Home महाराष्ट्र कोकण स्वतंत्र विदर्भाची मागणी केवळ मूठभर धनिकांची

स्वतंत्र विदर्भाची मागणी केवळ मूठभर धनिकांची

1

पंतप्रधान न झालेल्या पंतप्रधानांच्या (शरद पवार) अडीच तासांच्या मुलाखतीने समाजकारण, राजकारणातील अनेक पैलू उलगडून दाखवले. 
ग्यानबा-तुकाराम सहित्यनगरी, पिंपरी – पंतप्रधान न झालेल्या पंतप्रधानांच्या (शरद पवार) अडीच तासांच्या मुलाखतीने समाजकारण, राजकारणातील अनेक पैलू उलगडून दाखवले. विदर्भातील सर्वसामान्य कष्टक-यांना स्वतंत्र विदर्भ नको आहे, ही धनिकांची मागणी आहे असे दणदणीत मत त्यांनी मुलाखतीत व्यक्त केले. मुंबई बॉम्बस्फोटानंतर संरक्षणमंत्रीपद सोडून मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतरचे एक गुपीतही त्यांनी उघड केले.

हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी मस्जिद बंदर येथे १२व्या ठिकाणी बॉम्ब पेरण्यात आल्याची माहिती दूरदर्शनच्या मुलाखतीत दिली. त्यामुळे अधिक स्फोट झाले नाहीत. हिंदू-मुस्लीम एैक्य अधिक घट्ट झाले, अशीही आठवण त्यांनी जागवली. बालपणी व शालेय जीवनात अभ्यासात गती नव्हती. मात्र, नापास झालो नाही, १९५८ ला सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालो. अभ्यास सोडून सगळ्यात पुढे असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिल्याने हास्याची एकच खसखस पिकली.

संमेलनातील मंगेश पाडगावकर सभागृहात झालेल्या या मुलाखतीत माजी संमेलनाध्यक्ष फ. मुं. श्िंादे, माजी प्राचार्य डॉ. जनार्दन वाघमारे व माजी आमदार उल्हास पवार यांनी पवार यांच्याशी संवाद साधला. उल्हास पवार यांनी तर प्रश्न न विचारता भाषणच सुरू केले. त्यामुळे रसिकांमध्ये अस्वस्थता पसरली. यशवंतराव गडाख, विजय कोलते-पाटील यांनी याबाबत उल्हास पवार यांना चिठ्ठीही पाठवली. मुलाखत घेणा-या एकालाही मुलाखत घेण्याचे प्राथमिक सूत्र माहीत असल्याचे दिसले नाही. पवार यांनी महाविद्यालयीन जीवनात एका साप्ताहिकाची सात र्वष जबाबदारीही स्वीकारली होती. बाळासाहेब ठाकरे, वा. कृ. देसाई, शशी वेदक व पवार यांनी एकत्रित ‘राजनिती’ नावाचे मासिक काढले.

त्याचा पहिला अंक सिद्धिविनायकाला अर्पण केला. त्यानंतर त्याचे अंकच निघाले नसल्याचे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राजकारणात मैत्री जपणे आवश्यक असल्याचे सांगताना विधिमंडळ अधिवेशातील एक किस्सा त्यांनी सांगितला. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना प्रेक्षक गॅलरीतून अधिवेशन पाहत होतो. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तर विरोधी पक्षनेतेपदी तेव्हा एस. एम. जोशी होते. जोशी यांनी एक प्रश्न एका मंत्र्याला विचारला. दोनदा हाच प्रश्न त्यांनी विचारूनही त्यांचे समाधान झाले नाही. अखेर तो मंत्री कंटाळून एस. एम. जोशी यांना म्हणाला, माझे उत्तर तुमच्या डोक्यात जात नसेल तर मी काय करू.. तेव्हा यशवंतराव चव्हाण उठले व त्यांनी त्या मंत्र्याला बोलण्यात सभ्यता ठेवण्याबाबत चांगलेच सुनावले.

जोशी विरोधी पक्षात असूनही चव्हाण यांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. राजकारणात राजकारणाच्या वेळी राजकारण, नंतर मैत्री जपली पाहिजे. हे चव्हाण यांच्याकडून शिकल्याचेही पवार यांनी सांगितले.

‘‘माझी आई कडक स्वभावाची होती. तिच्यात वक्तशीरपणा होता. मुलांनी शिकावे यासाठी तिचा आग्रह होता. पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ती एसटीने मुलगा काय करतो हे पाहण्यासाठी यायची. इतका तिचा दरारा असायचा. त्यामुळेच सगळी भावंडे चांगली शिकली,’’ असेही त्यांनी सांगितले. १९५८ रोजी एसएससीला असताना सर्व विषयांत ३५ टक्के गुण मिळवणा-याला सायकलचे बक्षीस ठेवले होते. या परीक्षेत सर्व विषयात ३५ टक्के गुण मिळाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. नामांतराचा प्रश्न, मुंबई बॉम्बस्फोट हे मुख्यमंत्री असताना आव्हानात्मक विषय, प्रश्न होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतल्यानंतर तिथे दंगली उसळल्या.

त्यानंतर हा निर्णय स्थगित ठेवला. पण महाराष्ट्रात शिवाजी महाराज, गाडगेबाबा यांच्या नावाने विद्यापीठे असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे विद्यापीठ नसल्याची रुखरुख होती. नामांतरची प्रक्रिया पुन्हा सुरू करताना फ.मुं. शिंदे यांच्यासारख्यांचे सहकार्य लाभले. मराठवाडा परिसरात पुन्हा दंगली उदभवू नयेत यासाठी महिला आयपीएस अधिका-यांकडे दंगल होणा-या भागाची जबाबदारी दिली. त्यामुळे आपोआप या परिसरातील दंगली थांबल्या. नामांतर झाले, असेही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

संरक्षणमंत्री असताना अमेरिकेला गेल्यानंतर तिथल्या सैनिकांनी सलामी दिली. तेव्हा त्या सैनिकात मुला-मुलींचे प्रमाण निम्मे निम्मे होते. भारतात आल्यानंतर तिन्ही दलाची यासंदर्भात तीन महिने बैठक घेतल्यानंतर महिला वायुदलात टिकू शकत नाही, असे अधिका-याचे मत बनले. मात्र, मी अधिकार वापरून महिलांनाही वायुदलात प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. तेव्हा भारतीय वायुदलात अपघाताचे प्रमाण वाढले होते. महिला आल्यानंतर हे प्रमाण कमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. आता तिन्ही दलांचे नेतृत्व महिला करत असल्याचेही ते म्हणाले. महिलांना आरक्षण, वडिलांच्या संपत्तीत वाटा, तीर्थक्षेत्र विकास योजनेतून प्रतिवर्षी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद असे निर्णय मुख्यमंत्री असताना घेतल्याचे समाधान आहे, असेही पवार यांनी सांगितले. विदर्भातील सामान्य कष्टकरी जनतेला स्वतंत्र विदर्भ नको. काही मूठभर धनिकांना वेगळा विदर्भ पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक ऐक्यासाठी खोटे बोललो

मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर तातडीने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घ्यावी लागली. अकरा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. ज्या ठिकाणी हे स्फोट घडवण्यात आले तो परिसर हिंदूंचा होता. त्यामुळे तणाव काही कमी होत नव्हता. तेव्हा दूरदर्शनला मुलाखत देताना मस्जिद बंदर येथे बाराव्या ठिकाणी बॉम्ब पेरल्याची खोटी माहिती दिली. त्यामुळे हिंदू व मुस्लीम या दोघांमधील वातावरण काहीसे निवळले. हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ते आवश्यक होते. त्यासाठी खोटे बोलल्याचे दु:ख होत नाही. या बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यांनी खोटे बोलण्याची कारणमीमांसा मागितली. तेव्हा त्यांना हे कशासाठी केल्याचे सांगितल्यानंतर ते माझ्यावर खूश झाले. माझ्या कार्यतत्परतेचे त्यांनी कौतुक केल्याचेही पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. या मुलाखतीत पवार यांनी कुटुंबातील जिव्हाळा कसा आहे, शिक्षणक्षेत्रातील सम्राटांकडून सामान्यांची करण्यात येणारी अडवणूक आदी अनेक विषयांवर मते व्यक्त केली.

अणे यांच्या मागणीची सरकारने गंभीर दखल घ्यावी

मराठी राज्याचा प्रतिनिधी म्हणून सरकारने महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची केलेली मागणी चुकीची असून राज्य सरकारने त्याची गांभीर्याने दखल घ्यावी अशा कानपिचक्याही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या.

चव्हाण यांचा सुसंस्कृतपणा पंतप्रधानपदासाठी आड आला

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व तत्कालिन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे ताश्कंद करारासाठी रशियाला गेले. करार झाल्यानंतर शास्त्री यांचे त्याच रात्री निधन झाले. त्यांचे शव चव्हाण यांनी भारतात आणले. अशा आणिबाणीच्या काळात कॉंग्रेसच्या वरिष्ठांना चव्हाण हे भावी पंतप्रधान म्हणून पाहिजे होते. त्यामुळे मी, वसंतदादा पाटील व अन्य कॉंग्रेसच्या नेतेमंडळींनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे पंतप्रधानपदाबाबत विचार करण्याचा आग्रह केला.पण तेव्हा चव्हाण म्हणाले, की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला दिल्लीत आणले.

संरक्षणमंत्री केले. संयुक्त महाराष्ट्रासाठी नेहरू अनुकुल नसताना इंदिरा गांधी यांनी मदत केल्याने महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी तत्कालिन कॉंग्रेस अध्यक्षा इंदिरा गांधी यांचे याबाबत मत घ्यायला यशवंतराव दिल्ली येथे गेले. इंदिरा गांधी यांच्याबरोबर त्यांची भेट झाली. त्यानंतर इंदिराजींनी सहा तासांचा अवधी मागितल्याने यशवंतराव पुन्हा महाराष्ट्रात आले. काही वेळाने दिल्लीतून इंदिरा गांधी यांचा फोन आल्याची माहिती तेव्हा त्यांचे पीए श्रीपाद डोंगरे यांनी दिली. त्यावेळी मी यशवंतराव यांच्याबरोबर बोलत होतो. फोनवर इंदिरा गांधी यांनी त्यांना सांगितले, की तुमच्यासारख्या मंडळींचा मला पाठींबा असल्याने मीच पंतप्रधान होण्यचा निर्णय घेतला आहे. यशवंतरावांचा सुसंस्कृतपणा त्यांना पंतप्रधानपदापर्यंत घेऊन जाण्यास आड आला, अशी हृद्य आठवणही पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी उत्स्फुर्तपणे विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितली.

1 COMMENT

  1. विदर्भाच्या शत्रूकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही ज्यांनी आयुष्यभर विदर्भीय लोकांच्या तोंडाचा घास पश्चिम महाराष्ट्रीयांच्या तोंडात घातला , विदर्भाला आत्महत्या करायला लावणारा हा माणूसच विदर्भाचा खरा शत्रू आहे .
    लोकहो ह्यापासून सावध राहा . आणि ह्याच्या पार्टीला एकही मत देऊ नका .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version