Home Uncategorized सहकार्याने बहरली शेती

सहकार्याने बहरली शेती

0

शेती हा व्यवसाय असा आहे, जेथे मेहनत, जिद्द, सहकार्य आणि प्रयोगशील वृत्तीची आवश्यकता असते. गेल्या काही वर्षापासून कोकणातील शेतकरी एकाच पिकावर अवलंबून न राहता वर्षातून दोन-दोनदा पीक घेत आहेत. कधी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने, मित्रांच्या सहकार्यातून आणि आपल्या प्रयोगशील वृत्तीची जोड देऊन शेती हा व्यवसाय फायद्याचा बनवत आहेत. अशा सकारात्मक वृत्तीतूनच शेतीचा येत्या काळात विकास होणार आहे. सिंधुदुर्गमधील सावडावमधील मीननाथ आचरेकर आणि त्यांचे मित्र, आचरा डोंगरेवाडी येथील रवींद्र बागवे यांची प्रयोगशील शेती तसेच स्वावलंबनाचा आदर्श घालून देणारी राजापूरमधील विद्यार्थ्यांची शेती म्हणूनच वाखाणण्यासारखी ठरते.

चांगल्या हेतूने जेव्हा चार जण एकत्र येतात आणि चारांचे आठ हात शेतात राबू लागतात तेव्हा ओसाड जमिनीतूनही मधुर फळे चाखायला मिळतात. या सहकार्याच्या मंत्रावर कलिंगडाची शेती पाच एकर जमिनीत मीननाथ आचरेकर, संतोष तेली, राजू रावराणे, सुहास पाताडे यांनी केली. कणकवलीमधील सावडाव गावठाणवाडी येथे बहरलेली ही शेती सुमारे ७० टन एवढे उत्पन्न देईल, असा विश्वास त्यांना आहे.

कलिंगडे व्यापा-याला न विकता सिंधुदुर्गमधील आठवडा बाजार व सावडाव फाटा येथील स्टॉलवर त्यांची विक्री केली जात आहे. शिवाय १० एकर जमिनीत ऊस लागवड केली असून यामध्ये तीस टनांपर्यंत उसाचे उत्पादन हे चार तरुण शेतकरी घेत आहेत. या चौघांच्या मेहनतीचे सर्वाकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

सावडाव गावठणवाडी येथील मीननाथ आचरेकर (२९) यांचे वडील उत्तम आचरेकर हे शेतकरी होते. एक प्रगतशील शेतकरी म्हणून २००८ साली पालकमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मीननाथ यांनी आठ वर्षापूर्वी कणकवली महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच शेतीच्या कामात लक्ष लागले. शेतीत काम करत असताना त्यांनी शिक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याअगोदर जमीन भाडेतत्त्वावर शेतीसाठी दिली होती. पण त्या वेळी आपल्या जमिनीत पीक घेणारे लोक कशाप्रकारे शेतीची काळजी घेऊन उत्पन्न मिळवतात हे मीननाथनी जवळून पाहिले होते. आपणही उपजीविकेचे साधन म्हणून शेतीच करायची, आपल्या जमिनीत कष्ट घ्यायचे असा निर्धार त्यांनी केला. सुरुवातीला ऊस, भोपळा, मिरची, भेंडी, वांगी, कार्ली, कलिंगड अशी पिके ते घेऊ लागले. यासाठी घरच्यांची मदत घेतली. यासाठी एकही मजूर बाहेरून न घेता ४२ एकर क्षेत्रात ऊस, कलिंगड, भोपळा, ११० माड, १६०० काजू, २५० सुपारीची झाडे व मसाला पिके अशी विविध उत्पादने घेत त्यांनी शेती यशस्वी केली.

चौघे एकत्र आले आणि कृषी क्रांती झाली
या वर्षी मीननाथच्या साथीला संतोष तेली, राजू रावराणे, सुहास पाताडे आले आणि चार जण एकत्र आले. या चौघांनी मिळून पाच एकर क्षेत्रात तीन किलो बियाणे वापरून जवळपास ७० टन एवढे कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. चौघे एकत्र आल्यामुळे स्टॉल, आठवडा बाजार आणि मळा अशा विविध पातळींवर हे करणे शक्य होत असल्याचे सांगतानाच ते म्हणाले की, ज्या मालाला व्यापा-यांकडून १००० रुपये मिळत होते त्याच मालाला आम्ही स्वत: बाजारपेठेत विक्री करत असल्याने ५००० पर्यंत पैसे मिळू लागले.

मुबलक पाणी महत्त्वाचे
मीननाथ यांच्या शेतीपासून जवळच नदीचे पाणी असल्याने शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी हीच निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे. शेतक-यांना ते मिळाल्यास त्यांच्या जमिनीत भरघोस उत्पादन मिळण्याचा मार्ग मोकळा होतो. परंतु त्याचा योग्य वापर, योग्य नियोजन करून घाम गाळण्याची तयारी असली पाहिजे. हे असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. त्याचबरोबर योग्य मार्गदर्शन घेणेही गरजेचे आहे. ही शेती करत असताना ओरोस येथील कृषी पदवीधर विजय जोईल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, असे आचरेकर यांनी सांगितले.

उन्हाळ्यात कलिंगड, पावसात भोपळा
उन्हाळ्यात कलिंगडाचे पीक घेतल्यानंतर त्याच जागी पावसाळ्यात भोपळ्याचे पीक आचरेकर घेतात. चार कलिंगडासाठीच्या खड्डय़ांची माती एकत्र करून पावसाळ्यात त्यात भोपळ्याच्या बिया टाकल्या जातात. यातून सात ते आठ टन भोपळ्याचे पीक घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version