Home कोलाज सोशल पोलिस

सोशल पोलिस

1

कुठल्याही ठिकाणी एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसली तर नागरिकांना सोशल पोलिस होण्याची गरज आहे. तुमच्या आमच्या सारख्यांनी आपापल्या समोर काही चुकीचं घडताना दिसलं तर ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याची. दहा डोळे आपल्याकडे वटारून बघत आहेत ही जाणीव होते, तेव्हा कुकर्म करणारे हातही मागे येतात.
समाज. समाज हा एका मोठ्या आकाशगंगेसारखा विशाल असतो. त्यात असंख्य घटक असतात. या असंख्य घटकांचा एकत्रित परिणाम म्हणजे हा समाज असं आपण म्हणू शकतो. त्यात अनेक चांगल्या प्रवृत्ती, चांगले घटक असतात. त्याचबरोबर कमी-अधिक वाईट प्रवृत्ती, व्यक्ती, घटकही असतातच. या चांगल्या-वाईट प्रवृत्तींचा आपल्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो.

यात सत्ताधारी असतात. राजकारणी असतात. ज्यांच्यात बहुतांशी समाजव्यवस्थेबद्दल अनास्था बघायला मिळते, संवेदनहीनता बघायला मिळते. याला उत्तर म्हणून अनेक सामाजिक संस्था काम करत असतात. छोटे-मोठे उपक्रम राबवून त्या समाजाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत असतात. पोलिस यंत्रणा फार महत्त्वाची भूमिका बजावते. पण त्यातही त्रुटी आहेतच.

पण यावर चर्चा करण्यापलिकडे सामान्य माणूस काही करू शकत नाही, असंच ऐकायला मिळतं. हे बदलायची आज गरज आहे. ज्या वेगाने मुंबईसारख्या शहरांची लोकसंख्या वाढते आहे, तो बघता पोलिस किंवा प्रशासकीय यंत्रणांनी समाजातील अप्रिय, अयोग्य गोष्टी आटोक्यात येतील ही गोष्ट कठीण आहे. मूल्यशिक्षणाचा अभाव असल्यामुळे स्वयंशिस्त नाहीच आहे. एक वैयक्तिक अनुभव सांगावासा वाटतो. काही दिवसांपूर्वी मी बसस्टॉपवर उभा असताना समोरून एक महिला चालत येत होती. तिच्या मागून काही अंतरावर दोन मवाली मुलं चालत होती. अचानक त्यांच्या चालीचा वेग वाढला. मला शंका आली की ते त्या मुलीची पर्स किंवा दागिना चोरायच्या प्रयत्नात आहेत. मी आपसूक त्यांच्याकडे रोखून बघू लागलो. एक-दोन वेळा त्यांनी माझी नजर चुकवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तरीही बघतोच आहे कळल्यावर त्यांची पावलं मंदावली. त्यांच्या, आणि तात्काळ माझ्याही लक्षात आलं की माझ्या बाजूला उभा असलेला आणखी एक मुलगाही त्यांच्याकडे तसंच रोखून बघतो आहे. एकंदर परिस्थिती बघून त्यांनी चटकन रस्ता ओलांडला व ती दुस-या बाजूस गेली. मी व माझ्या बाजूच्या मुलाने फक्त एकमेकांकडे बघितलं. आमचा हेतू साध्य झाला होता. एक गरप्रकार घडण्यापासून वाचला होता.

असं जिथे तिथे होण्याची गरज आहे. गरज आहे ती म्हणजे ‘सोशल पोलिस’ची. तुमच्या आमच्या सारख्यांनी आपापल्या समोर काही चुकीचं घडताना दिसलं तर ते थांबवण्याचा प्रयत्न करण्याची. दहा डोळे आपल्याकडे वटारून बघत आहेत ही जाणीव होते, तेव्हा कुकर्म करणारे हातही मागे येतात. यूटय़ूबवर या विषयावर अनेक लघुपट बघायला मिळतात. ते आवर्जून आपण बघायला हवेत. पण ते लाइक आणि शेअर करण्यापलिकडे आपण जात नाही. स्वच्छता अभियानाबद्दलही असंच म्हणता येईल. लोकांना कचरा टाकण्यास परावृत्त करा अशा आशयाच्या जाहिराती टीव्हीवर येत आहेत, त्या प्रत्यक्षातही आल्या तर खूप वेगाने चक्र फिरतील. वेगळं असं काहीही न करता फक्त सजग राहून आपण वावरलो, तरीही बरंच काही करू शकतो, आणि करायला हवं.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version