Home महामुंबई सेल्फी काढा, पण जबाबदारीने वागा

सेल्फी काढा, पण जबाबदारीने वागा

1

समुद्राच्या ठिकाणी, बोटिंग करताना, धावत्या ट्रेनसमोर, धबधबे किंवा टोकावर उभे राहून सेल्फी काढणे आणि त्यातून आनंद मिळविणे ही स्टाईल आजच्या तरुणाईसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.

मुंबई- समुद्राच्या ठिकाणी, बोटिंग करताना, धावत्या ट्रेनसमोर, धबधबे किंवा टोकावर उभे राहून सेल्फी काढणे आणि त्यातून आनंद मिळविणे ही स्टाईल आजच्या तरुणाईसाठी जीवघेणी ठरू लागली आहे. सेल्फी काढण्याच्या नादात अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. सेल्फीच्या हव्यासापोटी साहसी ठिकाणी फोटो काढण्याचा मोह अनावर होत असल्यामुळे तरुणाईसाठी हाच सेल्फी त्यांच्या आयुष्याचा अगदी शेवटचा क्षण ठरू लागला आहे. त्यामुळे सेल्फीचा खरा आनंद नेमका कशात आहे? याचा शोध आजच्या तरुणाईने घेणे गरजेचे झाले आहे.

सोशल मीडियावर सतत कनेक्ट राहण्याच्या नादात तरुणाई बरेचदा आपला जीव धोक्यात घालत असते. सेल्फी काढण्याच्या नादात वांद्रे बॅण्ड स्टॅन्डवर तरन्नुम अन्सारी, अंजूम खान आणि मुश्तरी खान समुद्रात बुडाल्या. परंतु रमेश वाळुंज या युवकामुळे अंजूम आणि मुश्तरीचा जीव वाचला. मात्र तरन्नुम देवाघरी गेली. जीव वाचवण्याच्या नादात रमेश यांनाही स्वत:चा जीव गमवावा लागला.

सेल्फीची हाव धरून टोकावर उभे राहत फोटो काढण्याच्या नादात अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामध्ये तरुणांचाच जास्त सहभाग असतो. त्यासाठी जबाबदार तरुणांनीच खालीलप्रकारे काही प्रतिक्रिया दिल्या आहेत ज्यात असे म्हटले आहे की सेल्फीपेक्षा आपला जीव जास्त महत्त्वाचा असतो, त्यामुळे सेल्फीच्या हव्यासापोटी साहसी ठिकाणी जाऊन फोटो काढण्याचा मोह टाळा.

सावधानता बाळगा
पाठून येणा-या ट्रेनसोबत सेल्फी काढतानाही अनेकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आजच्या तरुणाईला सेल्फी का व कुठे काढावी याचे अजिबात भान राहिलेले नाही. प्रत्येक क्षण कॅमेरात टिपण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालतो आणि तोच क्षण आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरतो. – मयूरेश जाधव, विद्यार्थी

मोह आवरा
समुद्राच्या ठिकाणी टोकावर उभे राहून, ट्रेनच्या पुढे उभे राहून, रस्त्यावर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आजकाल प्रत्येकालाच होत असतो. साहसी क्षण निर्माण करून उगाचच ते कॅमेरामध्ये टिपण्यापेक्षा सुरक्षित आयुष्य जगण्याचा कोणीच विचार करीत नाही. त्यामुळे तरुणाईने आजकाल या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला हवा, जेणेकरून होणारे अपघात थांबतील. – निकिता मुरकर, विद्यार्थी

रोग सेल्फीचा
सेल्फीच्या हव्यासापोटी आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहत नाही. सुरक्षित ठिकाणी फोटो काढण्यापेक्षा तरुणाई साहसी ठिकाणी फोटो काढण्यात जास्त रमताना दिसते. सेल्फीचा रोग जडलेल्या तरुणाईने आता तरी यावर उपचार करायला हवा. क्षण कॅमेरामध्ये कैद करताना तो शेवटचा फोटो तर होणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. – अनिषा कदम, विद्यार्थी

सेल्फीमुळे खरा आनंद गमावला
सेल्फीची क्रेझ सध्या तरुणाईमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे ही क्रेझ प्रत्येक शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर सर्रास चालू असते. त्यातच समुद्राच्या ठिकाण, टोकावरची ठिकाणे अशा ठिकाणी तरुणाई आनंद उपभोगण्यापेक्षा सेल्फी वा ग्रुफी काढण्यातच जास्त मग्न असते. त्यामुळे सेल्फीच्या नादात आपण आपला खरा आनंद गमावून बसत आहोत याचा विसर तरुणाईला पडला आहे. – दिव्या पवार, विद्यार्थी

1 COMMENT

  1. प्रत्येक क्षण कॅमेरात टिपण्याच्या नादात आपण आपला जीव धोक्यात घालतो आणि तोच क्षण आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण ठरतो- प्रकाश कदम, ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version