Home टॉप स्टोरी अष्टपैलू कलावंत पडद्याआड

अष्टपैलू कलावंत पडद्याआड

1

मराठी-हिंदी नाट्यचित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले.

मुंबई- मराठी-हिंदी नाट्यचित्रपट सृष्टीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणारे बहुआयामी अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते.

उत्तम वाचक, गुणग्राहक संवादक, सामाजिक कार्यकर्त्यांचे आधार असणा-या अमरापूरकर यांच्या निधनाने केवळ नाट्य-सिनेसृष्टीच नव्हे तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर येथे अमरापूरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फुप्फुसाच्या संसर्गाने त्रस्त अमरापूरकर यांच्यावर कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात गेले काही दिवस उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. मात्र डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि त्यांची झुंज अपयशी ठरून अखेर रविवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

अमरापूरकर यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर अनेक भूमिका गाजवल्या. मराठी नाट्यसृष्टीतून मोठ्या पडद्यावर गेलेले अमरापूरकर यांची ‘सडक’ या हिंदी चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका विशेष गाजली. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. ‘अर्धसत्य’ सिनेमातील रामा शेट्टी या गुंडाची त्यांची भूमिकाही विशेष गाजली होती. ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातली त्यांची भूमिकाही विशेष गाजली होती. अमरापूरकर यांनी खलनायकी भूमिकांबरोबरच अनेक हास्यप्रधान भूमिकाही साकारल्या. आवाज, मुद्राभिनय, देहबोली या सगळ्याचा उत्तम उपयोग करणा-या या अभिनेत्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले होते.

अमरापूरकर यांचा जन्म अहमदनगर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच कलेची व मित्र बनवण्याची त्यांना आवड होती.
‘तात्या’ या टोपणनावाने लोक त्यांना ओळखत. शालेय स्तरावरच त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. ‘इतिहास’ विषयातून एम. ए. ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याचवेळी त्यांनी ‘२२ जून १८९७’ या चित्रपटात लोकमान्य टिळकांची केलेली भूमिका विशेष गाजली. या त्यांच्या या भूमिकेने चित्रपट क्षेत्राचे त्यांच्याकडे लक्ष गेले. याच काळात त्यांचे ‘हॅँडस् अप’ हे नाटक आले. अविनाश मसुरेकर व भक्ती बर्वे इनामदार यांच्या बरोबरची त्याची भूमिका अगदी सुपरहिट झाली. हीच भूमिका पाहून दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी त्यांना ‘अर्धसत्य’ चित्रपटात भूमिका दिली. हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. रामा शेट्टी या गुंडाची भूमिका त्यांनी केली होती. या त्यांच्या भूमिकेला फिल्मफेअरचा सवरेत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही त्यांनी पटकावला. त्यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळ जवळ ३०० हून अधिक हिंदी, मराठी, बंगाली, ओरिया व हरियाणवी भाषेतही त्यांनी भूमिका केल्या. ‘अर्धसत्य’नंतर त्यांच्या पुराना मंदिर, नासुर, वीरुदादा, जवानी, फरिश्ते अशा चित्रपटातल्या लहान सहान भूमिकाही गाजल्या. ‘हुकुमत’ या चित्रपटातून त्यांनी पहिल्यांदा खलनायक रंगवला. हा चित्रपट जबरदस्त हिट झाला. ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटातला त्यांचा खलनायकही विशेष गाजला होता. खलनायकाच्या भूमिकेत अडकू नये याचा विचार करून त्यांनी इश्क, कुली नं १, आंटी नं १ या सारख्या काही चित्रपटांतून विनोदी भूमिकाही केल्या. २००० पासून त्यांनी हिंदी चित्रपटात काम करणे कमी केले. केवळ ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटात ते दिसले होते. त्यांच्या जाण्याने एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना चित्रपट व नाटयसृष्टीतून व्यक्त होत आहे. पाच भाषांसह तीनशेहून अधिक चित्रपटांत अमरापूरकर यांनी काम केले होते. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

सामाजिक कार्यातही आघाडीवर

अमरापूरकर हे केवळ कलावंत नव्हते. अनेक सामाजिक संस्थांशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. स्पष्टवक्तेपणा व जबरदस्त वाचन याच्या जोरावर त्यांनी समाजातल्या विविध गोष्टींवर प्रसंगी प्रहारही केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, स्नेहालय, लोकशाही प्रबोधन व्यासपीठ, अहमदनगर ऐतिहासिक वस्तूसंग्रहालय, सामाजिक कृतज्ञता निधी आदि अनेक सामाजिक संस्थांशी ते संबंधित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version