Home टॉप स्टोरी सहा महिन्यांत केलेत काय? नुसत्या घोषणा!

सहा महिन्यांत केलेत काय? नुसत्या घोषणा!

1

लोकसभा निवडणुकीत जनतेला भरमसाट आश्वासने देऊन सत्तेवर आल्यानंतर घुमजाव करणा-या केंद्रातील मोदी सरकारविरोधात कॉँग्रेसने जोरदार आघाडी उघडली आहे.

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत जनतेला भरमसाट आश्वासने देऊन सत्तेवर आल्यानंतर घुमजाव करणा-या केंद्रातील मोदी सरकारविरोधात कॉँग्रेसने जोरदार आघाडी उघडली आहे. मोदी सरकारचे वाभाडे काढणारी ‘छे महिने पार, यू टर्न सरकार’ ही पुस्तिका कॉँग्रेस सरकारने सोमवारी प्रकाशित केली आहे. या पुस्तिकेत काळ्या पैसा, विमा विधेयक, आधार, बॅँकेत थेट अनुदान, पाकिस्तानबाबतच्या भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या वचनांची चिरफाड केली आहे.

कॉँग्रेसचे महासचिव अजय माकन यांनी सोमवारी ३० पानांची ही पुस्तिका प्रकाशित केली. भाजपा सरकारने सहा महिन्यांत आतापर्यंत २५ आश्वासनांवर घुमजाव केले आहे. त्यापैकी २२ आश्वासनांचा पंचनामा या पुस्तिकेत केला आहे. सत्ता मिळवण्यासाठीच भाजपा कॉँग्रेस सरकारच्या प्रत्येक योजनेवर टीका करत होते. या पुस्तकातून मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना माकन म्हणाले की, काळय़ा पैशाबाबत सरकार ‘सफेद खोटे’ बोलत आहे. पाकिस्तानबाबत सरकारची भूमिका धरसोडीची असून विमा विधेयकाबाबत सरकार दुटप्पीपणे वागत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसशी संगत करून भाजपा सरकारने संधीसाधूपणाचा कळस गाठला आहे. मोदी यांनी राजकारण गुन्हेगारीमुक्त करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यांच्या मंत्रिमंडळात कलंकित मंत्री आहेत. जम्मू-काश्मीरमधील ‘कलम ३७०’ बाबतही त्यांनी घूमजाव केले आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीत निवडणूक घेताना त्यांची भूमिका धरसोडपणाचीच राहिली, असेही ते म्हणाले.

कॉर्पोरेट्सनी दिलेल्या प्रचंड निधीच्या बळावर भाजपाने निवडणुकीच्या काळात प्रचंड मोठी प्रचार मोहीम राबवली. त्यांनी जनतेला खोटी वचने  देऊन विरोधकांवर बेछूट आरोप केले. आता सहा महिन्यांनंतर मोदी सरकार आपणच दिलेल्या वेगवेगळ्या आश्वासनांपासून दूर पळत आहे. यूपीए सरकारच्या योजना नवीन नावाने राबवल्या जात आहेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांना फायदेशीर ठरतील, असे निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.  गेल्या आठवडय़ात सरकारने तीन निर्णयाबाबत घुमजाव केले. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या फाइल्स, नागरी अणू उत्तरदायित्व कायदा आणि भारत-बांगलादेशच्या सीमा करार आदींचा समावेश होता. आता कॉँग्रेसप्रणीत आघाडी सरकारच्या प्रत्येक निर्णयावर त्या काळात भाजपा टीका करत होती. आता सत्तेवर आल्यानंतर कॉँग्रेसचीच धोरणे का राबवली जात आहेत, याचे उत्तर देशातील जनतेला व कॉँग्रेसला द्यायला हवे, असा सवाल माकन यांनी केला.

या पुस्तिकेबरोबरच सोशल मीडियावरही सरकारच्या अपयशी धोरणांची माहिती देण्यात येणार आहे. २०१० मध्ये भाजपाने अणू उत्तरदायित्व विधेयकावरून संसदेत गदारोळ केला होता. आता त्याच मुद्दयावर मोदी सरकारची भूमिका वेगळी आहे. बांगलादेश सीमा जमीन कराराबाबत विरोधी पक्षनेते असताना अरुण जेटली यांनी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिले होते. आता गुवाहाटीत बांगलादेशशी सीमा जमीन करार करण्यात येईल, अशी घोषणा मोदींनी केली. आता सत्तेवर आल्यानंतर भाजपाच्या भूमिकेत कसा बदल होतो? असा सवाल माकन यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांना विचारला. भाजपा व राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीका करताना माकन म्हणाले की, निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी कॉँग्रेसवर भाजपाने जोरदार टीका केली होती. आता तोच पक्ष भाजपाचा नैसर्गिक मित्र बनला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version