Home रविवारची मुलाखत सैतानाचा बाप

सैतानाचा बाप

1

महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातर्फे कलाक्षेत्रातील ज्येष्ठ आणि थोर व्यक्तीला दिला जाणारा पुरस्कार यंदा जाहिरात क्षेत्रातील सर्जनशील व्यक्तिमत्त्व असलेल्या गोपी कुकडे यांना जाहीर झाला. ओनिडा टीव्हीच्या जाहिरातींचे कर्ते म्हणून सर्वसामान्यांना गोपी कुकडे माहीत आहेत. जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेला सर्वसामान्यांपर्यंत कनेक्ट करण्याचं मोठं श्रेय त्यांना जातं. मृदू व्यक्तिमत्त्वाच्या गोपी कुकडे यांच्याशी यानिमित्ताने मारलेल्या गप्पा.
गोपी तुम्ही जाहिरात क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी बोलताना नेहमीच ‘प्लॅन युवर वर्क’ असं आवर्जून सांगता. तुमच्या आयुष्याला आकार देताना तुम्ही असं प्लॅनिंग केलं होतं का?

प्लॅन युवरसेल्फ असं मी नेहमीच सांगतो. मी स्वत: जेजेमध्ये किंवा कामातही प्लॅनिंगला खूप महत्त्व देतो. एवढय़ा वेळात आयडिया सुचायला हवी, रफवर्क एवढय़ा वेळात आणि मग डिझाइनसाठी एवढा वेळ. ही माझ्या कामाची गुरुकिल्ली आहे आणि ती मी सगळ्यांशी शेअर करतो. कारण हे तंत्र आहे. नियोजनाला खूपच महत्त्व आहे. अध्र्या तासात आयडिया सुचली नाही तर जे काही सुचलं आहे ते घेऊन पुढे जायचं. त्यामुळे माझं पेपरवर्क कंप्लीट व्हायचं. जी आयडिया सुचलीय ती कुवतीप्रमाणे विकसित करत गेलो. त्यामुळेच मी पहिला नंबर कधी सोडला नाही.

आयुष्याचं म्हणाल तर मात्र तसं काही नियोजन नाही झालं. पण मला काय करायचं ते साधारण माहीत होतं. लहानपणापासून ड्रॉइंगची आवड होती. मी तसा सुधारित काळात जन्माला आलो. आईवडील ब्रॉडमाइण्डेड होते. चित्रकलेच्या सुरुवातीच्या परीक्षाही मी दिल्या. माझे वडील सिनेमाक्षेत्रात एडिटर होते. त्यामुळे त्यांच्यासोबत एकदा मी ज्योति स्टुडियोत गेलो होतो. साधारण सात-आठ वर्षाचा असेन मी. तिथे होर्डिग रंगवण्याचं काम सुरू होतं. ते कलर्स बघून मी प्रचंड फॅसिनेट झालो होतो. आणि आपण असं होर्डिग रंगवण्याचं काम करायचं, असं मी मनाशी ठरवून टाकलं होतं.

आम्ही दादरच्या रानडे रोडवर पाटीलवाडीत राहायचो. तिथे एक स्टुडियो सुरू झाला होता. माझी आवड लक्षात घेऊन मला एसएससीची परीक्षा होईपर्यंत तिथे फिरकायला बंदी होती. मात्र एसएससीचा शेवटचा पेपर झाला आणि मी दप्तर टाकून थेट स्टुडियोत दाखल झालो आणि त्यांना सांगितलं की, मला होर्डिग रंगवायची आहेत. ते मला ओळखत होते. त्यामुळे मला परवानगी मिळाली आणि मी होर्डिग्ज रंगवायच्या कामात रुजू झालो.

अर्थात मी मेकॅनिकल ड्रॉइंग आणि बाकीच्या गोष्टीही करत असल्यामुळे आर्किटेक्ट व्हावं, असं काहीसं घरातल्या लोकांचं म्हणणं होतं. म्हणून परीक्षेचा निकाल लागल्यावर अर्थातच जेजेत गेलो. तिथे अर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. तिथलीच एक इमारत सुंदर वाटली म्हणून आत शिरलो. त्यांनी काय करता वगैरे विचारलं. माझी पार्श्वभूमी पाहून तिथले लोक म्हणाले, तुम्ही कमर्शिअल आर्टला यायला पाहिजे. तुम्हाला शक्य असेल तर दोन्हीकडे प्रवेश घ्या. मी दोन्हीकडे प्रवेश घेतला. वेळा वेगळ्या असल्यामुळे अडचण आली नाही.

मग जेजेमध्ये कमर्शिअल आर्टमध्ये तुम्ही अधिक रमत गेलात..

हो, तसं झालं खरं. जेजेतली पाच वर्षे अॅनडव्हेंचरस होती. मुळात मला दहापैकी सात-आठ कसे मिळवायचे माहीत होतं. पण तरीही वेडय़ासारखं काहीतरी मुद्दाम करायचो. ते पटायचं नाही. मग त्यात दोनच मरक मिळायचे. शिक्षक आणि इतर विद्यार्थीही विचारायचे.. तुझ्यात एवढं फ्लक्चुएशन कसं येतं. त्यावर माझं म्हणणं असायचं की जोपर्यंत काय करू नये हे मला कळत नाही तोपर्यंत काय बरोबर आहे हे मला कळणार नाही. एका अर्थाने ही कॅल्क्युलेटेड रिस्क असायची. माझं इलस्ट्रेशन चांगलं होतं. तिथे मी तगडा होतो. त्यामुळे त्या मार्कावर मी तरून जायचो. एक गंमत आठवतेय. कोलाज करण्यासाठी रबर सोल्यूशन वापरलं जातं हे मला माहीत नव्हतं. कदाचित शिकवलं त्यावेळी मी अॅ ब्सेंट असेन. फायनल इयरला फाउंडेशनच्या वेळी कोलाज करायला सांगितलं गेलं. मी विविध कागदाचे तुकडे करून कोलाज केलं, पण ते फेव्हिकॉल लावून चिकटवलं. त्याचा पापड झाला. अलमोस्ट डिझाइनमध्ये फेल झालो होतो.

पण बाकीच्या कामावर मी तरलो. त्यावर्षी सेकंड आलो. नाहीतर मी नेहमीच पहिला होतो. माझ्यानंतर वीस-तीस मार्कानी सेकंडवाला असायचो.

एका कुणाच्या तरी डोक्यात जेजेमध्ये आर्ट जत्रा करण्याचं आलं. मी होर्डिग करतो, हे माहीत असल्याने मला २०० चौरस फुटांचं चित्र काढायला सांगितलं गेलं होतं. पण मी प्रॅक्टिकल होतो. कारण होर्डिगचं तंत्र आणि चित्राचं तंत्र वेगळं. मी कॉम्पोझिशन करून चार वेगवेगळी पेंटिंग्ज बनवली. या जत्रेतली चित्रं कुणीच विकत घेतली नाहीत.

तुम्ही चित्रांबरोबर परफॉर्मिग आर्टमध्येही रस बाळगून होता, असं कळतं..

सांगतो ना.. जेजेतल्या आर्ट जत्रेत प्रत्येक वर्गाला २० मिनिटांच्या एंटरटेन्मेंटची जबाबदारी दिली होती. मला नाचायची भयंकर हौस. राणी सबनीस आमच्याबरोबर होती. आम्ही दोघांनी रोज आठवडाभर गणगवळण सादर केली. ती गायची, मी नाचायचो. दररोज नवी बतावणी करायचो. कधी सरांची भन्नाट फिरकी घ्यायचो. कृष्ण का आला नाही.. कारण सबमिशन पूर्ण झालं नाही. अशा छापाचे विनोद करायचो. पाच दिवस खूपच धमाल केली.

त्याचा फायदा झाला की तोटा?

फायदा झाला का, ते नाही सांगता येणार पण तोटा नाही झाला. मी संध्याकाळी काम करत असल्यामुळे कॉलेजमधली सगळी कामं मी कॉलेजमध्येच करायचो. बाकीच्या टाइमपास गोष्टींना वेळ नसायचा. तरी वर्गात मस्करी करायचो. कुणाच्या बॅगमध्ये कबुतर आणून ठेव किंवा अशाच काही गमतीजमती. सर नेहमी एक गोष्ट सांगायचे. मागच्या बॅचचा एक मुलगा चांगला होता. पण गेला. ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला. मला भीती वाटायची सरांच्या या उदाहरणांच्या गोष्टींमधल्या मुलांमध्ये माझंही नाव येणार एक दिवस. पण तसं झालं नाही.

जेजेमध्ये होर्डिगच्या कामाचा किती फायदा झाला?

होर्डिगमुळे सिनेमाची एक दृष्टी आली. त्यावेळी गुलजारचं ‘मीरा’ नावाचं पिक्चर आलं होतं. मी प्रोजेक्ट त्यावरून केला. कृष्णाचं प्रतीक म्हणून मोरपीस दाखवलं आणि त्याचीच वेगवेगळी रूपं. म्हणजे लता मंगेशकर गातेय तर चित्रामध्ये निळा रंग आणि तरंग दाखवायचो. त्यासाठी मला अॅीवॉर्ड मिळालं. होर्डिगच्या सवयीमुळे मी बेधडक लाल रंग लावायचो.

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसातल्या स्ट्रगलबद्दल सांगता येईल का?

तेव्हा प्रोफेशनल लोक कॉलेजमध्ये कमी यायचे. त्यामुळे नीट मार्गदर्शन नसायचं. म्हणून मी आवर्जून लेक्चरसाठी बोलावलं की विद्यार्थ्यांना भेटायला जातो. मला कधीही बोलवा, मी तयार असतो. तर, कॅम्पस इंटरव्ह्यूमधून चैत्र या एजन्सीमध्ये निवड झाली होती. पण तीन महिने असेच गेले. त्यांच्याकडून काही कळत नव्हतं. दरम्यान इंटरकॉम नावाची एजन्सी होती. त्यांनी पाच मिनिटं हे करा, मग नंतर ते करा, असं काहीबाही करायला सांगितलं. मी त्यांना म्हटलं.. पाच मिनिटांत जेवून येतो. गेलो तो पुन्हा तिथे आलोच नाही. पण दरम्यान चैत्रात परेरा परत आले. आणि मी तिथे रुजू झाले.

चैत्रमध्ये गंमत होती. रोजच्या रोज पिकनिक असायची. पण अशी पिकनिक करून चालणार नाही. त्यातून शिकायला मिळणार नाही, हे माझं मलाच जाणवलं. मग तिथून क्लॅरियनमध्ये शिरलो. इलस्ट्रेटर म्हणून माझ्या कामाची पावती मिळत होती. त्यांनी एशियन पेंटच्या इलस्ट्रेशनसाठी बोलावलं होतं. मला तर आनंद झाला होता, पण भीतीही वाटत होतो. मी ते काम कॉलेजच्या असाइनमेंटच्या स्टाइलने काम केलं. रामायण ही थीम होती. पण रामायणापेक्षाही त्यांचा भर रंगांवर होता. त्या कॅम्पेनमध्ये सर्वप्रथम रंगच येऊन आदळायचे. त्यामुळे क्लायंट खुश झाला. क्लॅरियनमध्ये बेसिक वर्क शिकायला मिळालं. मोठी एजन्सी होती. प्रचंड केऑस होता. पण शिकायला भरपूर मिळालं. तसं आवर्जून कुणी शिकवत नाही कुणाला. पण काम पडलं की माणसं शिकत जातात, तसं तिकडे व्हायचं. मी तिकडे फ्रीलान्सही करायचो. अठरा अठरा तास काम करायचो. तिथून एव्हरेस्टमध्ये गेलो. आणि मग अॅडव्हेन्यूजची स्थापन होईपर्यंत फ्रीलान्सिंगमुळे मी जवळजवळ ९५ टक्के एजन्सीजबरोबर काम करत राहिलो. खूप लोकांशी संबंध आला. खूप लोकांकडून शिकता आलं. मी स्पंजसारखा सगळं शोषत राहिलो.

या उडय़ा मारताना काही मिस झालं, असं नाही वाटलं कधी?

उषा भांडारकरने एकदा विचारलं होतं.. त्यांच्या एजन्सीसाठी फिल्म्सचं काम करशील का म्हणून. पण क्लॅरियनवाले सोडायला तयार नव्हते. आणि ऑडियो व्हिज्युअलसाठी मानसिक तयारी नव्हती. नाही सांगायलाही मी क्लॅरियनच्याच गाडीतून गेलो. ती चूक झाली. अजूनही खंत वाटते.

गोपी कुकडे आणि लाघवी हसरा चेहरा हे समीकरण आहे. हे हसू तुम्ही कसं कमावलं?

सुरुवातीला अगदी उलट होतं. पहिल्यांदा मी भयंकर चिडायचो. मग ग्रॅज्युअली मला कळलं की, मी रागावून काही फायदा नाही. लोकांना उलट त्यातून आनंद मिळतो. फायदा तर काही होतच नाही. मग मी हसणं शिकलो. काहीही झालं तरी हसायला शिकलो. जाहिरात क्षेत्रात क्रिएटिव्ह विरुद्ध सíव्हसिंगवाले यांच्यात मारामा-या नेहमीच्याच ठरलेल्या. त्यांना वाटत असतं की रिकामे टाइमपास करण्याचे एवढे पैसे घेतात आणि आम्हाला वाटतं की फक्त क्लायंट आणि आमच्यात पोस्टमनगिरी करतात. पण मग मी एखादं कॅम्पेन नाकारलं गेलं की, ‘आपण’ पुन्हा ते करू असं सांगत त्यांनाही सामावून घ्यायचो. त्यामुळे माझा संताप कमी कमी होत गेला. दुस-या आर्ट डिरेक्टरने नाकारलेली कामंही मी अंगावर घ्यायचो. माझं काम संपल्यानंतर संध्याकाळी मी फ्रीलान्सरसारखी ती कामं करायचो. त्यामुळे मला भरपूर कामं करायला मिळायची. त्यामुळे शिकता जास्त आलं आणि लोकांशी कसं वागावं हेही कळलं. त्यामुळे चेहरा आपोआप हसरा झाला. माझ्या मित्राचा मुलगा सोबत फोटोग्राफी करतोय. माझे फोटो काढताना मी गंभीर झालो की त्याला ते आवडत नाही. तो म्हणतो, यात गोपी कुकडे कुठे दिसत नाहीत. चेहरा हसराच ठेवा. मी त्याला म्हटलं, दहा मिनिटांच्या वेळात मी किती वेळ हसतो. सात-आठ मिनिटं, असं तो हसत हसत सांगतो.

एजन्सींमधल्या राजकारणावर चर्चा होते. तुमच्या या हास्यनीतीने त्याला कसं तोंड दिलं?

पॉलिटिक्सही मी शिकलो. मी स्वत: पॉलिटिक्स केलं नाही. पण मलाही उंगली टेढी करता येते. हे असं सगळ्यांनी शिकलंच पाहिजे. अनेक लोक मिठी छुरी घेऊन असतात. त्यांचा बंदोबस्त पॉलिटिक्स करूनच करावा लागतो.

तुमच्या यशस्वी जाहिरातीच्या कॅम्पेन सगळ्यांना माहीत आहेत. पण तुमच्या फसलेल्या कॅम्पेन्सबद्दल सांगता येईल का?

बहुतेकदा क्लायंटच्या मूर्खपणामुळे जाहिराती फसतात. अंजली होम अप्लायन्ससाठी एक छान जाहिरात आम्ही केली होती. मूळ उद्देश होता की, बायकांना थोडी शॉक ट्रिटमेंट द्यावी आणि त्यातून अंजलीचं ब्रँडिंग व्हावं. म्हणून आम्ही तशीच जाहिरात ओळ तयार केली होती. बायको आपल्या नव-याला सांगतेय.. ‘एक सौतन ला दो जी.’ सौतन म्हणजे अंजली किचनवेअर. खूपच चांगला रिस्पॉन्स होता. तरुण क्लायंटला ते आवडलं होतं. मात्र त्याचे वडील जेव्हा कॅम्पेन बघायला आले तेव्हा ते म्हणाले, की हम लोगों को गलत सिखा रहे है. दुसरी शादी करने को कह रहे हैं. यह ठीक नही. हा टचिंग शॉक त्यामुळे पुढे आलाच नाही. ही आयडिया अंजलीशिवाय दुस-या कुणाला करता आली नसती.

कॅडबरीच्या बटर ग्लुकोज बिस्किटचं कॅम्पेनही फसलं होतं. पाल्रेसारखा मोठा जायंट समोर उभा असताना प्रीमियम क्वालिटीचं उत्पादन त्यांनी आणायचं ठरवलं. पण त्याचं फिनिशिंग वाईट झालं. सप्लाय वाईट झाला. शिवाय लोकांना खरोखरीच दुसरं बटर बिस्किट हवं का, याचा सव्‍‌र्हेच झाला नव्हता. आम्ही लॉरेल अॅलण्ड हार्डीसारखी कॅरॅक्टर घेऊन ते केलं होतं. हा मिझरेबल फ्लॉप होता.

एक वर्षाच्या आत त्यांनीच बोर्नव्हिटा बिस्कीट आणलं. खूप चांगलं कॅम्पेन होतं. पण पंधरा दिवसांत बिस्किटं कडू लागायची. आम्हीच खाऊन बघितली तर खाववत नव्हती. प्रॉडक्टमुळेही जाहिरात फ्लॉप होते ती अशी.

अॅबॉर्ट केलेल्या तर पुष्कळ जाहिराती आहेत. मफतलालसाठी आम्ही वेगळं कॅम्पेन. मफतलालचा सूट घातलेला एक राजबिंडा मॉडेल होता. त्याच्याकडे बघण्यासाठी एक महिला आपल्या गाडीचा मिरर अॅतडजस्ट करते. मात्र आरशातला फोटो खरा लावून चालणार नव्हतं. त्यात थोडं डिस्टॉर्शन आवश्यक होतं. पण मॉडेलचं नाव मोठं होतं. त्याला लो की दाखवणं योग्य नव्हतं म्हणून त्याच्यासाठी कॅम्पेन बाद झालं. समबडी इज वॉचिंग, या धर्तीवरचं ते कॅम्पेन होतं.

ओनिडाचं कॅम्पेन खूपच गाजलं. त्याची जन्मकथा काय होती.

ओनिडाच्या कॅम्पेनची जन्मकथा इंटरेस्टिंग आहे. तेव्हा टीव्हीचे ट्रेडर्स होते. भारतात जुनी मॉडेल्स आणून विकणारेच अधिक होते. परदेशी कंपन्यांपैकी सोनी टॉपला होती. ओनिडाला पाय रोवायचे होते. त्यांनी प्रथमच ओल्ड मॉडेलऐवजी जपानमध्ये जे बघितलं जात होतं तेच मॉडेल भारतात आणलं. त्या टीव्हीला ७६ चॅनेल्स होती. तेव्हा आपल्याकडे केवळ दोनच चॅनेल्स सुरू होती. टीव्ही सुंदर होता. बॉटम पॅनल ही नवी कल्पना होती. तोपर्यंत पॅनेल साइडला असायचं. टेक्नॉलॉजीही चांगली. पण आम्हाला फक्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलायचं नव्हतं. टीव्हीशी निगडित प्रतिष्ठा आणायची होती. म्हणून फाडणं, चुरगळणं, दगड फोडणं असे तीन पर्याय दिले. त्यातलं दगडाने टीव्ही फोडणं संमत झालं. हा टीव्ही कोण फोडतो तर आपल्या मनातला डेव्हिल. इंडियन राक्षस घ्यायचा विचार केला होता. पण आपला राक्षस फारच मठ्ठ असतो. पोट सुटलेला बिनडोक राक्षस टीव्हीची असूया जन्माला घालेल, असं वाटत नव्हतं. गौतमने त्यांना किंमतही वाढवायला सांगितलं. क्लायंटने टीव्हीची किंमत १६ हजार ठेवली होती. ती १९ हजार केली. इथे लोक शॉक्ड झाले. पन्नास टक्के लोकांना कॅम्पेन आवडलं तर उरलेल्या लोकांना अजिबात आवडलं नाही. पण शॉक कायम राहिला. क्लायंट अडव्हेंचरस होता. त्यांना बाकी सगळ्यांनी सांगितलं की, अशा डेव्हिल कॅम्पेनला जाऊ नका. पण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. दूरदर्शननेही या जाहिराती रिजेक्ट करायला सुरुवात केली होती. मग आम्ही त्याचा मॅस्कॉट केला. नंतर तो लव्हेबल झाला. पण नंतर नंतर त्या क्यूट डेव्हिलचा सेल्समन झाला आणि तो मेला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version