Home मध्यंतर सुखदा सर्वोत्तम अन्नाची किमया..

सर्वोत्तम अन्नाची किमया..

1

बाळ सुदृढ आणि आनंदी होण्यासाठी, त्याच्याबरोबर आयुष्यभराचं नातं जोपासण्यासाठी ‘स्तनपान’ आवश्यक आहे. आईच्या दुधातूनच बाळासाठी प्रेम आणि आनंद या दोन्ही गोष्टी मिळतात. एका अर्थाने आईचं दूध हे बाळासाठी अमृतच आहे. बाळ जन्मल्यानंतर स्तनपान करण्यापूर्वी मध, गूळ, ग्राइप वॉटर, ग्लुकोज, साखर-पाणी चाटवण्याची पद्धत होती. या गोष्टींमुळे कुपोषणाच्या संख्येत वाढ होऊ लागली. जंतुसंसर्गाने बाळ दगावायचंही. याउलट जन्मल्यानंतर लगेचच आणि सहा महिने फक्त स्तनपान केलेल्या बाळाच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागली. या किमयेमुळेच स्तनापानाला सर्वोत्तम अन्न समजलं जातंय.

‘ताई बाळाला आईचं दूध किती महिन्यांपर्यंत द्यावं’, ‘बाळ आईचं दूध पित नसेल तर काय करावं’, ‘जुळी मुलं झाली तर वरचं दूध पाजावं का’, ‘आईला जास्त दूध येत नसल्यास बाळाला पावडरीचं दूध पाजावं का’, ‘अपु-या दिवसांच्या, कमी वजनाच्या बाळाला कसं पाजावं’, ‘बाळाला दिवसातून किती वेळा पाजावं’, ‘आई आजारी पडल्यास तिने बाळाला पाजणं योग्य आहे का’, ‘बाळाला वरचा खाऊ देताना काय काय देऊ’..स्तनपान, बाळ आणि आईच्या आरोग्याशी निगडित हे सारे प्रश्न.. खरं तर स्तनपानाविषयीच्या प्रश्नांची यादी तशी बरीच मोठी आहे. मुळात हे प्रश्न उद्भवतात ते समज-गैरसमजातून.. स्तनपानाविषयीच्या यांसारख्या समज-गैरसमजांचं निराकरण गेली अकरा र्वष सातत्याने करत असताना आलेला अनुभव कथन करत होत्या, रेश्मा सिद्धये. त्या ‘ब्रेस्टफिडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया, महाराष्ट्र’ अर्थात ‘बीपीएनआय’ (BPNI) या स्वयंसेवी संस्थेसाठी ‘स्तनपान समुपदेशक’ आणि ‘मदर सपोर्ट ग्रुप लीडर’ म्हणून काम करतात. त्या सांगतात, ‘‘फारच थोडया आई आम्ही मार्गदर्शन केल्याप्रमाणे वागतात. अन्यथा पदरी पडते निराशा! मग पुन्हा त्यांना ‘आई आणि तिच्या बाळासाठी स्तनपान किती महत्त्वाचं आहे,’ हे अगदी पहिल्यापासून पटवून द्यावं लागतं.’’

‘बीपीएनआय’साठी काम करताना विविध मानसिकतेच्या तसंच सामाजिक आणि आर्थिक स्तर असणा-या कुटुंबांशी संवाद साधताना त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल त्या सांगतात, ‘‘प्रसूतीनंतर दोन-तीन दिवसांनी आईला दूध येतं, हा आपल्याकडचा सर्वात मोठा गैरसमज आहे. बाळाच्या जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आतच त्याला आईने पाजण्यास सुरुवात करावी. नवजात अर्भकाला तर आईच्या स्तनातून येणारं चीकदूध पाजलंच पाहिजे. चीकदुधामुळे बाळाचं पोषण होतं. विविध आजारांपासून त्याचं संरक्षण होतं. आईचं ऑपरेशन झालं असेल तर तिने तीन-चार तासांच्या आत परिचारिकेच्या मदतीने बाळाला अंगावरचं दूध पाजावं. अनेकदा नवजात अर्भकाला पाणी, मधाचं पाणी, ग्लुकोज, साखरेचं पणी पाजण्याचा पराक्रम केला जातो. प्रत्यक्षात नवजात बालकाच्या शरीरात पाण्याचा आणि उष्मांकाचा भरपूर साठा असतो, त्यामुळे बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्त वरच्या पाण्याची गरज नसते. वरचं द्रव पदार्थ पाजल्यास बाळ आईचं दूध नीट ओढेनासं होतं. (फक्त स्तनाग्र तोंडात घेऊन दूध ओढतं). त्यामुळे बाळालाही पुरेसं दूध मिळत नाही. तर आईलाही दूध कमी प्रमाणात येऊ लागतं. वरचं काही देताना ते पदार्थ अस्वच्छ असले, पाणी किंवा भांडी अस्वच्छ असली, पाजणा-याचे हात अस्वच्छ असले ती त्यातून बाळाला जंतुसंसर्ग होतो आणि ते आजारी पडतं. जन्मजात व्यंगामुळे किंवा बाळाची प्रकृती बरी नसल्यास बाळ स्तन चोखू शकत नसल्यास आईच्या स्तनातील दूध वाटीत जमा करावं. ते वाटी-चमच्याने बाळाला पाजावं. याही क्रियेत बाटलीचा वापर कटाक्षाने टाळावा. अपु-या दिवसांच्या बाळासाठीही आईच्या स्तनात ‘स्पेशल दूध’ तयार होतं. बाळ आधी स्तन ओढू शकण्याच्या अवस्थेत आहे का, ते पाहावं. नसल्यास त्यालाही दूध काढून वाटी-चमच्याने पाजावं. जुळी मुलं झाली तरीही त्यांना वरचं दूध पाजू नये. जुळयांसाठीही आईच्या स्तनात दुप्पट दूध निर्माण होतं. दोन्ही बाळांना एकाच वेळेस पाजल्यास आईच्या शरीरात दुप्पट ‘प्रॉलॅक्टीन’ नावाचं संप्ररेक स्र्वतं. त्यामुळे दुप्पट दूध निर्माण होतं. दोन्ही बाळांना दोन्ही बाजूच्या कुशीत धरून किंवा मांडीवर जवळजवळ धरून दूध पाजावं. ज्या बाळाला उजव्या बाजूला घेतले असेल त्याला पुढच्या स्तनपानात डाव्या बाजूला घ्यावं. अशा तऱ्हेने दर स्तनपानाच्या वेळेला बाजू बदलावी.’’

आई होऊ इच्छिणा-या प्रत्येक स्त्रीला आणि त्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येकाला ‘स्तनपान’ (ब्रेस्ट फिडिंग) या संकल्पनेचं महत्त्व कळावं, यासाठी वर्ध्यात तीन डिसेंबर १९९१ रोजी ‘बीपीएनआय’ या संस्थेची स्थापना झाली. ना नफा ना तोटा या तत्त्वावर चाललेली ही संस्था ‘स्तनपाना’चा पुरस्कार करत स्तनपानाविषयी माहिती, मदत आणि पाठिंबा या तत्त्वांवर काम करते. संस्था बालकांचे खाद्यपदार्थ, बालान्न, दुधाच्या बाटल्या यांच्या विरोधात असून संस्थेचं कार्य कटर IMS Act च्या अंतर्गत चालतं. कटर IMS Act म्हणजे ‘बालकांच्या दुधाला पर्यायी अन्न, दूध पाजण्याच्या बाटल्या आणि बालकांचे खाद्यपदार्थ (उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियमन) कायदा १९९२’. त्यामुळे सहा-सात महिन्यांच्या बाळाला स्तनपानाबरोबरीने घरगुती पूरक आहार कसा आणि कुठल्या प्रकारचा दिला पाहिजे, यावरही संस्थेचं विशेष काम आहे. संस्थेचे स्वयंसेवक विविध प्रसूतिगृहांमध्ये जाऊन स्तनपानाविषयी जागृती करतात. अंगणवाडी सेविका, दायींनाही संस्थेचे कार्यकर्ते स्तनपान, शिशुआरोग्य, मातेचं स्वास्थ्य या विषयावर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, नाशिक, वाशिम, पुणे या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करतात.

‘बीपीएनआय’चे कार्यकर्ते जसं आईला स्तनपानाचं महत्त्व पटवून देतात, तसंच ते तिच्या कुटुंबातील प्रमुख सदस्यांनाही स्तनपानाविषयी सांगतात. त्याचा फायदा आईला होतो. अनेकदा छोटया घरांमध्ये आईला स्तनपान करताना एकांत मिळत नाही. आईला स्तनपानासाठी एकांत मिळणं, तिच्या सभोवतालचं वातावरण प्रसन्न असणं, नव-याने बायकोवर संभोगाची, मैथुनाची बळजबरी न करणं, दोन मुलांमध्ये व्यवस्थित अंतर असणं ही कुटुंबासाठी करण्यात येणा-या समुपदेशनाची महत्त्वाची कारणं असल्याचं रेश्मा सिद्धये नमूद करतात.

आईच्या दुधाबरोबरीने पूरक आहार..

सहाव्या महिन्यापासून बाळाला आईच्या दुधाबरोबरीने पूरक आहारही चालू केला पाहिजे. हा पूरक आहार घरगुतीच असला पाहिजे. आपण जो पदार्थ घरी तयार करतो, तोच पदार्थ बाळाला द्यावा. बाळासाठी वेगळा पदार्थ तयार करू नये. पदार्थ बारीक करताना मिक्सर-ग्राइंडरचा वापर करणं कटाक्षाने टाळावं. बोटांनी चुरून तो बोटांनीच भरवावा, चमच्याचा वापर करू नये. आपण जेवायला बसतो, तेव्हाच बाळाला भरवावं. सुरुवातीला त्याला पदार्थाच्या चवी चाखण्यासाठी द्यावं. त्याच्यावर खाण्याची जबरदस्ती करू नये. जेवणात पदार्थाचं वैविध्य असावं. त्याला गोड आवडत असेल तर गोड पदार्थ खाऊ घालावेत. गोड खाल्ल्याने पोटात जंत होतात, अशी अनेक आईंची समजूत आहे. पण जंत गोड खाल्ल्याने होत नसून अस्वच्छतेने होतात. डबाबंद बालान्नापेक्षा (बेबी फुड्स) हे पदार्थ बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. डबाबंद बालान्नाच्या शुद्धतेची आणि त्यातील पोषकमूल्यांची वेळोवेळी खात्री देता येत नाही. बालान्नाच्या डब्यावरील गुटगुटीत बाळाचा फोटो बघून आपलंही बाळ या डब्यातील पावडरने असंच गुटगुटीत होईल, अशी आई-बाबांची समजूत असते. प्रत्यक्षात डबाबंद बालान्न खाणारी मुलं ही पोषणदोषाअभावी आजारी पडतात. त्यांना अतिसार होतो. अतिसाराने मृत पावणा-या मुलांच्या संख्येचं प्रमाण दरवर्षी लाखांच्या घरात जातं. त्यामुळे बाळाला आईच्या दुधाबरोबरीने घरी तयार केलेला पोषक आहार द्यावा. प्रत्येकालाच साजूक तूप वापरणं जमत नाही. अशा वेळी बाळाचा आहार तयार करताना त्यात भाजलेले तीळ, शेंगदाणे, सुकं खोब-याची पूड योग्य प्रमाणात घालण्याविषयीही मार्गदर्शन करतो. नाचणी, गूळ या पदार्थाचाही समावेश करायला लावतो. त्यामुळे बाळाच्या शरीराला लागणारी लोहाची गरज भागेल. बाळाला वरचा घरगुती आहार देताना त्याला करत असलेल्या स्तनपानात खंड पाडू नका.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO – wold health organasation) म्हणण्यानुसार बाळाला दोन र्वष अंगावरच पाजलं पाहिजे. आरोग्य संघटनेच्या या म्हणण्याचं स्पष्टीकरण करताना रेश्मा सांगतात, ‘‘स्तनपान म्हणजे बाळाचं रोजचं होणारं लसीकरणच! आईची सकारात्मक मनोधारणा, आनंदी वृत्ती, बाळाविषयी ममता आणि ओढ यांमुळे अंगावरचं दूध वाढतं. बाळाचं वजन दिवसाला २० ते ३० ग्रॅम वाढत असेल, बाळ शांत झोपत असेल, सहा ते सात वेळा ‘सू’ करत असेल, तर अंगावरचं दूध त्याला योग्य प्रमाणात मिळत आहे, असं समजावं. पहिले सहा महिने तरी बाळाला संपूर्ण अंगावरचं दूध द्यावं.’’

स्तनपानाची आकडेवारी काय सांगते..

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्तनपान करणा-या स्त्रियांच्या संख्येत वाढ झाली आहे, पण अंगावर पाजण्याच्या कालावधीत वाढ झालेली नाही. अंगावर पाजणं बंद करण्याकडे स्त्रियांचा कल आहे. ९६ टक्के स्त्रिया स्तनपानाला सुरुवात करतात. त्यातील ११ टक्के स्त्रिया मुलांना चार ते सहा महिने संपूर्ण स्तनपानावर ठेवतात. ४१ टक्के स्त्रिया वर्षभर पाजतात. तर फक्त १४ टक्के स्त्रिया बाळाला दोन वर्ष अंगावर पाजतात.

या आकडेवारीची मीमांसा करताना रेश्मा सांगतात की, ‘‘दोन वर्षापर्यंत मुलांना आईच्या दुधातून जीवनावश्यक द्रव्यं मिळतात. मुलांना होणारे संसर्गजन्य रोग टाळले जातात. बाहेरचं दूध लवकर लावल्यास मुलाकडून आईचं दूध कमी घेतलं जातं. त्यामुळे त्याच्या शरीरात लोह, जस्त आणि इतर पोषक द्रव्यांची कमतरता निर्माण होते. त्यामुळे सुरुवातीला मूल मागेल तेव्हा दूध द्यावं. घडयाळाचा काटा बघू नये, शेवटी आईच्याच दुधावर बाळाची वाढ अवलंबून आहे.’’ 

वरील सर्व मुद्दयांवरून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे, ‘बाळंतपणापूर्वीच्या तपासणीत आईला अंगावर पाजण्याच्या आवश्यकतेची, त्यापासून मुलाला आणि तिला स्वत:ला होणा-या फायद्यांची जाणीव करून दिली गेलीच पाहिजे.’ निसर्गाने दिलेला अंगावरच्या दुधाचा ठेवा हा व्यवस्थित वापरल्यास निरोगी, निकोप मनाच्या, सकारात्मक वृत्तीच्या बुद्धिमान पिढीची निर्मिती होईल, यात शंका नाही.

स्तनपानासाठी आईने बाळाला जवळ घेतलं की, आईच्या शरीरात ‘प्रोलॅक्टिन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ ही संप्रेरकं तयार होतात. प्रोलॅक्टिनमुळे दुग्धग्रंथींना चालना मिळून दूध तयार होऊ लागतं. त्यामुळे आईच्या स्त्रीबीज ग्रंथीतून बीज विमोचनाची प्रक्रिया थांबलेली असते. परिणामी आई गरोदर राहत नाही. तर ऑक्सिटोसिन संप्रेरकांमुळे गर्भाशय लवकर आंकुचित होऊन तो पूर्वस्थितीला येतो. त्यामुळे रक्तस्रव टळतो. कामजागृती देणा-या भावना स्त्रीची स्तनाग्रं आणि स्तनमंडलं यांच्यावर असतात. बाळ दूध पिताना स्त्रीची कामभावना जागृत होऊन ती अवघडल्यासारखी होते. त्यावेळी त्या बाळाला पाजणं सोडतात. अशा वेळी आम्ही त्यांना ही भावना स्वाभाविक असल्याचं सांगतो. तसंच स्तनपानात खंड न पाडण्याचाही सल्ला देतो. शेवटी आईच्या दुधावरच बाळाचं जीवन अवलंबून आहे.  – डॉ. विठ्ठल प्रभू ज्येष्ठ कामविज्ञानशास्त्र तज्ज्ञ

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version