Home महाराष्ट्र कोकण मेवा सर्वधर्मसमभाव राखणारे साकेडी

सर्वधर्मसमभाव राखणारे साकेडी

2

सहा खेड्यांचे मिळून बनलेले एक गाव म्हणजे साकेडी. हे गाव कृषीसंपन्न, विकासाभिमुख, नव्या बदलांचा स्वीकार करणारे आणि पुरोगामी विचारांचे आहे. साकेडी गावात सर्व जातीधर्माचे लोक राहतात. म्हणून समानतेचा संदेश देणारे, धर्मनिरपेक्षता जपणारे अशी या गावाची ख्याती आहे. गावाची विकासकामातील आघाडी ही येथील सुजाण नागरिकांच्या कार्यकर्तृत्वाची जाणीव करून देते.
कणकवली- साकेडी गावातून रेल्वे धावत असली, तरी या ठिकाणी रेल्वे स्थानक नाही. मात्र, शहरापासून जवळचे व मुंबई-गोवा महामार्गाच्या लगतचे गाव म्हणून या गावाचे महत्त्व वाढत गेले. आजच्या घडीला कृषी विकास, रस्ते विकास, शैक्षणिक सुविधा आणि धार्मिकता जोपासणारे हे गाव  विकासाच्या नव्या वाटा चोखाळताना दिसत आहे. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध या प्रमुख धर्माच्या समाजाचे या ठिकाणी वास्तव्य आहे. गुण्यागोविंदाने, धर्मनिरपेक्षतेने एक-दुस-याच्या सण-उत्सवात या ठिकाणची मंडळी सहभागी होतात. आनंदाबरोबरच सुखदु:खात एकत्र येतात. विकासाबरोबरच नव्या धोरणांचाही स्वीकार करण्यासाठी या गावातील सर्वधर्मीय एकवटतात. म्हणूनच या गावात ऊसशेती, कलिंगडे आणि बागायती शेतीवर येथील ग्रामस्थांनी भर दिला आणि विकासाच्या नव्या वाटा स्वीकारल्या.

विकासात्मक वाटचालीकडे डोळसपणे पाहणा-या या गावाने वाडीवस्त्यांवरील रस्ते, गटारे, नाले नव्याने बांधले. शौचालयांचे महत्त्व जाणून शौचालये १०० टक्के पूर्ण केली. दोन वाडय़ावस्त्यांना जोडण्यासाठी तांबळवाडीप्रमाणेच अनेक ठिकाणी साकव बांधले. शिक्षणासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे म्हणून प्रत्येक शाळेत संगणक दिले. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून साकेडी आणि करंजे गावाला जोडणारा पूल उभा केला त्यामुळे ही दोन्ही गावे एकमेकांचे सख्खे शेजारी झाले. मशीद, दर्गा, चर्च, बुद्धविहार अशा प्रत्येक धर्माच्या देवतांची प्रतिष्ठापना असलेल्या या गावात ग्रामदैवत लिंगेश्वर पावणादेवीचे कृपाछत्र आहे. म्हणूनच एका विचाराने काम करणा-या या गावाला तंटामुक्त पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, यशवंत ग्राम पुरस्कार, पर्यावरण संतुलन पुरस्कार, ग्रामस्वच्छता अभियानातील विविध नामांकने मिळाली.

गावामध्ये प्राचीन मंदिर असून दरवर्षी या मंदिरात अनेक उत्सव साजरे केले जातात. लिंगेश्वर, पावणाई, गांगेश्वर, महालक्ष्मी ही देवतांची मंदिरे गावाच्या मध्यभागी वनराईमध्ये वसली आहेत. महालक्ष्मी मंदिर हे नदीकिनारी असून मंदिरातील पाषाण स्वयंभू आहे. त्यामुळे प्राचीन मंदिरांमध्ये या मंदिराची गणना केली जाते. मंदिराजवळ शिवकालीन बांधकामाची विहिरीदेखील आहे. पावणाई देवीच्या मंदिरात वार्षिक जत्रोत्सव होतो. त्यानिमित्त गावातील सर्व जातीधर्माचे भाविक जत्रेच्या निमित्ताने एकत्र येतात तसेच गावाच्या उत्तर सीमेवर वाळकेश्वर चाळा बसलेला आहे. सर्व गावाचे रक्षण तोच करतो, अशी श्रद्धा आजही ग्रामस्थांच्या मनात रुजलेली दिसून येते.

यासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, एकदा गावात चोर आले, मात्र आपसूकच त्यांचे पाऊल तिथेच खिळून राहिले आणि ते तेथेच झोपी गेले. त्यामुळे गावावरचे संकट टळले. चोरांना सकाळी जाग येताच त्यांनी रागाने तेथील पाषाणे फोडली. आजही तेथील पाषाण पाहिल्यास आपल्याला निश्चितच याची खात्री पटते. गावात सात वाडय़ा आहेत. येथे राहणा-या सर्वधर्मीय ग्रामस्थांमध्ये एकीची भावना दिसून येते.

गावात विद्यार्थ्यांसाठी येथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे तसेच दोन मुख्य अंगणवाडय़ा असून एक मिनी अंगणवाडी आहे. बालशिक्षणाची गावात चांगली सोय आहे. ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, आरोग्य केंद्र आदी सर्व सुविधांच्या उपलब्धतेमुळे साकेडी गाव एक परिपूर्ण गाव बनले आहे.

2 COMMENTS

    • साकेडी ला कणकवली वरुन डायरेक्ट एसटी सेवा उपलब्ध आहे. या शिवाय तुम्ही सहा आसनी गाडीने हुमरठ तिठा किंवा साकेडी फाटा येथे उतरु शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version