Home मध्यंतर श्रध्दा-संस्कृती हुर्शीचे पेशवेकालीन गणेश मंदिर

हुर्शीचे पेशवेकालीन गणेश मंदिर

1

पेशवाईच्या काळात कोकणातून अनेक घराणी पुण्याच्या दिशेनं गेली व स्वकर्तृत्वानं दिगंत कीर्ती, संपत्ती व नावलौकिक मिळवून मोठी झाली. पण ही मंडळी कधीही आपल्या गावाला, कोकणातील घरकुलाला विसरली नाहीत. आपली ग्रामदैवतं, कुलदैवतं यांचाही विसर त्यांना पडला नाही. नंतरच्या काळात कोकणातील पडझड झालेल्या अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार झाले, वाडे-हुडे (छोटी घरं)बांधले गेले, वनराईची लागवड करण्यात आली. यांपैकीच एक म्हणजे हुर्शी येथील गडदेवाडीतील पेशवेकालीन गणेशमंदिर!

या मातीचा गंध सांगतो इतिहासाच्या खुणा
पानीपतावर इथुनी गेले होते वीर झुंजण्या।।

कोकणच्या मातीत जागोजागी इतिहासाच्या खुणा विखुरलेल्या आढळतात. कोकणातील बाळाजी विश्वनाथ हे घाटावर छत्रपती शाहू महाराजांकडे गेले व स्वपराक्रमानं पेशवेपदावर आरूढ झाले. गणपती ही पेशव्यांची आराध्य देवता होती. पेशव्यांनी स्वत: अनेक गणपतींची देवस्थानं जीर्णोद्धारीत करून नावारूपाला आणली. अनेक ठिकाणी नव्यानं गणपतीची सुरेख मंदिरं बांधली. पेशव्यांच्या सरदारांनीही या कामात सहभाग घेऊन आपापल्या कुवतीनुसार गणपतीची मंदिरं बांधलेली आहेत. पूर्वीच्या ग्रामरचनेनुसार सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यात असलेल्या पुरळ गावात हुर्शी ही वाडी होती. आता हुर्शी हे देवगडातील स्वतंत्र गाव आहे. हुर्शीतील एका उंच डोंगरावर गणेश मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराची बांधकामशैली ही शिवकालीन पद्धतीची आहे. या मंदिराच्या भिंती कुठे पाच फूट, तर कुठे तीन फूट रुंदीच्या घडीव चि-यांच्या आहेत. तर भक्कम भिंतींचा मुख्य गाभारा, त्यावर अखंड तोलून धरलेला व भिंती व्यतिरिक्त कुठेही आधार नसलेला चिरेबंदी घुमट आहे. असे भव्य, भक्कम घुमट बहुतेक कुठे आढळत नाही.

मंदिरातील घुमटांमध्ये पावसाळ्यात पाणी झिरपू नये, म्हणून बाहेरील बाजूने कौले बसविल्याप्रमाणे जांभा दगड तासून चपटे केलेले दगड बसविलेले आहेत. या चपटय़ा दगडांच्या सहाय्यानं घुमटाच्या बाहेर शिखराची देखणी रचना केलेली आहे. हे सर्व बांधकाम चुन्यात केलेले आहे. गंमत म्हणजे, आजही हे घुमट पावसाळ्यात गळत नाही. खरं म्हणजे घुमट म्हटले की, तो अनेकांना मुस्लीम वास्तुप्रकार वाटतो. परंतु घुमट हा शुद्ध वैदिक वास्तुशास्त्रीय प्रकार आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये या शैलीतील बांधकामाला ‘कुंभज’ असे म्हटलेलं आहे. मातीचा कुंभ (घडा) उलटा ठेवला की, जो आकार तयार होतो त्यास ‘कुंभज’ असं म्हणतात. आपल्याकडील अनेक मंदिरांवर अशाप्रकारच्या कुंभज शैलीची रचना आढळते. विशेषत: शैव व शाक्त पंथीय मंदिरांची रचना तर याच पद्धतीची आढळते.

या गणेश मंदिरातील गाभारा व अंतराळाच्या पुढे सभामंडपाचं बांधकाम आहे. अखंड लांबीचे कुठेही जोड नसलेले चि-याचे खांब हे आणखी एक वैशिष्टय़ येथे पाहायला मिळतं. कोकणातील पद्धतीप्रमाणे सभामंडपाचं छत कौलारू आहे. गाभा-यातील मूर्ती एका भव्य काळ्या दगडातील आयताकृती शीळेवर बसवलेल्या आहेत.

शीळेच्या कडांना सुंदर कमळाच्या पाकळ्यांचं नक्षीकाम आहे. मध्यभागी गणपतीची मूर्ती व दोन्ही बाजूला त्याच उंचीच्या दोन चवरीधारी स्त्री मूर्ती आहेत. गावकरी मंडळी त्या रिद्धी-सिद्धी असल्याचं सांगतात. पण मूर्तीशास्त्राप्रमाणे या मूर्ती चवरीधारी सेविकांच्या असाव्यात असं वाटतं. सभामंडपासमोर तुळशी वृंदावन आहे. तिथे एक नंदी बसविलेला आहे. नंदीचा वरचा भाग त्याची शिंगं, पोवळी व त्याच्या पाठीचा भाग मशिननं कापल्याप्रमाणे झिजलेला होता. गाभा-यातील या तिन्ही मूर्ती देखील समोरून तासून काढल्याप्रमाणे झिजलेल्या होत्या. निरीक्षणाअंती लक्षात असं आलं की, या चारही मूर्ती एकाच प्रकारच्या दगडात कोरलेल्या असून, त्या दगडातील मूळच्या दोषामुळे त्यांचे पापुद्रे निघाले आहेत. त्यामुळेच मराठे व स्थानिक ग्रामस्थांनी या मूर्ती बदलण्याचं व मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं निश्चित केलं.

मंदिरात येणा-या यात्रेकरूंच्या निवा-यासाठी व सेवेक-यांना विसावण्यासाठी ओस-या, पडव्या बांधलेल्या आढळतात. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याभोवती तटबंदी बांधण्याची रचना केलेली होती. या तटबंदीचा सर्व पाया चिरेबंदी दगडात घातलेला आहे. तटबंदीच्या पायाचं पहिल्या रांगेचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पुढील बांधकाम काही अडचणींमुळे अपुरं राहिलं असावं. कारण आतून व बाहेरून घडीव चिरे व दोन्ही चि-यांमध्ये घातलेला मातीचा भराव, अशा जुन्या पद्धतीच्या बांधकामाची सुरुवात केलेली आढळते. बहुधा हे बांधकाम पेशवाईच्या उत्तरार्धात सुरू झालं असावं व पुण्यातील पेशवाईच बुडाल्यामुळे परिस्थिती बदलल्यानंतर पुढे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेमुळे काम अर्धवट राहिलं असण्याची दाट शक्यता वाटते.

विश्वनाथ रामचंद्र मराठे हे आंग्रे यांच्याकडे चिटणीस पदावर होते. नंतर ते पेशव्यांकडे गेले. त्यांनीच हे मंदिर बांधलं असल्याचं सांगितलं जातं. या गणपती मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष श्रीराम मराठे यांच्या गावातील घराशेजारीच या सरदार मराठे यांचा वाडा होता. त्याचा चौथरा आजही शाबूत आहे.

गतकालीन वैभवशाली इतिहासाशी संबंधित अनेक पुरावे इथे विखुरलेले आढळतात. गावातील मानक-यांकडे जुने कुलवृत्तांत, पोथ्या, बखरी, मोडीतील जुनी कागदपत्रं माडीवर धूळ खात पडलेली आहेत. त्यावरील धूळ झटकली, तर इतिहासातील अनेक रंजक, रोमहर्षक गोष्टींवर प्रकाश पडू शकतो. या कालखंडातील जुन्या गोष्टी उजेडात आल्यास इतिहासाची नवी पानं लिहिता येतील. प्रत्येकानंच आपल्या गावचा इतिहासही उजेडात आणण्यासाठी सहकार्याचा हात पुढे करण्याची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण इतिहास परिषदेची वाटचाल या दिशेनं सुरू झाली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version