Home किलबिल हे जाणून घ्या..

हे जाणून घ्या..

0

आपल्या अवतीभवती अनेक गोष्टींचा वापर आपण रोजच्या जगण्यात करत असतो. पण अतिपरिचयाच्या असूनही आपल्याला त्यांच्याविषयी संपूर्ण माहिती नसते. म्हणूनच आमच्या छोट्टम-मोठ्ठम खास दोस्तांसाठी आम्ही आपल्या रोजच्या वापरातील काही गोष्टींची रंजक माहिती घेऊन येत आहोत –

वटवाघूळ रात्रीची शिकार करतं कसं?

वटवाघूळ हा दूपर्यंत उडण्याची क्षमता असलेला एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघळं आपल्या नाकातून हळूवारपणे अतिशय उच्च वारंवारितेचे ध्वनी निर्माण करतात. या ध्वनिलहरी उडत्या कीटकांवर आपटून मागे येतात. रडारच्या तंत्रज्ञानात असतं त्याप्रमाणे वटवाघळं प्रतिध्वनी ऐकून आपल्या भक्ष्याचा वेध घेतात. अचूक अंदाज घेत ते त्या कीटकावर एकदम झडप घालतात. ज्यांना वटवाघळांची ही पद्धत माहीत आहे, असे काही पतंग आहेत. हे पतंगही विचित्र आवाज काढून वटवाघळांना चकवतात आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतात. वटवाघळांना काही देशांमध्ये शुभ तर काही देशांमध्ये अशुभ मानलं जातं.


थंड वाळवंट!
वाळवंट म्हटलं का, आपल्यासमोर येतं तो कडक ऊन, तुरळक झाडं, उन्हाने तापलेली वाळू इ. पण दोस्तांनो, जगात ‘थंड वाळवंट’सुद्धा आहेत, बरं का! थंड वाळवंटांमध्ये साधारणपणे उत्तर अमेरिका आणि युरेशियाच्या उत्तरेकडील अतिथंड हवामानाचा सलग पट्टा येतो. या भागात वनस्पतींची वाढ होणं अवघड असतं. हा प्रदेश सूचिपर्णी अरण्यांच्या उत्तरेला आहे. तिकडे फक्त शेवाळे, दगडफूल, लव्हाळा आणि काही जातींचं गवत या वनस्पती आढळतात. या प्रदेशाला ‘टुंड्रा’ म्हणूनही ओळखतात.

या भागाच्या उत्तरेला वनस्पतीच आढळत नाहीत. या प्रदेशाला ‘वाळवंटी टुंड्रा’ किंवा ‘थंड वाळवंट’ असं म्हटलं जातं. ग्रीनलँडसारख्या वनस्पतीरहित आणि विस्तृत हिमाच्छादित प्रदेशाला काही वेळा ‘हिमवाळवंट’ असंही म्हटलं जातं. या भागामध्ये वर्षातला बहुतांश काळ हिमस्वरूपातच पाणी आढळतं. परिणामी, इकडच्या वनस्पतींना पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. तसंच जमीनही हिमाच्छादित असते. बाष्पीभवनही कमी असतं. काही वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने अगदी कमी तापमान पुरेसं ठरतं. अशा जातींच्या वनस्पतीच या प्रदेशत आढळतात. उत्तर गोलार्धातच प्रामुख्याने थंड वाळवंटाचा विस्तार अधिक झाल्याचं दिसून येतं.


‘हॉट एअर बलून’ आकाशात कसा उडतो?
फुग्यात हवा भरून ते हवेत उंच उडवण्यातला आनंद वेगळाच असतो. हेच तत्त्व लक्षात घेऊन अनेक प्रकारचे फुगे तयार झाले ज्यांच्या सहाय्याने मुलं, माणसं आकाशात उडू शकतात. ‘हॉट एअर बलून’ असाच एक फुगा आहे. याच्या माध्यमातून उडण्याची वेगळीच मजा अनुभवायला मिळते. हा हॉट एअर बलून हवेत कसा उडतो? आधुनिक हॉट एअर बलूनमध्ये इंधनासाठी प्रोपेनचा वापर केला जातो. कंप्रेस्ड लिक्विड प्रोपेन कमी वजनाच्या सिलिंडरमध्ये भरून बलून बास्केटमध्ये ठेवला जातो आणि तो जाळण्यासाठी स्टीलच्या एका डिटिंग कॉइलच्या माध्यमातून बर्नरशी जोडला जातो. पायलटने बर्नर सुरू करताच ही कॉइल गरम होऊन प्रोपेन गरम होऊ लागतो. जसजशी गरम हवा बलूनमध्ये जमा होते तसतसा तो वर उडू लागतो. वायूचा दाब बलूनद्वारे विस्थापित केलेल्या हवेच्या प्रमाणाइतका असतो. याच कारणामुळे एका विशिष्ट सीमेनंतर हा बलून वर जात नाही. कारण उंची जशी वाढत जाते तसे हवेचे प्रमाण कमी होत जाते. अलीकडे हॉट एअर बलूनमध्ये नायलॉनची पाकिटं असतात. त्यांच्या खालच्या भागात आगीचा प्रतिकार करणा-या तत्त्वांचा एक थर असतो. त्यामुळे बलूनमध्ये आग लागत नाही. या बलूनमध्ये पॅराशूटचे व्हॉल्व्ह उघडण्यासाठी एक कार्ड लावलेलं असतं. हे कार्ड उघडल्यानंतर गरम हवा बाहेर जाऊ लागते आणि हा बलून हळुहळू खाली येऊ लागतो.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version