Home टॉप स्टोरी सत्ताधारी कोण?

सत्ताधारी कोण?

1

शेतक-यांना कर्जमाफी मिळावी यासाठी दोन दिवस विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झालेले असतानाच आज वेगळेच चित्र सभागृहात पहायला मिळाले.

मुंबई- शेतक-यांना कर्जमाफी मिळावी यासाठी दोन दिवस विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झालेले असतानाच आज वेगळेच चित्र सभागृहात पहायला मिळाले. शेतक-यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे यासाठी शिवसेनेचे आमदार जोरदार घोषणा देत वेलमध्ये उतरले. त्यानंतर भाजपाचे सदस्यही घोषणा देऊ लागले. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाच शेतक-यांना कर्जमाफी द्यावी यासाठी घोषणाबाजी करावी लागत असेल तर नेमके राज्यात सरकार कुणाचे, असा प्रश्न विधान भवनात विचारला जात होता.

राज्यातील शेतक-यांना कर्जमाफी द्यावी यासाठी काँग्रेस – राष्ट्रवादीचे सदस्य कालपासून आक्रमक झाले आहेत. आज विधान सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी पुन्हा पाय-यांवर बसून शेतक-यांना कर्जमाफी द्यावी यासाठी आंदोलन केले. सभागृहात मात्र वेगळेच वातावरण पहायला मिळाले. सभागृहाचे कामकाज सुरू होताच कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेचे सदस्य एकदम आक्रमक झाले. वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. शिवसेनेचे सदस्य वेलमध्ये उतरल्याचे पाहिल्यानंतर भाजपाचे सदस्यही वेलमध्ये उतरले आणि शेतक-यांना कर्जमाफी झाली पाहिजे, अशा घोषणा देऊ लागले. सभागृहाचे कामकाज करणे अशक्य झाल्याने विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले.

त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पाय-यावर बसून आंदोलन केले. शेतक-यांना कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा शिवसेना सदस्यांनी द्यायला सुरुवात केले. त्यांच्या मागोमाग भाजपाचे आमदारही आले आणि त्यांनीही शेतक-यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा सुरू केल्या. ख-या शेतक-यांना कर्जमाफी द्या, शेतक-यांच्या नावाखाली बँकांना कर्जमाफी देऊ नये, अशा घोषणा भाजपाचे सदस्य देत होते. शिवसेनेचे सदस्यांनी मात्र विरोधकांच्याच सुरात सूर मिळवलेला होता. शेतक-यांना मालाला भाव नाही, सरकारला त्यांची जाण नाही. भाजपाचा विजयाचा वारू उधळलेला आहे. शेतक-यांना कर्जमाफी देईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशा घोषणा शिवसेनेच्या वतीने देण्यात येत होत्या. सत्ताधारी पक्षातीलच ही घोषणाबाजी पाहिल्यानंतर राज्यात नेमके सरकार आहे तरी कुणाचे असा प्रश्न विधान भवनात राज्याच्या कानाकोप-यातून आलेल्या लोकांना पडला होता.

1 COMMENT

  1. सरसकट कर्ज माफी देऊ नये , नाही तर बागाईतदारांचे फावेल.
    जे अल्प-भूधारक आहे व ज्यांची शेतजमीन ५ एकर पेक्षा कमी आहे , त्यानाच कर्ज माफी दयावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version