Home मजेत मस्त तंदुरुस्त सुका खोकला असह्य होतो तेव्हा..

सुका खोकला असह्य होतो तेव्हा..

2

उठता-बसता, झोपता-जागेपणी असा सततचा खोकला जीवघेणा होतो.. या खोकल्याने घशाबरोबरच, छाती, बरगडय़ाही दुखून येतात. नाना प्रकारची औषधं आपण करतो, पण फरक पडत नाही. अशावेळी करायचं काय?

‘सर, तुम्ही फ्री आहात का? मला एक सल्ला हवाय. गेले काही दिवस सतत खोकला येतोय. दिवसभर खोकून खोकून जीव नकोसा होतोय. मी कंटाळलोय, त्रासलोय. खूप औषधं केली, पण हा खोकला काही जात नाही. तुमच्याकडे अनेक उपाय आहेत. मला वाटतं, तुम्ही बरं करू शकाल.’

एवढं बोलतानाच शिरीष सातत्याने खोकत होता. मला कळलं, त्याचा हा खोकला खूप दिवसांपासूनचा आहे. कफ असल्याचं मात्र जाणवत नव्हतं. म्हणजे हा खोकला होता, ‘सुका खोकला’!

सध्या घरोघरी लोक सुका खोकला, सर्दीनंतरचा खोकला.. अशा आजारांनी त्रस्त आहेत. आणि ही साथ होळी, रंगपंचमीपर्यंत सुरूच राहणार.

आयुर्वेदाप्रमाणे, हिवाळ्यात जमा झालेला कफ संक्रांतीनंतर उष्मा सुरू झाल्यावर वसंत्ऋतूमध्ये पातळ होण्यास सुरूवात होते, तेव्हा म्हणजे त्या दरम्यानच्या काळात कफाचे अनेक रोग डोकं वर काढतात. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यानंतर सर्वत्र याच आजाराची लक्षण पाहायला मिळतात. ऋतुनुसार असा खोकला उद्भवणं हे सगळं नैसर्गिक आहे.

शिरीष मला भेटायला आला तेव्हाही सारखा खोकतच होता. मी त्याला विचारलं, ‘सांग, हा असा खोकला केव्हापासून आहे?’ त्याच्या खोकण्यावरून कळतच होतं की, हा सुका खोकला आहे. तरी मी विचारलं, ‘सुका खोकला आहे की, कफ पण पडतोय? खोकल्याचं प्रमाण कमी-जास्त केव्हा केव्हा असतं?.. वगैरे वगैरे.’

शिरीष अगदी त्रासलेल्या अवस्थेत दिसत होता, तो सांगायला लागला, ‘अहो सर, खोकून खोकून बरगडय़ा खूप दुखायला लागल्यात. छातीत खूप जडपणा वाटतो आणि श्वास घेतानाही खूप त्रास होतो. त्यामुळे झोपसुद्धा लागत नाही.’

मी त्याला असा विश्वासही दिला की, ‘तू २-३ दिवसात ठणठणीत बरा होशील. खोकला अजिबात येणार नाही.’ तो म्हणाला, ‘तुम्ही खोकला लवकरात लवकर घालवाल तर खूपच बरं, पण मला नाही वाटत की तो एवढय़ात जाईल कारण गेल्या महिन्याभरापासून मला खोकला आहे.’

खरंच होतं त्याचं, माझ्यावर विश्वास न ठेवणं. कारण गेल्या महिन्याभरापासून गरम दुधात हळद-मध टाकून पिणं, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं. सकाळी तुळस-आलं टाकलेला चहा पिणं असे कितीतरी उपाय तो करून झाला होता. शिवाय मध्यंतरी काही दिवस तर डॉक्टरांकडून त्याने औषधंही आणलं होतं. त्या औषधाने त्याला काही दिवस आराम पडला खरा, पण ही औषधं बंद केल्यावर पुन्हा जैसे थे. फॅमिली डॉक्टरांनी शिरीषला रक्त तपासणी करण्याचाही सल्ला दिला होता. पण नंतर काय तो त्यांच्याकडे परत गेला नाही. साध्या खोकल्यासाठी रक्त तपासणी करण्याची गरज काय, असं तो मला विचारू लागला आणि म्हणाला, आता तुम्हीच सांगा मी काय करू?

शिरीषचा हा प्रश्न स्वाभाविकच होता. सर्वसामान्य खोकल्यालाही आपण रोग समजतो. पण आयुर्वेदात खोकल्याचे पाच प्रकार सांगितले आहेत, ‘वातज’, ‘पित्तज’, ‘कफज’, ‘क्षतज’ आणि ‘क्षयज’. वायुमुळे जेव्हा खोकला येतो, तो सुका खोकला. यात खोकत असताना छातीत, हृदयाच्या परिसरात, बरगडयांमध्ये आणि डोकंही दुखत असतं.

सगळ्या प्रकारच्या खोकल्यांमध्ये वायुप्रदुषित होतो. त्याला जोडीने आपला आहार, जीवनशैली कारणीभूत आहेतच. चणे, वाटाणे, बटाटे यांसारखे पदार्थ तसंच शिळं अन्न, रात्री जागरणामुळे अशा प्रकारचा खोकला उद्भवतो आणि बरेचदा तो दीर्घकाळ आपल्याला नियंत्रणात ठेवतो. कितीही औषधं घेतली तरी त्याचं प्रमाण वाढत जातं. पित्तामुळे, कफामुळे होणा-या खोकल्याची लक्षणं आणखी वेगळ्या प्रकारची असतात.

शिरीषला मी ज्येष्टीमध, खदिरादी वटी, सितोपलादी चूर्ण, तालिसादी चूर्ण, पथ्यादीक्वाथ, भारंग्यादीक्वाथ, कंटकारि यांसारख्या निर्दोष औषधांचं मिश्रण घ्यायला सांगितलं. त्याने त्याला आठवडयाभरातच खूप फरक पडला. काहीही असो, त्याला आराम पडला हे विशेष! मुळात, अनेक औषधं करून थकल्यानंतर आराम पडत नसेल त्यावेळी लोक नाइलाजाने वैद्यांकडे धाव घेत असतात. त्यांचा त्रास समजू शकतो. आयुर्वेद लक्षणांऐवजी मुळावरच घाव घालत असतो.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version