Home गॅलरी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा संपन्न

हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार सोहळा संपन्न

1

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण केलेल्या १०६ हुतात्म्यांना अभिवादन करणारा आगळावेगळा कार्यक्रम शनिवारी मुंबईत पार पडला.

मुंबई- आपल्या जीवाची पर्वा न करता संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण केलेल्या गिरणी कामगार आणि शेतक-यांचे स्मरण करणारा आगळावेगळा कार्यक्रम शनिवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. ‘महाराष्ट्र दिन’ आणि ‘कामगार दिना’चे औचित्य साधत स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या लढय़ाला उजाळा देत त्यांच्या कुटुंबीयांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करणारा हृदयस्पर्शी सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच पार पडला. सभागृहातील आसनव्यवस्था कमी पडावी इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रप्रेमींचा प्रतिसाद या सोहळ्याला लाभला होता.

सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवलेले पिंपरी-चिंचवड ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अॅड. राजेंद्र पै, ‘साहित्य संमेलना’चे समन्वयक सचिन इटकर, आमदार नितेश राणे आणि हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी दीपप्रज्वलन करत सोहळ्याची सुरुवात केली. तर कार्यक्रमाची सुरुवात कवी श्रीपाद कोल्हटकर यांच्या ‘प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा..’ या महाराष्ट्रगीताने झाली. अशोक हांडे यांच्या चमूने सादर केलेल्या या गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ५६ वर्षापूर्वीचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी एक-दोन नव्हे तर सलग पाच वर्षे चालू असलेला हा लढा आजच्या पिढीसमोर तितक्याच प्रभावीपणे मांडता यावा यासाठी दै. ‘प्रहार’चे छायाचित्रकार विभागाचे प्रमुख संदेश घोसाळकर यांनी १५ मिनिटांची तयार केलेली ध्वनिचित्रफीत या वेळी दाखवण्यात आली. लढय़ाचे पुण्यस्मरण करून देणारी ही ध्वनिचित्रफीत पाहून प्रत्येक जण भारावला होता.

यावेळी हुतात्म्यांच्या एकूण सहा कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देत प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हुतात्मा सीताराम घाडीगावकर यांचे ज्येष्ठ बंधू दत्ता घाडीगावकर आणि हुतात्मा कमळाबाई मोहिते यांच्या कन्या रंजना मारुती कनसी यांचा सन्मान केला गेला. तर आमदार नितेश राणे यांच्या हस्ते हुतात्मा अनंत गोलतकर यांच्या कन्या सुलक्षणा सुधाकर गिरकर आणि हुतात्मा रामनाथ पांडुरंग अमृते यांचे सुपुत्र सुधीर रामनाथ अमृते यांचा सन्मान केला, तर अॅड. राजेंद्र पै यांनी हुतात्मा लक्ष्मण नरहरी थोरात यांचे सुपुत्र रमेश लक्ष्मण थोरात आणि हुतात्मा सीताराम बालाजी पवार यांचे नातू परेश प्रकाश पवार यांचा सन्मान केला. सोहळ्याचे अध्यक्षपद भूषवत अखंड महाराष्ट्रासाठी खंबीर पाठिंबा दर्शवणा-या डॉ. श्रीपाल सबनीस, अॅड. राजेंद्र पै आणि साहित्य संमेलनाचे समन्वयक सचिन इटकर यांचा आमदार नितेश राणे यांनी शाल-पुष्पगुच्छ देत सत्कार केला. महाराष्ट्राचा इतिहास किती गौरवशाली आहे हे अनुभवण्याची, जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमानिमित्ताने आजच्या तरुणाईला मिळाली. आजचा तरुण दिशाहीन आहे, अशा टीका सातत्याने होत असतात. मात्र राज्याचे, देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीतच आहे हे भान ओळखत आमदार नितेश राणे यांनी जो पुढाकार घेतला तो वाखणण्याजोगा असल्याच्या भावना सचिन इटकर यांनी व्यक्त केल्या. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढय़ात कुणाचे योगदान होते, अखंड महाराष्ट्राच्या प्रेमापोटी प्रत्येकाने स्वत:ला का झोकून दिले होते? हे चित्र योग्य पद्धतीने आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी नितेश राणे यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. अखंड महाराष्ट्राचे महत्त्व तरुण पिढीच्या कानावर पडावे, त्यांच्या मनात ते रुजावे आणि पुढे वाढावे यासाठी हा उपक्रम निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त करत अॅड. राजेंद्र पै पुढे म्हणाले की, अखंड महाराष्ट्राला विभक्त करणा-यांचा तीव्र निषेध करणे हीच १०६ हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

गहिरवरून आले..

महाराष्ट्र दिन, कामगार दिन जवळ आला की, अनेक जण हुतात्म्यांचे, कामगारांचे स्मरण करतात. पण स्मरण करताना त्यांच्या तोंडून १०५ हुतात्मा, असे वाक्य निघते. हे ऐकून लाज वाटते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा होऊन ५० वर्षाहून अधिक काळ उलटला असला तरी प्रत्येक नेता, आमदार केवळ हुतात्म्यांची नावे घेत त्यांचे स्मरण करतो. पण आमदार नितेश राणे एकमेव तरुण आमदार असतील ज्यांनी केवळ १०६ हुतात्म्यांच्या लढय़ाचे स्मरण केले नाही तर त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करत हुतात्म्यांच्या बलिदानाची कदर केली. हे पाहता मन गहिवरून आले आहे.
– दत्ता घाडीगावकर, हुतात्मा सीताराम घाडीगावकर यांचे ज्येष्ठ बंधू

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version