेऊन जाणे हा हास्यास्पद प्रकार आमच्याबरोबर वाडीही बघत होती आणि एके दिवशी आई सगुणेला म्हणाली, ‘सगण्या गो रोज मायेराक येण्यात मजा नसता. मायेराक वर्षातसून एकदाच येवचा असता जय गेलस ता घर आपलासा कर म्हणजे तुका मायेराची आठवण येवची नाय.’ त्यानंतर मात्र तात्या कुलकर्णी तिला घेऊन गेल्यानंतर कुलकर्ण्यांच्या घरात सगुणा रमली.
‘सगुणा’ आमच्या घरी आली आणि सगळेच शकुन शुभ घडायला लागले दारातल्या शेवग्याला कधी नाही त्या भरभरून अगदी शेवयासारख्या शेंगा आल्या, परडय़ातील पायरीचे कलम ब-याच कालावधीनंतर मोहरून आले. आमच्या खाजणातल्या ठिकाणातील खंडाचे भातही सर्व भागेल्यांनी जेवढे ठरले होते तेवढे घातले आणि पारवाडीच्या प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीमध्ये बावीस विद्यार्थ्यांत मी प्रथम क्रमांकाने पास झालो. या सर्व बाबी ‘सगुणेच्या’ घरी येण्यामुळेच घडल्या असा पक्का समज घरातील मोठय़ांपासून आम्हा छोटय़ांपर्यंत सर्वानीच करून घेतला आणि तेव्हापासून सगुणा आमच्या घरची झाली आणि आमचं अख्ख घर सगुणेचं झालं.

सगुणा दुसरी-तिसरी कोणी नसून आमच्या घरात पहिली वहिलीच येणारी म्हैस होती. घरात यासाठी की, सगुणेच्या आगमनापूर्वी आमच्या घराशेजारी गोठाही नव्हता. सगुणेच्या येण्यानेच माझ्या आईने माझ्या वडिंलाकडून हट्टाने तो बांधून घेतला होता. म्हणूनच सगुणा सर्वप्रथम आली ती गोठय़ात नाही तर थेट आमच्या घरातच. माझ्या आईनेच ओवाळून तिचं नाव ‘सगुणा’ ठेवलं आणि तिनेही ते अखेपर्यंत सार्थ केलं.

वडील गोव्यासारख्या परप्रांतात नोकरीला. पोर्तुगीज सरकारचं राज्य असल्यामुळे वेळीच मनीऑर्डर गावात येणे कठीण म्हणून आईनेच शक्कल लढवून अनेक शक्कलांपैकी सगुणेचा पर्याय निवडला. आपल्या हाती चांगल्या जातीची म्हैस असेल तर तिला माडातील चारीने धष्टपुष्ट करून दुधाच्या उकडय़ाने चार पैसे मिळवता येतील ही तिची शक्कल. आमच्या पारवाडीतील ब्राह्मण लोकांच्या गोठय़ात एक तरी गाय किंवा म्हैस ही असायचीच. आठ आणे रुपया शेर दुधाचे उकडे बाजारात पुरवून या जोडधंद्याला ती लोकं बळकटी आणायची. माझ्या आईने माझ्या मोठय़ा मावशीचे यजमान देवबागचे आप्पा आजगावकर यांना सांगून चांगल्या जातीची म्हैस आणून घेतली. तीच ही सगुणा.

ती आली, ‘तिने पाहिले आणि आम्ही जिंकलो’ असे अभिमानाने म्हणावे असे सगुणेचे देखणेपण होते. तिची शिंगे तलवारीसारखी लांब होती. पण तिच्या भव्य कपाळाला ती शोभायची. काळी कुळकुळीत लांब गोंडेदार शेपटीची आणि काजळभरल्या डोळय़ांची आमची सगुणा म्हणजे म्हैस असूनही देखणेपण किती असू शकतं याचे मूर्तिमंत उदाहरण होती. ‘सगण्या गो ऽऽ’ असं म्हटल्यावर लांबून धावत यायची. ती येतानाच गाभण असल्याने आई तिची विशेष काळजी घ्यायची. आम्हा सर्व भावंडांना आणि वाडीतील सर्व मुलांनाही सगुणाच्या निमित्ताने एक हालतं, बोलतं, चालतं खेळणं मिळालं होतं. सगुणाच्या पोटाखालून इकडून तिकडे जाणे, तिचा शेपटीचा गोंडा गालाला लावणे आदी एक ना अनेक प्रकार आम्ही करत असू. तिच्या पाठीवर बसून सैरही करू. आम्हा सर्व लहान मुलांचे बालविश्व सगुणेभोवतीच एकवटलेले होते. सगुणा गाभण असल्यामुळे माझी आई देखील बाळतंपणाला आलेल्या माहेरवाशिणीसारखी तिची काळजी घ्यायची आणि एके दिवशी सगुणा व्याली. आम्हा सर्वानाच आनंद झाला. भरपूर दूध, भरपूर खरवस, भरपेट ताक आणि भरपेट दही ही श्रीमंती आम्ही सगुणेच्या जीवावरच अनुभवली आणि सगुणेचा हाच चांगुलपणा तिच्या जीवावर आला. सगुणा भरपूर खायची, तशी भरपूर दूध द्यायची. सगुणा कोणत्या जातीची म्हैस होती आम्हाला माहीत नव्हते. पण तिची जात नेक आणि इमानी होती. हे आम्ही बालवयातील असूनही आम्हाला समजत होते आणि हा नेकपणा तिच्या अंगाशी आला आणि आमच्याही. सगुणा सकाळी चक्क चार शेर दूध द्यायची आणि सायंकाळी चक्क चार शेर. पहिले पंधरा दिवस खरवस खाण्यात, कांजळी खाण्यात, दूध-दही-ताक वाटण्यात गेले. बाजारात दुधाचे ठरलेले उकडे असल्यामुळे आईलाही नवीन व्यवसायात नवीन उकडे मिळणे कठीण म्हणून सगुणेचा व्यापार हळूहळू अव्यापारेशू व्यापार होऊ लागला. दूध खपले नाही तर सगुणालासुद्धा पोटभर पेंड आणि खाद्य घालणं माझ्या आईलाही त्याकाळी कठीण होते. चारा मुबलक आणि तिच्या श्रमाचा होता. पण पेंड विकत आणण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणूनच दोन-तीन महिने आतबट्टय़ाचा व्यवहार सोसून माझे वडील मे महिन्यात गोव्यावरून घरी आल्यावर त्यांनी सगुणेचे दही-दूध-तूप यथेच्छ चाखल्यावर दोघांनीही सगुणेला विकण्याचा कटू निर्णय घेतला म्हणण्यापेक्षा तो त्यांना नाईलाजास्तव घ्यावा लागला. त्या त्यांच्या निर्णयाने आम्हीही हिरमुसलो. सगुणेच्या कानात जाऊन ‘तू अजिबात जाऊ नकोस’ असं सांगण्यापलीकडे आमच्याजवळ कोणताही उपाय नव्हता.

एव्हाना सगुणेच्या दुधाची कीर्ती आणि तिला विकताहेत ही वार्ता गावागावात जाऊन पोहोचली. संध्याकाळी आमच्या गावचे तात्या कुलकर्णी ते चक्क नवीन दावे घेऊनच सगुणेला न्यायलाच आले. तात्या कुलकर्णीच्या घराचा आणि आमच्या घराचा गेल्या पाच पिढय़ांचा दृढ संबंध. त्यामुळे पैशाच्या किमतीत घासाघीस करण्याचा संबंध नव्हता. माझे वडील म्हणाले, ‘तात्या या म्हैशीमुळे आमच्या पिढय़ांन् पिढय़ांचे संबंध तुटू नयेत अशी माझी इच्छा. आपलीही तशीच असेल म्हणून चक्क चार शेर दूध काढूनच बघा.’ तात्या नको नको म्हणत असताना आईने त्यांना दुधाचे छोटे घंघाळ आणून दिले. तात्या गोठय़ात गेले दूध काढण्यापूर्वीचे सर्व संस्कार झाले पण सगुणा पान्हा सोडील तर शपथ. माझ्या आईने प्रयत्न करून पाहिला. पण तोही निर्थक ठरला. माझ्या वडिलांचे डोळे तर रागाने लाल झाले होते. पैशापेक्षा त्यांच्या शब्दाला बाट आला होता. तात्या कुलकर्णीनी एक तास थांबून पुन्हा प्रयत्न केला पण तो देखील निष्फळ ठरला. रात्र वाढू लागल्यामुळे तात्या कंटाळून घरी गेले. पाच ते सात मिनिटे झाली नसतील आणि सगुणा जोराने रेकली. आई नेहमीच्या पद्धतीने दूध काढायला बसली आणि सगुणाने आपल्या चार शेराचा रतीब दुधाच्या छोटय़ा रांजणीत पुरा केला. आम्हा सर्वानाच त्या गोष्टीचे अप्रुप वाटले. पण आमचं घर सोडून न जाण्यासाठी, आम्हा मुलांना अंतर न देण्यासाठी सगुणाचा हा आगळा संप आणि एक आगळे आंदोलन चालू होतं हे आमच्या फार उशिरा लक्षात आले. तात्या कुलकण्र्याचे येणे आणि हात हलवत जाणे हे पुढे दोन-तीन दिवस चालूच होते. त्याचप्रमाणे कुटुंबाची आणि खानदानाची इज्जत सगुणामुळे गेली म्हणून आमच्या आप्पांचे आईवर चिडचिडणेही चालू होते. पण त्या माऊलीचाही त्याला नाईलाज होता.

आणि एके दिवशी सकाळीच तात्या कुलकर्णी पुन्हा सत्त्वपरीक्षा पाहायला आले असताना आईने सगुणेच्या पाठीवर हात फिरवून सगुणेला सांगितलं. ‘सगण्या गो, माका तुका इकूचा नाय हा तुका पोटाकव भरपूर व्हया. दूधव भरपूर देतस. दूध खपत नाय म्हणान तुका इकूचा लागता. कुलकण्र्याचा दुकान मोठा आसा. भरपूर खा आणि तेंका भरपूर दूध दी. थय तुझ्या पोटाचेव हाल होवचे नाय. पण माजो दुशेबाजून मार करू नको. तुका जेवा वाटात तेवा पोरग्यांका बघूक मायेराक ये.’ आई सगुणेच्या पाठीवर हात फिरवून सांगत होती आणि आईबरोबर सगुणेचे डोळेही ओले झाले होते. त्यानंतर ओसरीवर बसलेल्या तात्या कुलकण्र्याना आईने दूध काढण्याची विनंती केली. तात्या दूध काढायला बसले आणि काय आश्चर्य सगुणेने चक्क चार शेर दूध तात्यांच्या रांजणात पूर्ण केले आणि जाता जाता एक छोटा निषेध म्हणून मागील लाथ तात्यांना हाणली. तरीपण दुधावर खूश होऊन व्यवहार पूर्ण करून तात्या सगुणेला आणि तिच्या बाळाला आपल्या घरी घेऊन गेले. सगुणेची आकृती आमच्या डोळय़ांतून लहान होत गेली. आमचे सगळय़ांचे डोळे भरून आले. रात्रभर आम्हा मुलांच्या डोळय़ाला डोळा लागला नाही. नेहमीसारखी आई सकाळी चारला उठली.

आज तिचा गोठा रिकामा झालेला होता. पण गोठय़ात कसला तरी आवाज आला म्हणून बघते तर चक्क सगुणा! काका कुलकर्ण्याचे दावे तोडून दोन मैलावरून आमच्या गोठय़ात आली होती. मुक्या प्राण्यांचे प्रेम काय असते याचा हा जिवंत अनुभव सगुणेच्या रूपाने आम्ही घेत होतो. पुढे सगुणेचा आठ दिवस हा प्रकार चालूच होता. सगुणेचे येणे आणि काका कुलकर्ण्याचे तिला घेऊन जाणे हा हास्यास्पद प्रकार आमच्याबरोबर वाडीही बघत होती आणि एके दिवशी आई सगुणेला म्हणाली, ‘सगण्या गो रोज मायेराक येण्यात मजा नसता. मायेराक वर्षातसून एकदाच येवचा असता जय गेलस ता घर आपलासा कर म्हणजे तुका मायेराची आठवण येवची नाय.’ त्यानंतर मात्र तात्या कुलकर्णी तिला घेऊन गेल्यानंतर कुलकर्ण्याच्या घरात सगुणा रमली. वर्षातून एक- दोनदाच आमच्या घरी यायची, आईच्या हातची पेंड आणि चारा खाऊन जायची. कुलकर्ण्याच्याही घरी तिचा वेलविस्तार प्रचंड वाढला. सगुणाही त्यांच्या कुटुंबात रमली. मात्र तिचे प्रेम आणि आगळे आंदोलन माझ्या मात्र चिर:स्मरणात राहिले. निग्रो लोकांचे लीडर मार्टिन ल्यूथर किंग यांचे एक स्फूर्तिगीत आहे. त्या स्फूर्तिगीताचे हिंदी भाषांतर बालशरण माथूर यांनी केले आहे. ‘होंगे कामयाब एक दिन’ हे गाणे ज्या ज्या वेळी आकाशवाणीवर लागते त्या त्या वेळी मला आमची सगुणा आठवते आणि तिचे आगळे आंदोलन..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version